एम्ब्रॉयडरीच्या दुनियेत

प्रत्येक एम्ब्रॉयडरीला जोडून एखादी कहाणीसुद्धा असते.

गावातली एखादी तरुणी शहरातील कॉलेजमध्ये आली की, तिला ‘गांव की छोरी’ म्हणत बाजूला टाकलं जातं. पण याच मुलींच्या पोतडीमध्ये सापडणारे पॅच वर्क, थ्रेड एम्ब्रॉयडरीचे कुर्ते शहरातील कुठल्याही मॉलमध्ये शोधूनही सापडणार नाहीत. पंजाब, दिल्ली भागातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या मुलींच्या वॉडरोबमध्ये एकदा नजर टाकली, तर फुलकारी, जरदोसी, थ्रेड एम्ब्रॉयडरीचे अनेक दुपट्टे, कुर्ते पाहायला मिळतात. बऱ्याचदा उत्तर भारतातल्या छोटय़ा गावांतून शहरांत शिकायला आलेल्या या मुली  घरी जाताना सोबत फुलकारी ओढण्या, पटियाला याच्या ऑर्डर्स घेऊनच जातात. आसाम, मिझोरम, मणिपूर आदी सात बहिणींच्या राज्यातून आलेले तरुणसुद्धा जाड, कॉटनचं थ्रेडवर्क केलेला झोला मिरवत असतात. भारतात प्रत्येक प्रांतात वेगवेगळी संस्कृती आहे, पण या सगळ्यांना एकत्र जोडणाऱ्या धाग्यांपैकी एक म्हणजे कपडे सजविण्यासाठी त्यावर घेतलेली मेहनत. अगदी डाइंगच्या पद्धतीपासून पेंटिंग्ज, एम्ब्रॉयडरी अशा विविध पर्यायांचा वापर यासाठी केला जातो. सध्या सणासुदीचा काळ आहे, त्यात हमखास पाहायला मिळणारा प्रकार म्हणजे एम्ब्रॉयडरी. त्याबद्दल आज थोडं बोलू या.

भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची एम्ब्रॉयडरी केली जाते. प्रत्येक एम्ब्रॉयडरीला जोडून एखादी कहाणीसुद्धा असते. पंजाबमध्ये मुलीच्या जन्मापासूनच तिची आई फुलकारीचा दुपट्टा विणायला सुरुवात करते, तो तिच्या लग्नासाठी. तसं पाहायला गेलं, तर एम्ब्रॉयडरी म्हणजे कपडय़ांना खुलविण्याचा एक प्रकार. कित्येकदा हे काम दागिनेही करतात आणि आपल्याकडे दागिन्यांच्या प्रकारांची वानवा नाही. तरीही हा खटाटोप का? तर पूर्वी चार घरातील बायकांना घरातील कामं आटपून एकत्र येण्यासाठी हे एक निमित्त असायचं. हळूहळू या निमित्तातून एक कला जन्माला आली. राजे, शाही परिवार यांचं वेगळेपण उठून दिसावं म्हणूनसुद्धा त्यांच्या कपडय़ांवर बारीक भरतकाम, महागडे खडे, जरी वापरून एम्ब्रॉयडरी केली जायची. एम्ब्रॉयडरी आज आपल्याही कपडय़ांमध्ये एक महत्त्वाचा भाग बनलेली आहे. गंमत म्हणजे कपडय़ांवरच्या या एम्ब्रॉयडरीसाठी कित्येकदा कारागिरांना फारसं सामानही लागत नाही. अगदी साध्याशा कॉटन, सिल्क धाग्यांपासूनही काचेच्या टिकल्या, जरी, खडे वापरून एम्ब्रॉयडरी खुलवता येते. प्रत्येक प्रांतातील एम्ब्रॉयडरी वेगळी असतेच पण ती कशा प्रकारच्या कपडय़ांवर वापरायची हेही बदलतं. सध्या नवरात्रीचा माहौल आहे, तर आपण गुजरात, राजस्थानपासून आपल्या एम्ब्रॉयडरी प्रवासाची सुरुवात करू या.

बानी, हीरभारत, आरीभारत : आपल्याकडील बहुतेक एम्ब्रॉयडरी प्रकारांचा उगम खेडय़ांमध्ये झाला. जाड, गडद रंगाचे कॉटनचे कपडे वापरायचे. अशा वेळी त्यावर केली जाणारी एम्ब्रॉयडरी ब्राइट शेड्सची आणि डोळ्यात भरणारी असणे गरजेचे होते. बानी किंवा आरीभारत एम्ब्रॉयडरीची हीच खासियत आहे. कॉटनवर सिल्कच्या रंगीबेरंगी धाग्यांनी केली जाणारी ही एम्ब्रॉयडरी पाहताच क्षणी लक्ष वेधून घेते. लाल, पिवळा, हिरवा, निळा, नारंगी अशा ब्राइट रंगांचा वापर यात केला जातो. बहुतेकदा शंख, मिरर वर्कसुद्धा यात वापरले जातात. चेन स्टीच आणि भौमितिक आकार यात पाहायला मिळतात. नवरात्रीतील घागरा, चनिया-चोलीमध्ये हीच एम्ब्रॉयडरी केली जाते. गुजरात, राजस्थानात ही एम्ब्रॉयडरी प्रामुख्याने पाहायला मिळते.

