लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी आणि सोहळ्यांसाठी पारंपरिक कपडय़ांमध्ये वेगळा लुक कसा आणायचा?

‘रिसेशन हो या इंफ्लेशन शादियाँ तो होती रहेंगी. लोग उसपे लाखो करोडो रुपये खर्च करते रहेंगे,’ ‘बँड बाजा बारात’मधल्या श्रुती कक्करचं वेडिंग प्लॅनर होण्यामागचं हे लॉजिक नाकारता येऊच शकत नाही. भारतीय लग्नसोहळे, त्यातील थाट, माणसांची रेलचेल, खाद्यपदार्थ, नाचगाणी, नाना प्रकारचे सोहळे, मानापमान या सगळ्यांचं कौतुक केवळ भारतीयांना नाही, तर जगभरात आहे. त्यामुळे हल्ली ‘लग्न’ हा केवळ घरगुती सोहळा न राहता कोटय़वधींची उलाढाल करणारा एक व्यवसाय बनलेला आहे. या सगळ्याचा महत्त्वाचा भाग असतो, ते लग्नातले कपडे. विशेषत: नववधूचे कपडे. हळद आणि मुख्य लग्न यांच्या पलीकडे जात संगीत, रिसेप्शन, प्रीवेडिंग पार्टी अशा वेगवेगळ्या सोहळ्यांची एक लांबलचक रांग हल्ली महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये आवर्जून पाहायला मिळते. अशा वेळी प्रत्येक सोहळ्यासाठी वेगळं दिसायला हवं. मग वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे, दागिने, मेकअप यांची तयारीही ओघाने आलीच.

घागरा, शरारा, साडय़ा, लेहेंगा, अनारकली..नावं घ्याल तितके वेगवेगळे प्रकार वेडिंग लुकमध्ये पाहायला मिळतात. डिझायनर शोरूम्स, ब्रँडेड दुकानं लग्नसराईच्या काळात लखलखत असतात. अशा वेळी या गर्दीतून नेमकं तुम्हाला काय हवंय हे हेरून काढायला कसब लागतं. सोबत बजेटची टांगती तलवार असतेच. ज्वेलरी, कपडे, शूज, मेकअप हे सगळं सांभाळून खर्चाचं गणित सांभाळायचं असेल, तर तुम्हाला आधीपासून प्रत्येक सोहळ्यानुसार लुकचं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये अजूनही मुख्य लग्नामध्ये मामाकडून आलेली पिवळी साडी नेसायची पद्धत आहे. त्यामुळे त्या वेळेस पारंपरिक काठपदराची पिवळी नऊवारी किंवा सहावारी साडी नेसण्याला मुली पसंती देतात. पण इतर सोहळ्यांना मात्र वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स ट्राय करायची संधी असते.

लग्नाच्या समारंभाची सुरुवात होते साखरपुडय़ापासून. या दिवशी सासरकडच्यांकडून मिळालेल्या साडीला महत्त्व असते. अशा वेळी बहुतेकदा पैठणी, बनारसी साडय़ांना पसंती दिली जाते. पण साखरपुडय़ालाच महागडी साडी खरेदी केली, की त्यानंतरच्या सोहळ्यांच्या कपडय़ांचे बजेट टप्प्याने वाढत जातं. तसंच साखरपुडय़ाला तुम्ही आवर्जून हटके साडीचा प्रयोग करू शकता. शिफॉन किंवा लेसची कॉम्बिनेशन साडी वापरू शकता. सध्या कन्सेप्ट साडीचा ट्रेंड आहे. धोती, लेगिंग साडी अशा वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप केलेल्या प्रीस्टीच्ड साडय़ा शोरूममध्ये पाहायला मिळतात. त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. पारंपरिक सिल्कची साडी नेसायची असल्यास ब्लाउजमध्ये वेगळेपणा आणता येऊ  शकतो. सिल्क साडय़ांसोबत जॅकेट किंवा केप घेता येऊ शकतो.

