अगदी सकाळची वेळ. एका खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा सशस्त्र ताफा निघाला आहे. आरोपीच्या घराला वेढा घातला जातो, दार तोडून पोलीस आत घुसतात. आता कुठल्याही क्षणी एखादा अट्टल गुन्हेगार समोर येईल अशी सगळ्यांचीच तयारी…, पण दिसतो फक्त १३ वर्षांचा जेमी मिलर. त्याच्या भेदरलेल्या, निरागस चेहऱ्याकडे पाहून हा मुलगा कुणाचा खून करू शकेल, यावर आपलाही विश्वास बसत नाही. जेमीला अटक होते आणि चौकशी सुरू होते. यातून उलगडत जाणारी कथा म्हणजे ‘नेटफ्लिक्स’वरील अत्यंत गाजलेली ‘अडोलसेन्स’ ही वेब सिरीज. यात किशोरवयीनांच्या जगातल्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागतात. सायबर बुलिंग ही यातली प्रमुख धोकादायक बाब.
कदाचित ही वेब सीरिज पाहताना इतक्या टोकाचं सायबर बुलिंग फक्त पाश्चात्त्य देशातच होत असेल असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात सायबर बुलिंगचा धोका सीमारेषा ओलांडून जगात सर्वत्र सारख्याच वेगाने वाढतो आहे. ‘ CYBER B. A. A. P.’ ( सायबर बुलिंग अवेअरनेस, अॅक्शन अँड प्रीव्हेन्शन) या संस्थेनुसार सायबर बुलिंगच्या घटनांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. बातम्यांमधून समोर येणाऱ्या सततच्या अशा काही घटना पाहिल्या की या समस्येची भयावहता जाणवते.
बुलिंग म्हणजे गुंडगिरी करत केलेली छळवणूक. टीनेजर्समध्ये तसा हा नवीन प्रकार नाही. शाळा, कॉलेज किंवा अगदी दैनंदिन प्रवासातही अनेकांना अशा वागणुकीचा सामना करावा लागतो. कुणाला मुद्दाम चिडवणे, ढकलणे किंवा गटातून बाहेर ठेवणे ही सर्व बुलिंगचीच रूपं. पण, हीच छळवणूक जेव्हा सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स, गेमिंग प्लॅटफॉर्म किंवा इतर ऑनलाइन साधनांवर केली जाते, जेव्हा एखाद्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जातो, अपमान केला जातो किंवा मानसिक ताण दिला जातो तेव्हा त्याला सायबर बुलिंग म्हणतात.
साध्या बुलिंगचा त्रास बहुतेक वेळा शाळा, हॉस्टेल किंवा एखाद्या ठरावीक जागेपुरताच मर्यादित असतो, पण सायबर बुलिंग कुठेही, कधीही ऑनलाइन घडू शकतं. ऑनलाइन टाकलेली कोणतीही गोष्ट शेअरिंगमुळे क्षणात सर्वत्र पसरते आणि डिलीट केली तरी स्क्रीनशॉट्समुळे कायम राहू शकते. त्यात खोट्या किंवा अनामिक आयडीचा आधार घेऊन छळ करणं आणखीन सोपं होतं. शिवाय, इथे एक – दोन नव्हे, तर शेकडो लोक एकाच वेळी हसतात, टोमणे मारतात किंवा चिथावतात, त्यामुळे अपमानाची व्याप्ती अनेक पटीने वाढते. म्हणूनच साध्या बुलिंगपेक्षा सायबर बुलिंग अधिक धोकादायक आणि घातक ठरतं. सायबर बुलिंग अनेक प्रकारे घडतं. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एखाद्याला वारंवार त्रासदायक, द्वेषपूर्ण किंवा अश्लील मेसेजेस पाठवत छळ करणं (Harassment) हे त्यातील सर्वात सामान्य रूप. २०२३ मध्ये उज्जैनमधील १६ वर्षांच्या दहावीतील प्रियांशु यादवला सोशल मीडियावर हजारो अवमानकारक कमेंट्स येऊ लागल्या; या सततच्या ऑनलाइन छळामुळे त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
एखाद्याला मुद्दाम सतत चिथावणी देणे, अपमानास्पद कमेंट करून भांडण उकरून काढणे (Flaming) हेदेखील सायबर बुलिंगचाच प्रकार. ११ वीतला समीर एका गेमिंग ग्रुपमध्ये होता. एका छोट्याशा चुकीनंतर ग्रुपमधील काही सदस्यांनी त्याला ‘लूझर’,‘नूब’ अशा कमेंट्स करून सतत हिणवायला सुरुवात केली. खासगी चॅट्स, फोटो किंवा संवेदनशील माहिती संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय इतरांना पाठवणे किंवा सार्वजनिक करणे हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. त्यात आणखी गंभीर रूप म्हणजे Doxing ज्यात एखाद्याचा मोबाइल नंबर, घरचा पत्ता किंवा पालकांची माहिती असा सारा तपशील ऑनलाइन टाकून खासगीपण प्रत्यक्ष धोक्यात आणलं जातं. फोटो एडिट करून, मॉर्फिंग करून त्यात विनोदी, अपमानास्पद किंवा अश्लील संदर्भ जोडणे (फोटो मॉर्फिंग) हादेखील वेगाने वाढणारा सायबर बुलिंगचा प्रकार आहे. २०२४ मध्ये दिल्लीच्या वसंतकुंजमधील एका नववीतील विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. त्याने वर्गातील १३ विद्यार्थ्यांचे आणि एका शिक्षिकेचे फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला आणि मित्रांमध्ये फिरवला होता.
