लग्नसराई सध्या जोरदार सुरू आहे. आताचा काळ हा जेन्झी लग्नांचा आहे, म्हणजे लग्न हा फक्त दोन दिवसांचा विधी राहिला नसून एक मोठा इव्हेन्ट झाला आहे. मेंदी, संगीत, साखरपुडा, हळद या सगळ्यासाठी वेगवेगळे दिवस ठेवले जातात, प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे कपडे, लुक, दागिने याचे अगदी आधुनिक-पारंपरिक असं मिक्स स्टायलिंग असतं. जेन्झीच्या भव्य लग्न सोहळ्याच्या प्रत्येक घटकाला आज नवा, आकर्षक आणि स्टायलिश आयाम मिळतं आहे. हे लग्नसोहळे फक्त स्वतःपुरते मर्यादित नसून इन्स्टा-वर्दीसुद्धा व्हायला हवेत, हा तरुणाईचा आग्रह असतो. या अनुषंगाने सध्या नेमके काय ट्रेंड्स प्रचलित आहेत याचा आढावा घेऊया.

मेंदीच्या दिवशीचा ट्रेण्ड

मेंदी समारंभासाठी जेन्झीची फॅशनची निवड आणखीनच एक्सपिरिमेंटल, रंगतदार आणि इन्स्टा-फ्रेंडली झाली असल्याचं लक्षात येतं. पारंपरिक लेहेंगा किंवा सलवार सूटपुरतं मर्यादित न राहता आजची तरुण पिढी फ्लोरल प्रिंटेड को-ऑर्ड सेट्स, इंडो-वेस्टर्न ड्रेप स्कर्ट्स, क्रॉप टॉप्स, केप-स्टाईल श्रग्स किंवा हलके, फ्लोई पेस्टल शरारा सेट्स निवडताना दिसते, जेणेकरून एक कूल आणि युथफुल लुक त्यांना मिळेल. ब्लिंगचा वापर कमीतकमी ठेवत, सिक्विन्स, मिररवर्क सारखी सजावट असलेले कपडे अधिक लोकप्रिय झाले आहेत. मेंदी काढण्यासाठी बसताना आराम मिळावा म्हणून कॉटन, ऑर्गेन्झा, जॉर्जेट किंवा लिनेन अशा हलक्या फॅब्रिक्सना विशेष मागणी आहे. मुलींच्या स्टायलिंगमध्ये मिनिमल ज्वेलरी, फ्लोरल हेअर ॲक्सेसरीज, मऊ वेव्ही हेअरस्टाईल ट्रेंडमध्ये आहेत. पुरुषांची फॅशनही फ्युजनकडे अधिक झुकलेली दिसते. फ्लोरल कुर्ते, कॉटन को-ऑर्ड सेट्स, ओव्हरसाइज्ड शर्ट्स विथ एम्ब्रॉयडर्ड पॅचेस किंवा पेस्टल नेहरू जॅकेट्सना सध्या मेंदी कार्यक्रमासाठी खास मागणी आहे.

मेंदीचा सोहळा खरं तर मुख्यतः मुलीकडच्या बाजूने जास्त जोरदार असायचा, परंतु आता नवरदेवाच्या बाजूने, त्याची आई, बहिणी, मैत्रिणीसुद्धा तितक्याच जोशात हा सोहळा साजरा करतात. या दिवशी बहुतेक वेळा, हिरव्या रंगाच्या शेडचे कपडे ट्रेंडमध्ये असतात. सध्या मराठी सेलेब्रिटींमध्ये पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी या अभिनेत्रींनी त्यांच्या मेंदी सोहळ्यात सुरेख असे हिरव्या रंगाचे गाऊन्स परिधान केले होते. हिरवा रंग जरी प्रचलित असला तरी तुम्हाला थोडं ट्रेण्डपेक्षा वेगळं करायचा असेल तर नवरी मुलीच्या अंगावर केशरी रंगाचे कपडेसुद्धा अतिशय खुलून दिसतात. शिवाय, सध्या मल्टी कलर स्कर्ट-टॉप, शॉर्ट लेहेंगासुद्धा भरपूर ट्रेंडमध्ये आहेत. या सोहळ्यात हातावर पूर्ण मेंदी काढायची असल्याने दागिन्यांवर जास्त भर दिला जात नाही, त्यामुळे कपडे थोडे भरजरी असले तर ते छान उठून दिसतात.

