रफल्स

सध्या ड्रेस, स्कर्ट, शर्ट, टॉप सगळ्या प्रकारांत रफल्सनी जागा पटकावली आहे.

सध्या रफल्सचा ट्रेण्ड प्रचंड गाजतोय. रफल्स म्हणजे झालर. वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात येणारी झालर हा ड्रेसमधील एक छोटासा भाग. सध्या टॉप आणि ड्रेसपासून इव्हनिंग गाऊनपर्यंत सगळ्यांमध्ये रफल्स दिसताहेत. रफल्सचा वापर कसा करावा याविषयी..

फॅशनच्या चक्रात दरवेळी नवे ट्रेण्ड्स येतात आणि जातात. सध्या ‘रफल्स’चा ट्रेंड प्रचंड गाजतोय. तसं पाहायला गेलं, तर हा रफल्स म्हणजे झालर. वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात येणारी झालर हा ड्रेसमधील एक छोटासा भाग. त्याचा ट्रेण्ड येणं, यात विशेष काही नाही. जगभरात हा ट्रेण्ड दिसतो. तमाम तरुणींच्या मनात दडलेली राजकुमारी रफल्सच्या ट्रेण्डला जबाबदार आहे. रोजच्या कॉलेज, ऑफिसच्या धावपळीत वेळ कसा निघून जातो कळत नाही. ऑफिसमधून घरी परत येताना आईचा हात धरलेली चिमुकली बसमधून जाताना दिसते. बागडताना तिचा इटुकला फ्रॉक उडताना दिसतो. त्या झालरी-झालरीच्या फ्रॉकमध्ये ती आणखी गोंडस दिसू लागते आणि आपण विचार करतो..  ‘गेले ते दिन.. हे दिवस परत मिळतील का?’ मग कुठे तरी कपाटातल्या टॉपचे रफल्स आपल्याला खुणावू लागतात. लहानपणी बागेत बागडणाऱ्या चिमुकलीच्या प्रत्येक गिरकीबरोबर उडणारी फ्रॉकची झालर थोडय़ाशा वेगळ्या स्वरूपात, काहीसे पोक्त बनून रफल्स म्हणून ड्रेसवर विराजमान होतात. म्हणूनच रफल्सची फॅशन तुमच्या स्वभावातील तो खोडकरपणा, स्वच्छंदी वृत्ती फोकसमध्ये आणते असं म्हणतात.

सध्या ड्रेस, स्कर्ट, शर्ट, टॉप सगळ्या प्रकारांत रफल्सनी जागा पटकावली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे रफल्स फेमिनाइन आहेत, बघता क्षणी लक्ष वेधून घेणारे आहेत. वेगवेगळ्या स्वरूपात ते पाहायला मिळतात आणि फॉर्मल्स ते पार्टीवेअपर्यंत वेगवेगळ्या लुक्समध्ये त्यांचा समावेश करता येतो. त्यामुळे रफल्सच्या वापराला काहीच बंधन नाही. सध्या ‘कोल्ड शोल्डर’ हा सगळ्यात मोठा ट्रेंड आहे. स्वभावातील आत्मविश्वास फोकसमध्ये आणायचा असेल तर खांदे फोकसमध्ये आणणे गरजेचे असते. ‘कोल्ड शोल्डर’ हा ट्रेण्ड नेमकं तेच करतो. यात एलिगंट रफल्स मोठी भूमिका पार पाडत आहेत. ऑफ शोल्डर, ड्रॉप शोल्डर ड्रेसेसमध्ये रफल्स प्रामुख्याने पाहायला मिळताहेत. मोठय़ाला रफल्सचा क्रॉप टॉप आणि हाय वेस्ट जीन्स तुमच्या एरवीच्या कॉलेज लुकला हटके ट्विस्ट देऊ  शकतो. रफल्स शर्टसोबत चेक्सची ट्राऊझर्स आणि किटन हिल्स म्हणजे एक परफेक्ट कॉर्पोरेट लुक. पेस्टल शेडचा ऑफ शोल्डर ड्रेस डे लुकसाठी मस्तच आणि एखाद्या ब्लॅक शिअर रफल्स शर्टवर ब्लॅक लेदर पेन्सिल स्कर्ट घाला – तुमचा डिस्को लुक तयार. तुमच्या आवडीनुसार हव्या त्या पद्धतीने रफल्स कॅरी करता येतात. त्यांच्यातील वेगळेपण उठून दिसतं. रफल्समुळे लुक वेगळा दिसतोच आणि त्याला छान फ्रेशनेससुद्धा मिळतो.