मिरर वर्क : गरबा खेळताना असंख्य चमचमणाऱ्या आरशांचा, टिकल्यांचा घागरा घातलेली तरुणी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. ही किमया आहे राजस्थानी मिरर वर्कची. हा प्रकार खरे तर चेन स्टीच एम्ब्रॉयडरीचा. पण मुबलक प्रमाणात काचांचे तुकडे, पत्रा (काचेने घागऱ्याचे वजन वाढते आणि नाचताना एखादा काचेचा तुकडा लागून दुखापत होण्याची शक्यता असते, त्यामुळे पत्रा वापरतात) यांचा वापर हे याचे मुख्य आकर्षण. गंमत म्हणजे हीरभारत, मिरर वर्क या ग्रामीण एम्ब्रॉयडरीचे प्रकार असल्याने त्यात काही प्रमाणात ओबडधोबडपणा पाहायला मिळतो आणि हाच त्याचा प्लस पॉइंट आहे.

बंजारा एम्ब्रॉयडरी : ग्रामीण एम्ब्रॉयडरीच्या गप्पा बंजारा एम्ब्रॉयडरीशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. गावोगावी भटकंती करत, करामतीचे खेळ सादर करत स्वत:चे पोट भरणारा  बंजारा समाज हा शहरांमध्ये पाहायला मिळतो. या समाजातील बायकांचे कपडे, दागिने हा कित्येकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. हीरभारत, मिरर वर्कशी साधम्र्य असलेल्या या एम्ब्रॉयडरी प्रकारात पत्रा किंवा काच मोठय़ा आकाराची असते. कित्येकदा अख्खी ओढणी, चोली या एम्ब्रॉयडरीने भरलेली असते, त्यामुळे तुम्हाला बेस कापडसुद्धा दिसत नाही.

गोटा वर्क  : तुम्हाला वजनाला हलका, पण तितकाच उठून दिसणारा घागरा किंवा साडी नेसायची असेल, तर गोटा वर्कला पर्याय नाही. बारीक जरीच्या रिबीनचा वापर ही या एम्ब्रॉयडरीची खासियत. जयपूर भागामध्ये केली जाणारी ही एम्ब्रॉयडरी राजस्थानी, मारवाडी समाजात खूप प्रसिद्ध आहे. आजही गोटा वर्क केलेल्या साडय़ा लग्न, सणसमारंभात आवर्जून नेसल्या जातात.

हे झाले काहीसे ग्रामीण, थोडासा रस्टिक टच असलेले एम्ब्रॉयडरीचे प्रकार. याच्या अगदी उलट प्रमाणबद्ध, नाजूक आणि बारकाईने केलेले एम्ब्रॉयडरीचे प्रकारही आपल्याकडे आहेत. त्यांना एक शाही टच आहे. त्यामुळे त्यांच्या गमतीजमतीसुद्धा वेगळ्या आहेत. त्यांच्याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊ.

हे एम्ब्रॉयडरीचे प्रकार केवळ आदिवासी, भटक्या जमाती, ग्रामीण भागापर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत. आपणही सहज रोजच्या वापरात या एम्ब्रॉयडरी वापरू शकतो. त्यासाठी काही टिप्स :

  • केवळ नवरात्रीसाठी नाही तर आरीभारत केलेले स्लीव्हलेस जॅकेट, ओढणी तुम्ही रोज एखाद्या प्लेन कुर्ता किंवा ड्रेसवर सहज वापरू शकता. सध्या आरीभारत एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाउज ट्रेण्डमध्ये आहे. सिंपल साडीवर ते खुलून दिसतात.
  • मिरर वर्कच्यादेखील ओढण्या, कुर्ते, जॅकेट बाजारात मिळतात. त्याशिवाय कुशन कव्हर, छत्री, पोटली बॅग, नेकपीस, जुतीमध्येही मिरर वर्क वापरले जाते.
  • वेस्टर्न ड्रेसवरसुद्धा एम्ब्रॉयडरी केलेली जॅकेट किंवा स्कार्फने ट्विस्ट आणता येतो.
  • नवरात्रीच्या काळात संपूर्ण बाजार या एम्ब्रॉयडरीच्या कपडे, अ‍ॅक्सेसरीजने खुलतो, त्यामुळे या काळात आवर्जून शॉपिंग करा.
  • संपूर्ण ड्रेस नाही पण हेम लाइन, नेकलाइन, स्लीव्हला बॉर्डर म्हणूनसुद्धा या एम्ब्रॉयडरी वापरता येतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Types of indian embroidery