उबदार लेअरिंग स्टाइल्स

विंटर ड्रेसिंगसाठी सगळ्यात आधी तुमच्या कपडय़ांच्या रंगाकडे लक्ष द्या.

हिवाळा हा ऋतू आवडणं किंवा न आवडणं, हा तसा वादाचा विषय आहे. कित्येकांना जराशीही थंडी सहन होत नाही, तर कित्येकजण ऑक्टोबर हीटनंतर येणाऱ्या थंडीची आतुरतेने वाट पाहत असतात. फॅशनप्रेमींसाठी हा ऋतू म्हणजे पर्वणी असते. कपाटात दडलेल्या खास ठेवणीतल्या उबदार स्वेटर्सपासून आधुनिक श्रग, लेदर जॅकेट, कोट बाहेर काढण्याची ही वेळ. लोकरीचे हातमोजे, पायमोजे, शाल यांच्यात स्वत:ला गुरफटून हातात वाफाळत्या कॉफीचा मग घेऊन दिवसभर घराच्या एका कोपऱ्यात छान पुस्तक वाचत किंवा एखादा सुंदर सिनेमा बघत राहण्याचं प्लॅनिंग सुरू होतं, अर्थात तेवढी थंडी असेल तर.

मुंबईला तसं हिवाळ्याचं फारसं कौतुक नसतं. पहाटे पडणारा थोडासा गारवा आणि सकाळी ट्रेनमध्ये गारठवणारा वारा याच्या पलीकडे थंडीची फारशी जाणीव दिवसभरात होत नाही. पण म्हणून आपल्या लुकमध्ये विंटर स्टाइलचा उबदारपणा आणायचा नाही, असा नियम नाही. आपले रोजचेच कपडे थोडय़ा वेगळ्या पद्धतीने वापरून, लेअरिंगची मदत घेत विंटर लुक तयार करू शकता. आधी म्हटल्याप्रमाणे जसजसा सूर्य डोकं वर काढू लागतो, तसतशी थंडी गुडूप होते, त्यामुळे लेअरिंग करताना जाड, घाम येईल असं कापड वापरणं टाळायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी हवं तर अ‍ॅक्सेसरीजची मदत घेता येईल. एखाद्या वेळी बॅगेचं वजन वाढेल, पण कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है..

विंटर ड्रेसिंगसाठी सगळ्यात आधी तुमच्या कपडय़ांच्या रंगाकडे लक्ष द्या. रंगांमधून उबदारपणा जाणवला, की अर्धी मोहीम फत्ते होते. डार्क, वॉर्म रंग या काळात वापरा. काळा, ग्रे, मरून, नेव्ही, मेहेंदी ग्रीन, बॉटल ग्रीन, मस्टड यल्लो, डार्क नारंगी, मॅट गोल्ड अशा शेड्स वॉडरोबमध्ये असू द्या. लुक हायलाइट करण्यासाठी तुम्ही ब्राइट शेड्स वापरू शकता. चेक्स, स्ट्राइप्स मस्ट आहेत. जितक्या मोठय़ा तितक्या उत्तम. भौमितिक पॅटर्न हवेतच. तुम्ही इक्कत प्रिंट्स वापरू शकता, सध्या याचा ट्रेंड इन आहे.

आपल्याला केवळ उबदारपणाचा लुक द्यायचाय, त्यामुळे तुमचं कापड नीट निवडा. नाहीतर थंडीतसुद्धा घामाच्या धारा निघतील. वुलन, लेदर यांचा वापर हवा, पण किती प्रमाणात आणि कोणत्या स्वरूपात तेही ठरवलं पाहिजे. तुमच्या शहरात थंडी कितपत आहे आणि कुठल्या वेळेला बाहेर पडणार आहात, यानुसार कापडाचा चॉइस असला पाहिजे. मुंबईसारख्या शहरात कॉटन, जर्सी, लिनन, मलमल, हे कापड या वेळी उत्तम ठरेल. यांच्यामुळे लेअरिंगमध्येही सुटसुटीतपणा आणता येईल. सध्या बाजारात लूझ टॉप्स, क्रॉप टॉप्स, क्रोशा टॉप्स आले आहेत, लेअरिंगसाठी हे उत्तम ठरतात. अर्थात लेअरिंग करताना रंगांचा ताळमेळ जुळवणं, फिटिंग, लुक यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे लुक कसा दिसतोय हे एकदा आरशात तपासा, हवं तर तुमच्या स्टाइल एक्स्पर्ट मैत्रिणीची किंवा ताईची मदत घ्या. मग तुम्ही हा विंटर गाजवणार यात शंका नाही.

लेअरिंगच्या काही वॉर्म टिप्स :

  • लेअरिंग करताना नक्की किती लेअर्स तुम्ही व्यवस्थित कॅरी करू शकता हे माहीत असणं गरजेचं आहे. सुरुवात दोन लेअर्सनी करा. हळूहळू तीन ते चार लेअरिंगचा टप्पा पार कराल.
  • पहिला लेअर डार्क शेडचा असूद्यात. त्यामुळे लुक बल्की वाटणार नाही. तुम्ही हेवी वेट असाल तर लेअरिंगने जास्त जाड झाल्याचं वाटतं. ते जाणवणार नाही.
  • दोन डार्क शेड्समध्ये एखादी पेस्टल किंवा व्हाइटची शेड टाकल्यावर दोन्ही रंग उठून दिसतात. उदाहरण घ्यायचे झाल्यास गडद रंगाच्या शर्टवर डार्क ब्ल्यू डेनिम जॅकेट घालायचं असेल, तर जॅकेट आणि शर्टच्यामध्ये एक सफेद स्कार्फ किंवा लूझ शर्ट घाला. लेअरिंगची गंमत अजून वाढते.
  • क्रॉप टॉपच्या आत कॉन्ट्रास्ट लांब गंजी घालून वर मस्त श्रग घेता येऊ शकतो.
  • एखाद्या प्लेन स्कार्र्फला चेन्स, नेकपीस जोडून छान सजवा. सिंपल शर्टवरसुद्धा हा स्कार्फ मस्त दिसेल. वेगवेगळ्या उंचीचे नेकपीससुद्धा लेअरिंगमध्ये महत्त्वाचा रोल पार पाडतात.
  • लेअरिंगमध्ये प्रिंट्स वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते. एकतर एकाच स्वरूपाचे प्रिंट्स निवडा. आत भौमितिक प्रिंट्स आणि त्यावर फ्लोरल प्रिंट अशी सरमिसळ करू नका. प्रिंटसोबत सॉलिड रंग वापरताना प्रिंटमधली विरुद्ध रंगछटा वापरू शकता. त्यामुळे दोन्ही कपडे फोकसमध्ये येतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Warm learning styles

Next Story
रफल्स
ताज्या बातम्या