scorecardresearch

नऊ महिन्यांची फॅशन

गरोदरपणाचं कारण देत ढगळ, सूट न होणारे किंवा अनकम्फर्टेबल कपडे घालणं आजच्या स्त्रीला मान्य नाही

गेल्या काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणामुळे माध्यमांमध्ये करिना कपूर चर्चेत आहे. छोटे नवाब सैफ अली खान आणि करिनाच्या घरी बाळ येईपर्यंत आता माध्यमांना भरपूर खाद्य मिळेल. करिना तिच्या हातातल्या चित्रपटांचं काय करते, पुढचे काही महिने कसं ड्रेसिंग करते, तिचं ‘बेबी बम्प’ किती दिसतंय, तिनं कसं ड्रेसिंग करायला हवं, या सगळ्याबाबत ‘एक्स्पर्ट अॅडवाइज’ देण्याची नामी संधी फॅशन मासिकं आणि वेबसाइट्सना मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी हेच वारं मीरा राजपूत, जेनिलिया डिसूझाभोवती घोंघावत होतं.

या सगळ्यात एक बाब नक्कीच नोंद करण्यासारखी आहे, ती म्हणजे या तिघींनी त्यांच्या गरोदरपणात केलेलं ड्रेसिंग हे आजच्या काळातल्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करतं. आजची स्त्री गरोदरपणाला करिअरमधला अडथळा मानत नाही. ती तिचं काम करत शक्य असेल तोपर्यंत करत राहते. त्यामुळे अर्थातच ती गरोदरपणातही वर्किंग वुमन असते. तिला त्या काळात साजेसे आणि कम्फर्टेबल कपडे हवेत, याची जाणीव तेव्हाच तीव्र होते. अगदी पाच-दहा वर्षांपूर्वीपर्यंत ‘प्रेग्नेंसी ड्रेसिंग’ ही संकल्पना भारतात नवीन होती. गरोदरपणात सुटसुटीत कपडे घालावे, इतकाच एक मापदंड होता. नामवंत सेलेब्रिटीसाठी कुणी डिझायनर मॅटर्निटी वेअर डिझाइन करून द्यायचा. पण सर्वसामान्य स्त्रीला मात्र ओव्हरसाइज कपडे हाच पर्याय होता. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा हा टप्पा ड्रेसिंग, फॅशनच्या विश्वापासून कित्येक मैल दूर होता. आज मात्र कोणतीही फॅशन किंवा शॉपिंग वेबसाइट उघडल्यास त्यात ‘मॅटर्निटी क्लोदिंग’चा एक विभाग असतोच. अनेक मॉल, ब्रॅण्डेड शॉप्समध्ये मॅटर्निटीसाठी खास कपडे ठेवलेले दिसतात.

गरोदरपणाचं कारण देत ढगळ, सूट न होणारे किंवा अनकम्फर्टेबल कपडे घालणं आजच्या स्त्रीला मान्य नाही. पण मॅटर्निटी वेअर सेक्शनमधले कपडेदेखील आंधळेणानं उचलून चालणार नाही. त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्त्व, कामाचं स्वरूप, कम्फर्टची व्याख्या या गोष्टींचा विचार करायला हवा. गरोदरपणात फिटेड, ब्राइट रंगाचे कपडे घालू नयेत, हे तर माहिती असतं. त्यामुळे जीन्स, स्कर्ट्स असे एरव्हीचे प्रकार कपाटात जातात. पण अगदी चार महिन्यांसाठी घेतलेले कपडे गरोदरपणानंतर कपाटात पडून राहू नयेत आणि नंतरही वापरता यावेत, अशा प्रकारे ब्रॅण्ड्स त्यांचं कलेक्शन डिझाइन करू लागले आहेत.

गरोदरपणासाठी खरेदी केलेले किंवा शिवून घेतलेले कपडे कल्पकतेने निवडले तर नंतरही वापरता येतील. मग तुम्हीही एखाद्या सेलेब्रिटीप्रमाणे ‘बेबीबम्प’ स्टायलिशरीत्या मिरवू शकता.