हळद हा महाराष्ट्रीयन लग्नातील महत्त्वाचा सोहळा मानला जायचा. पण हल्ली त्याच्यासोबत मेहेंदी समारंभालाही महत्त्व मिळू लागलं आहे. बऱ्याचदा हळद लावताना एखादी साधीशी साडी आणि मोत्याचे दागिने घालण्यास मुली पसंती देतात. त्यानंतर रात्रभर चालणाऱ्या मेहेंदी समारंभासाठी सुटसुटीत पेहरावाला पसंती दिली जाते. कारण दिवसभर हातभर मेहेंदी सांभाळायची कसरत करायची असते. अशा वेळी अनारकली किंवा अंगरखा स्टाइल ए-लाइन ड्रेस आणि लेगिंग वापरता येऊ  शकते. तुमच्याकडे मिरर वर्क केलेला मल्टीकलर चोली किंवा क्रॉप टॉप असेल, तर त्यासोबत छान घेरेदार स्कर्ट कॅरी करता येईल. त्याने तुम्हाला लेहेंग्याचा फीलसुद्धा मिळेल. स्कर्टची उंची कमी असूद्यात म्हणजे वावरताना त्याला सांभाळायची कसरत करावी लागणार नाही. हळद, मेहेंदी हे समारंभ शक्यतो दिवसा असतात, त्यामुळे इंग्लिश ब्ल्यू, पिंक, नारंगी, येल्लो, फुशिया, पोपटी असे पेस्टल शेड्स आवर्जून वापरा. सध्या बाजारात गोटा पट्टीची ज्वेलरी, फुलांची ज्वेलरी, गोंडय़ाची ज्वेलरी पाहायला मिळते. मेहेंदीच्या समारंभाचा फ्रेशनेस ठेवण्यासाठी ही ज्वेलरी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. बोहो लुकची चांदीची अँटिक ज्वेलरीसुद्धा या वेळेस वापरता येईल.

सध्या बऱ्याचदा लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम असतो. या समारंभाला ड्रेसअप होताना महत्त्वाचा मुद्दा असतो, कम्फर्ट. तुम्ही स्वत: नाचणार असाल, तर कपडय़ांमध्ये तोल संभाळणं गरजेचं असतं. त्यामुळे पायघोळ, घेरेदार ड्रेसेसऐवजी सुटसुटीत पण उठून दिसणारा ड्रेस निवडा. साडी नेसायची असल्याच स्टीच्ड साडी निवडा, जेणेकरून तिला सांभाळत बसायची गरज भासणार नाही. या समारंभास ज्वेलरीचा वापर कमी करून ड्रेस हेवी ठेवण्यास हरकत नाही. त्यासाठी फ्लोरल, ग्राफिक प्रिंटचा लेहेंगा किंवा ए-लाईन ड्रेस वापरता येईल. पतियाला किंवा शरारा स्टाइल ड्रेस लेहेंग्याला पर्याय ठरू शकतात. गाऊन दुपट्टा स्टाइल ड्रेस तुम्ही वापरू शकता. रात्रीच्या या समारंभासाठी मरून, नेव्ही, व्हाइन शेड, मेहेंदी ग्रीन, ग्रीन अशा गडद शेड्स आवर्जून वापरा.

रिसेप्शन हा लग्नात सगळ्यात ग्लॅमरस सोहळा मानला जातो. इथे प्रयोगाला पूर्ण वाव असतो. साडी गाऊन हा प्रकार रिसेप्शनसाठी आवर्जून ट्राय करा. इंग्लिश कलरचा साडी गाऊन ट्रॅडिशनल आणि मॉडर्न या दोन्ही लुक्सचा उत्तम मेळ ठरू शकतो. घेरेदार कॅनकॅन घातलेला घागरा तुम्हाला वापरता येईल. जॅकेट आणि घागरा, अनारकली विथ स्कर्ट असे प्रयोग रिसेप्शनला करू शकता. रिसेप्शनला पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांऐवजी हिऱ्यांचे किंवा स्टोनचे दागिने वापरू शकता.