एखाद्याची ओळख लपवून, बनावट अकाउंटमधून त्याच्याच नावाने अपमानास्पद पोस्ट करणे (Impersonation / Catfishing) यामुळे त्या मुलाची प्रतिमा खराब होते. अनेकदा अशा फेक अकाउंट्सद्वारे खोटी मैत्री, प्रेम किंवा नात्याचं आमिष दाखवून किशोरवयीन मुलांना फसवलं जातं. कधी कधी रागातून किंवा बदला घेण्यासाठी खासगी फोटो, चॅट्स किंवा स्क्रीनशॉट्स सार्वजनिक करणं (रिव्हेंज पोस्टिंग) हा सायबर बुलिंगचा अत्यंत गंभीर प्रकार ठरतो, विशेषत: किशोरवयीन नात्यांमध्ये याचं प्रमाण अधिक आढळतं. आणि हे सगळं न करतासुद्धा सायबर बुलिंग होऊ शकतं. डिजिटल माध्यमातील कुठल्याही ग्रुपमधून एखाद्याला मुद्दाम बाहेर ठेवणं (एक्स्क्लुजन) हेसुद्धा मानसिक छळवणुकीचं एक रूप आहे. बाल व कुटुंब मानसतज्ज्ञ गुंजन कुलकर्णी सायबर बुलिंगचं गांभीर्य सांगताना म्हणतात, मित्रमंडळींची मजामस्ती, मस्करी इतका हा विषय साधा नाही आहे. सायबर बुलिंगचे दीर्घकालीन आणि गंभीर मानसिक परिणाम होऊ शकतात. विशेषत: स्व-प्रतिमा (सेल्फ-इमेज) विकसित होत असलेल्या किशोरवयीन मुलांच्या मनावर या छळवणुकीचा खोलवर घाव बसतो.
बुलिंग करणाऱ्यांचा उद्देशच समोरच्याला जाणीवपूर्वक दुखावण्याचा असल्याने शरीरयष्टी, रंगरूप, वजन, बोलण्याची ढब, अगदी चारित्र्याबद्दलही अपमानास्पद, अर्वाच्य भाष्य केले जाते. किशोरवयीन मुलं मुळातच त्यांच्या बॉडी-इमेजबद्दल संवेदनशील आणि असुरक्षित असतात. त्यामुळे अशा प्रकारचे ऑनलाइन टोमणे, मीम्स किंवा कमेंट्स त्यांच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकतात. त्यातून एकलकोंडेपणा, सामाजिक अलिप्तता, स्वत:विषयी न्यूनगंड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यातून भीती, असुरक्षितता, चिंता (अँक्झायटी) आणि नैराश्य (डिप्रेशन) वाढीस लागू शकतं. यातूनच पुढे आत्महत्येचे विचार आणि प्रत्यक्ष आत्महत्या असे अतिशय गंभीर परिणामदेखील होताना दिसतात. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी वेळीच यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे, असंदेखील त्या नमूद करतात.
CYBER B. A. A. P. या संस्थेच्या अभ्यासानुसार, सायबर बुलिंगला बळी पडलेल्या १० पैकी फक्त १ किशोरच ही गोष्ट आपल्या पालकांना सांगतो. उरलेली मुलं भीती, लाज, अपराधीपणा किंवा परिस्थिती आणखी बिघडेल या कल्पनेमुळे पूर्णपणे गप्प बसतात. ‘हे सांगितलं तर पालक फोन काढून घेतील’ ही धास्ती, तसंच मित्र गमावण्याची भीती ही त्यामागची प्रमुख कारणं म्हणता येतील. त्यामुळेच त्यांच्या वर्तणुकीतील बदल ओळखून पालकांनीच संवेदनशीलतेने पुढाकार घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. सायबर बुलिंगचे संकेत किशोरांच्या दैनंदिन वागण्यात हळूहळू दिसू लागतात.