– गरोदरपणात तुम्ही ड्रेसचं विभाजन कसं करता, हे अधिक महत्त्वाचं आहे. शक्यतो आडव्या रेषेत ड्रेसचं विभाजन करणं उत्तम असतं. आडव्या स्ट्राइप्सचे ड्रेस, शर्ट तुम्ही सहज वापरू शकता. आडव्या रेषेत कलर ब्लॉकिंग केलेले ड्रेस वापरता येतील. एम्पायर लाइनचे ड्रेस वापरणं या काळात सोयीचे असतात. एम्ब्रॉयडरी, डिटेलिंग असलेल्या नेकलाइनमुळे ड्रेसचा अपर पार्ट फोकसमध्ये येतो. त्यामुळे असे ड्रेस वापरणं टाळा.

– ऑफिस, कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये बेबीबम्प फोकसमध्ये आणणं टाळलं जातं. अशा वेळी प्रिंटेड किंवा डार्क शेडचे ड्रेस वापरता येतात. फ्लोरल प्रिंट्स नक्कीच वापरा. लेअरिंगची मदतसुद्धा घेऊ शकता. एक सेमी फॉर्मल ब्लेझर, श्रग तुमच्या वॉर्डरोबमध्ये असू दे. असिमेट्रिकल ड्रेसेससुद्धा वापरता येतील.

– एम्पायर लाइन किंवा वेस्टलाइनवर विभाजन करताना ड्रेसमध्ये इलास्टिक लावतात. ते गरोदरपणात सोयीचे नसतात. त्याऐवजी फ्लेअर ड्रेस घेऊन त्याला बेल्ट किंवा लेस बांधणं सोयीचं ठरू शकतं. रॅपअराउंड ड्रेस या काळात वापरायला सोयीचे असतात.

– गरोदरपणासाठी मॅटर्निटी डेनिम्स असतात. पोटाच्या घेरीला आधार मिळावा म्हणून यांना पोटापासून काही इंचांचं इलास्टिक कापड असतं. याशिवाय पलॅझो, कॉटन पँट्स, स्कर्टसारखा लुक असलेल्या कुलोट पँट्स, योगा पँट्स या दिवसात नक्कीच वापरू शकता. जंपसूट्ससुद्धा गरोदरपणात वापरून बघा.

– लायक्रा कापड तुमच्या शरीराचा आकार घेतं. त्याला फॉल शरीराला लागून होतो. त्यामुळे लायक्राचे ड्रेसेस बल्की दिसत नाहीत. हे कापड वापरणं चांगलं.

– सध्याचा मॅक्सी ड्रेसेसचा ट्रेण्ड गरोदरपणासाठी सोयीचा आहे. त्यांना स्लीट असल्यास लुकला ट्विस्ट मिळतो. शॉर्ट ड्रेसेससुद्धा सहज वापरू शकता. फक्त त्यांच्या लांबीकडे लक्ष द्या. पोटाच्या घेरीमुळे हे ड्रेसेस थोडे वर उचलले जातात. त्यामुळे तुम्हाला सोयीची उंची तपासून घ्या.

– गरोदरपणात घरगुती समारंभात अनारकली ड्रेसेस घातले जातात. पण त्यांच्या घेऱ्यामुळे शरीर अधिकच फुललेलं दिसतं. त्याऐवजी ए -लाइन किंवा फ्लेअर कुर्ते निवडा. त्यांच्यासोबत सुटसुटीत पलॅझो वापरता येतील.

– साडी नेसणार असाल तर पोटावर निऱ्या येतील, अशी नेसू नका. साडीचा ब्लाऊजमुळे पोटाला वळ येऊ शकतात. शक्यतो ब्लाऊज हेमाला फिटेड नसतील याची काळजी घ्या. सध्या ट्रेंडमध्ये असलेले जॅकेट ब्लाऊज, शर्ट स्टाईल ब्लाऊज वापरता येतील.

– मृणाल भगत

मराठीतील सर्व Wearहौस ( Wear-haus ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fashion in pregnancy

ताज्या बातम्या