हळदीसाठी ट्रेंडी कपडे

आजच्या पिढीचा विशेषतः जेन्झीचा हळदी समारंभाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः वेगळा आणि अत्यंत ट्रेंडी आहे. पारंपरिक पिवळ्या कपड्यांपलीकडे जाऊन ते आता फ्युजन, फंकी आणि फोटो-फ्रेंडली लुक्सना अधिक महत्त्व देतात. मुली हलक्या, फ्लोई शरारा-सेट्स, कॉटन-अनारकली, मिररवर्क टॉप्स किंवा बोहो स्कर्ट्सला पांढरा-पिवळा कॉम्बिनेशन देऊन ग्लॅम लुक तयार करतात. काहीजणी फ्लोरल को-ऑर्ड सेट्स किंवा हळदीने डाग पडले तरी स्टाइल न बिघडणारे लिनेन-कोट सेट्सही निवडतात. हल्ली बरेच मराठी सेलेब्रिटी हळदीच्या दिवशी अगदी प्लेन पांढऱ्या रंगाचे कपडे घालतानाही दिसतात. अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि शिवानी सोनार यांनी हळदीला प्लेन पांढरे कपडे परिधान केले होते. हळदीला फ्लोरल दागिने नवरी मुलगी घालते, त्यामुळे त्याच्या जोडीला रंग कुठलाही असला तरी प्लेन कपडेच चांगले दिसतात. मुलांची फॅशनही तितकीच हटके असते. कुर्ता-जॅकेट सेट्स, मस्टर्ड को-ऑर्ड्स, फ्लोरल नेहरू जॅकेट्स किंवा ओव्हरसाइज्ड कुर्ता-धोती हे आजचे लोकप्रिय पर्याय आहेत. याशिवाय, हळदीमध्ये प्रॅक्टिकॅलिटी आणि ॲस्थेटिक्सला महत्त्व देत असल्याने ते मिनिमल ॲक्सेसरीज, फ्रेश फ्लोरल ज्वेलरी, कूल सनग्लासेस आणि कॅनव्हास फुटवेअर अशा कॉम्बोजकडे आकर्षित होतात. सोशल मीडियावर उठून दिसणारे रंग, कॅज्युअल-फ्रेंडली फॅब्रिक आणि कम्फर्ट व स्टाइलचा उत्तम बॅलन्स साधत केलेली ही फॅशन आता हळदी समारंभाची फॅशन म्हणून वेगळी ओळखली जाऊ लागली आहे.

ग्लॅमरस संगीत

संगीत हा प्रकार बऱ्यापैकी पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आला आहे, हल्ली लग्नांमध्ये हा सगळ्यात लोकप्रिय आणि आवडता प्रकार आहे, किंबहूना हा सोहळा संपूर्ण लग्न सोहळ्याचा हायलाइट असतो. कोरिओग्राफ्ड परफॉर्मन्सेस, कपल डान्स, थीम एन्ट्रीज आणि सोशल-मीडिया-फ्रेंडली क्षण यातून त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्त्व मांडता येतं. चकचकीत फॅब्रिक, शिमरी किंवा सिंगरीन काम असलेले लहंगा-साडी, मेटॅलिक शेड्समधील साड्या आणि गाऊन-साडी यांना प्रचंड मागणी आहे, कारण त्या रात्रीच्या पार्टी वातावरणासाठी उत्तम पूरक ठरतात. तरुण पिढी फ्युजन इंडो-वेस्टर्न स्टाइललाही मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसते. स्कर्ट-टॉप, पॅन्ट-कुर्ता, केप किंवा जॅकेट-स्टाईल लहंगा यांसारख्या डिझाइन्स त्यांच्या आधुनिकतेच्या आवडीची झलक दाखवतात. हलके, हवेशीर आणि सहज नृत्य करता येईल अशा फॅब्रिक्सचे नेट, ऑरगँझा आणि फ्लोई ड्रेप्स यांचा वापर अधिक केला जातो.