आधी सतत मोबाइल वापरणारी मुलं अचानक सोशल मीडियापासून दूर राहू लागतात, मेसेज आला की तणावग्रस्त होतात किंवा फोन हातात घेतानाही घाबरतात. शाळेला जाण्याची इच्छा कमी होऊ शकते. मित्र, खेळ, इतर उपक्रम या सगळ्यांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढते आणि मुलं एकाकीपणाकडे झुकू लागतात. बऱ्याचदा चिडचिडेपणा, अचानक मूड बदलणं, भूक न लागणं अशी भावनिक लक्षणंही दिसू लागतात. स्वत:बद्दल नकारात्मक विचार वा बोलणं वाढीस लागतं. गंभीर परिस्थितीत मुलं निराशा व्यक्त करतात, स्वत:ला दोष देऊ लागतात किंवा आत्महानीसारख्या धोकादायक विचारांचे संकेत देऊ लागतात. ही सर्व चिन्हं पालक आणि शिक्षकांनी वेळेवर ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
सायबर बुलिंग झालं असल्याची कबुली मिळाल्यानंतर पालकांची शांत आणि समजूतदार प्रतिक्रिया सर्वात महत्त्वाची असते. रागावणं, फोन काढून घेणं किंवा मुलालाच दोष देणं या गोष्टी टाळणं गरजेचं ठरतं. मुलाचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी त्याला भावनिक आधार देणं, त्याची भीती आणि लाज कमी करणं, तसंच पुढची पावलं एकत्र कशी उचलणार आहोत हे समजावून सांगणं आवश्यक आहे. पुरावे (स्क्रीनशॉट्स, चॅट्स) सुरक्षित ठेवून, शाळेशी किंवा संबंधित प्लॅटफॉर्मशी संपर्क साधणं आणि आवश्यक असल्यास सायबर क्राइम सेलशीही चर्चा करणं हा त्यावर योग्य मार्ग ठरतो.
सायबर बुलिंगमध्ये ‘बळी’ आणि ‘बुलिंग करणारे’ दोन्ही भूमिकांमध्ये बहुतांश वेळा किशोरवयीन मुलं दिसून येतात. किशोरवयीन मुलं जाणूनबुजून किंवा नकळत सायबरबुली का बनतात? यामागे अनेक सामाजिक, भावनिक आणि डिजिटल कारणं दिसून येतात. लोकप्रिय व्हायची इच्छा, ग्रुपमध्ये आपली छाप पाडण्याची धडपड किंवा ‘कूल’ दिसण्याची गरज त्यांना कधी कधी अशा चुकीच्या वर्तनाकडे ढकलते. फक्त मजेत केलेली कृतीही कोणाला किती खोल दुखावू शकते, याची त्यांना कल्पना नसते. काही वेळा राग, निराशा किंवा आधी झालेल्या अपमानाचा बदला घेण्याच्या भावनेतून मुलं सायबर स्पेसमध्ये आक्रमक होतात. ऑनलाइन जगात मिळणारी अनामिकता (anonymity) आणि ‘इथे काही केलं तरी शिक्षा होणार नाही’ ही चुकीची समजूत त्यांचा धीर वाढवते. परिणामी, त्यांच्याकडून गंभीर गुन्हेदेखील घडू शकतात.
यामुळे सायबर बुलिंग होऊ नये यासाठी पालक, शाळा – कॉलेज यांच्याकडून आधीपासून प्रयत्न होणं महत्त्वाचं ठरतं. सायबर सेफ्टी, सायबर कायदे आणि ऑनलाइन जबाबदारी याबद्दल वेळेवर शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन केलेली एखादी चुकीची कृतीही कायदेशीर गुन्ह्यात बदलू शकते, याचं गांभीर्य मुलांना स्पष्टपणे समजणं गरजेचं आहे. घरी पालकांनी मुक्त संवाद ठेवणं, तर शाळा – कॉलेजेसनी या विषयावर नियमित सत्र घेणं आणि तक्रारी हाताळण्यासाठी स्पष्ट, संवेदनशील प्रणाली ठेवणं आवश्यक आहे. पालक – शाळा – विद्यार्थी यांच्या अशा संयुक्त प्रयत्नांतूनच सायबर बुलिंग प्रभावीपणे रोखता येऊ शकतं.
डिजिटल जगापासून अलिप्त राहणं नक्कीच शक्य नाही आणि ते व्यवहार्यही नाही, पण त्याचा वापर किती जबाबदारीने केला जातो हेच सर्वात महत्त्वाचं ठरतं. सायबर बुलिंगचा बळी किंवा बुली… दोन्हीही होऊ नये यासाठी मुलांना ऑनलाइन जगातील जबाबदारीची जाणीव, योग्य वर्तनाची समज आणि इथल्या धोक्यांची स्पष्ट कल्पना देणं आवश्यक आहे. ‘बळी तो कान पिळी’ ही म्हण डिजिटल जीवनातील सर्वमान्य वास्तव बनू नये यासाठी हे प्रयत्न आवश्यक ठरतात.
viva@expressindia.com
