पहिलावहिला वन पीस ड्रेस

प्रत्येक बॉडीटाइप आणि स्कीनटोनला वनपीस ड्रेस शोभून दिसतो

पहिलावहिला वन पीस ड्रेस निवडताना दुकानाच्या मॅनिक्वीनवर चढवलेले, सिनेमात नायिकेने घातलेले वन पीस ड्रेस पहिल्या नजरेतच आपल्याला प्रेमात पडतात. अगदी ‘पुढच्या शॉपिंगमध्ये ड्रेस घ्यायचाच’ हे ठरतंसुद्धा. ट्रायल रूममध्ये जाऊन घालूनसुद्धा पाहिला जातो. पण नंतर नजरेला बघायची सवय नाही, ड्रेसच्या आखूडपणामुळे येणारा अवघडलेपणा, नेक डीप वाटणं या आणि अनेक कारणांनी तो ड्रेस परत रॅकवर जातो. खरं तर वन पीस ड्रेस हा वापरायला सुटसुटीत आणि दिवसाच्या प्रत्येक प्रहरी शोभून दिसेल असा कपडय़ांचा प्रकार आहे. ऑफिस असो, कॉलेज, कार्यक्रम, पार्टी कोणत्याही प्रसंगी वन पीस ड्रेस सहज घालता येतो. पावसाळ्यात तर ते उत्तमच. पण योग्य फिटिंगचा आणि शोभून दिसणारा वन पीस ड्रेस निवडणं हे मात्र महत्त्वाचं ठरतं.

प्रत्येक बॉडीटाइप आणि स्कीनटोनला वनपीस ड्रेस शोभून दिसतो. फक्त तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य ड्रेस निवडता आला पाहिजे. त्यासाठी त्याचे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. विशेषत: पहिला वन पीस ड्रेसबरोबर निवडला गेलाच पाहिजे, त्यामुळेच नंतर ड्रेस कॅरी करायचा आत्मविश्वास मिळतो.

वन पीस ड्रेस खरेदी करताना किंवा शिवताना त्याचे प्रकार आणि त्यानुसार कोणता ड्रेस कधी वापरायचा असतो, हे माहीत असणं गरजेचं आहे. समर ड्रेस, डे ड्रेस, शिफ्ट ड्रेस, शर्ट ड्रेस हे दिवसा वापरायच्या ड्रेसचे प्रकार आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे यांचे पॅटर्न सिंपल आणि एलिगंट असतात. ए -लाईन, स्ट्रेट फिट ड्रेस या प्रकारात मोडतात. कामाच्या ठिकाणी घालायचे असतील तर पेस्टल, अर्दी टोनचे ड्रेस निवडावेत. कॅज्युअल डेटसाठी फ्लोरल, स्ट्राइप्स किंवा छोटे प्रिंट्सदेखील निवडू शकाल.

ऑफिसवेअर, कॉलेजला जाताना तुम्हाला भडक, नजरेत भरणारे ड्रेस नको असतात. त्यानुसार कमीतकमी डिटेलिंग केलेले ड्रेस निवडावेत. बॅलेरीना ड्रेस, बॉलरूम गाऊन, लिटील ब्लॅक ड्रेस हे पार्टीसाठी घातले जातात. यात क्रिस्टल वर्क, शिमर, एम्ब्रॉयडरी पाहायला मिळते. काळा, मरून असे डार्क शेड्स किंवा पेस्टल शेड्स यात असतात. गोल्डन आणि सिल्व्हर रंगांचाही यात समावेश असतो. पार्टीमध्ये फिरतीचं काम नसतं. आपला लुक मिरवणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे फिटेड ड्रेस किंवा अधिक फ्लेअर असलेले ड्रेस यावेळी वापरले जातात.

बॉडीशेपनुसार ड्रेस निवडणं महत्त्वाचं असतं. बॉडीटाइप आणि ड्रेसिंगबद्दल आपण अनेकदा बोललो आहोतच. तेच नियम येथेही लागू होतात. वेस्टलाइन ड्रेस सर्व बॉडीटाइपवर सूट होतात. त्यामुळे बेसिक ए-लाईन ड्रेस पहिला ड्रेस म्हणून निवडता येऊ  शकतो. प्रथमच वन पीस ड्रेस घालणार असाल तर शक्यतो न्यूट्रल रंग निवडा. या काही गोष्टी ध्यानात ठेवल्या की तुम्हीही तुमचा पहिलावहिला ड्रेस-लुक मिरवू शकता.

  • ड्रेसचं कापड हा सगळ्यात मोठा मुद्दा असतो. लायक्राचे वन पीस ड्रेस खूप लोकप्रिय आहेत. पण या कापडाला इलास्टिसिटी असते. त्यामुळे चालताना किंवा काम करताना ड्रेस वर उचलला जातो. जॉर्जेट, शिफॉनच्या ड्रेसेसचीसुद्धा तीच गत होते. ड्रेस खरेदी करताना ही बाब लक्षात असू द्या. ड्रेसची लांबी ठरवताना या बाबी महत्त्वाच्या असतात.
  • ड्रेसची लांबीसुद्धा तुमच्या सोयीनुसार असू दे. बसताना, वाकताना, चालताना ड्रेस वर उचलला जातो. त्यामुळे ट्रायल करताना खुर्चीवर बसून, वाकून, चालून बघा. शक्यतो गुडघ्याच्या लांबीचा ड्रेस उत्तम असतो.
  • तुम्हाला एरवी जीन्स घालायची सवय असेल, तर ड्रेस घालताना अवघडलेपणा जाणवतो. अशा वेळी तुम्ही स्टॉकिंग वापरू शकता. डे ड्रेससोबत न्यूड, स्कीन कलरची स्टॉकिंग वापरू शकता. ती उठून दिसत नाही.
  • बाजारात न्यूड रंगाच्या शॉर्ट लायक्रा पँट किंवा स्लॅक्स मिळतात. तुम्हाला ड्रेसमध्ये डान्स करायचा असेल किंवा फिरतीचं काम असेल तर या पँट वापरता येतात. त्यामुळे ड्रेस मध्येच उचलला गेल्याने येणारा अवघडलेपणा टाळला जातो.
  • ड्रेस वापरायची सवय नसल्यास शक्यतो हिल्सचा अट्टहास नको. कारण वावरताना कम्फर्ट राहणार नाही. बॅलरीना, फ्लॅट चप्पल वापरा. सध्या ड्रेससोबत स्नीकर्स वापरायचाही ट्रेंड आहे. तो ट्राय करू शकता.
  • लाँग जॅकेट किंवा श्रग डे ड्रेससोबत मस्त दिसतं. केप इव्हनिंग ड्रेसवर जुळून येतो.

–  मृणाल भगत

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to choose one piece dress

ताज्या बातम्या