तुमच्या वॉर्डरोबमध्ये एखादा रफल्स ड्रेस यंदा हवाच. खरं तर ही फॅशन नवीन मुळीच नाही. सत्तरीच्या दशकापासून रफल्सनी फॅशनच्या दुनियेत ठाण मांडलंय आणि ‘आऊट ऑफ ट्रेण्ड’ जाण्याचं लक्षण पुढच्या कैक वर्षांत तरी दिसत नाही. बोअर होणं रफल्सच्या स्वभावातच नाही. त्यामुळे सध्या ट्रेण्ड आहे का, हा विचार रफल्सच्या बाबतीत करायची अजिबात आवश्यकता नाही. सध्या फॅशन डिझायनर्सपासून सेलेब्रिटींपर्यंत प्रत्येक फॅशनप्रेमी त्यांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे ‘गुगल’बाबांकडे रफल्स कॅरी करायचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेतच. त्यातला एक तुम्ही निवडू शकता किंवा तुमचा स्वत:चा युनिक लुक तुम्ही तयार करू शकता. पण रफल्सकडे वळण्यापूर्वी काही बेसिक ज्ञान आवश्यक आहे.

  •  ऑफ शोल्डर किंवा वन साइड शोल्डर ड्रेसमध्ये ड्रेसचे इलास्टिक चांगल्या प्रतीचे असेल, याची खात्री करून घ्या. ड्रेस तुमच्या खांद्यावर नीट बसणं गरजेचं आहे. अर्थात हे करताना लहान साइजचा ड्रेस निवडू नका. अतिघट्ट इलास्टिकने खांद्याला वण उठून अवघडलेपणा येऊ  शकतो.
  • शिफॉन, लेस, शिअर कापडात रफल्स मस्त दिसतातच. पण स्टिफ कापडातसुद्धा त्यांचा लुक वेगळा दिसतो. त्यामुळे डेनिम, कॉटनमध्ये रफल्स लुक नक्की ट्राय करा.
  • खांद्यावर रफल्स असतील, तर वेगळी ओढणी, स्कार्फ, नेकपीस किंवा श्रगची गरजही नसते. अर्थात या अ‍ॅक्सेसरीजचा वापर करताच येत नाही असं नाही. यांच्या मदतीने लुकला वेगळेपणा नक्कीच देता येईल.
  • तुमच्या रफल्सला वेगळेपणा आणायचा असेल, तर घरच्या घरी त्यांना टासल्स, लटकन, नाजूक लेस किंवा बीड्स लावू शकता.

पेस्टल शेडमध्ये रफल्स अधिकच खुलून दिसतात. एखादा सफेद कॉटन ड्रेस किंवा न्यूड शेडचा रफल्स शर्ट नक्कीच वॉर्डरोबमध्ये असू द्यावा. ऑफिस वेअरमध्ये लांब रफल्स तुम्हाला नको वाटत असतील तर शर्टसोबत एखादी डार्क शेडची पँट किंवा स्कर्ट टीम अप करा. न्यूड शेड शर्टसोबत ब्लॅक चेक्स ट्राऊझर्स हा हटके लुक होऊ  शकतो. गळ्यात एखादा छानसा नेकपीस घालूनही तुम्ही रफल्सवरचा फोकस किंचित कमी करू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raffles fashion

ताज्या बातम्या