कपड्यांच्या रंगामध्येही मोठा बदल दिसतो. पारंपरिक मरून-गोल्डच्या पुढे जात आज जूल टोनचे एमरल्ड ग्रीन, रॉयल ब्लू, वाइन, पर्पल तसेच सिल्व्हर आणि रोज-गोल्डसारखे मेटॅलिक रंग लोकप्रिय झाले आहेत. डिझायनर प्री-ड्रेप्ड आणि डोटी-ड्रेप साड्या, गाउन-साड्या व फ्युजन ड्रेप्स यांना आधुनिक आणि परिधान करणं अत्यंत सोईचं असल्याने अधिक पसंती मिळते. निर्माता-अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या संगीत सोहळ्यात पूजाने संपूर्ण अंबर व्हाइट रंगाची लेहेंगा साडी नेसली होती. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेसुद्धा तिच्या संगीत सोहळ्यात डार्क जांभळा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. हल्ली आई आणि मुलीच्या कॉम्प्लिमेंटरी फॅशनचाही ट्रेंड या सोहळ्यात पाहायला मिळतो.

लग्न आणि रिसेप्शन

मुख्य लग्नसोहळा आणि स्वागत समारंभ हे तर खास क्षण असल्याने त्या वेळी अधिक स्टायलिश दिसण्यावर भर असतो. पारंपरिकता राखत त्यात आधुनिक सौंदर्यशैली आणि मिनिमलिस्ट ग्लॅमर मिसळणं सध्या लग्नाच्या फॅशनमधला ठळक ट्रेंड म्हणता येईल. त्यामुळे लग्नाच्या दिवशी नववधू हेवी ब्राइडल लुकपेक्षा सॉफ्ट, एलिगंट आणि पर्सनॅलिटी-ड्रिव्हन स्टाइलला प्राधान्य देताना दिसतात. रेड किंवा मरून रंगाला पसंती असतेच, पण त्यासोबत पेस्टल पिंक, रस्ट ऑरेंज, राणी गुलाबी, आयव्हरी-गोल्ड असे सॉफ्ट टोन अधिक लोकप्रिय आहेत. लेहेंग्यातही अतिशय जड काम टाळून फाइन झरी, सीक्विन्सची नाजूक सजावट, किंवा हँड-एम्ब्रॉयडरी असलेले फॅब्रिक्स पसंत केले जातात. दागिन्यांमध्ये जड दागिन्यांपेक्षा स्टेटमेंट मांगटिक्का, थोडे साऊथ लुक देणारे दागिने, मॉडर्न चोकर किंवा मिनिमलिस्ट कुंदन यांना जास्त मागणी आहे. तर नवरदेवाची ब्राइडल फॅशनही फ्युजन-फॉरवर्ड असते. क्लासिक शेरवानी -पेस्टल रंग, एम्ब्रॉयडर्ड स्टोल किंवा स्लीक बंदगळा हा आत्ताचा मुख्य ट्रेंड आहे.

रिसेप्शनसाठीही अनेकदा ग्लॅम-मीट्स-कंफर्ट अशा पद्धतीनेच फॅशन केली जाते. शीमर साड्या, मॉडर्न कटचे गाउन, मेटॅलिक ड्रेप्स किंवा स्लीक मरमेड गाउन हे प्रमुख पर्याय आहेत. हे पोशाख हलके, कॅमेरा-फ्रेंडली आणि एलिगंट असल्याने त्यांना मोठी पसंती मिळते. हेअरस्टाईलमध्ये स्लीक बन, हॉलीवूड वेव्ह्ज किंवा मिनिमल फ्लोरल ॲक्सेसरीजचा, अगदी खऱ्या फुलांचा आणि गजऱ्यांचासुद्धा वापर अधिक दिसतो. तर पुरुषही टक्सीडो, वेल्वेट ब्लेझर, मोनोक्रोम सूट्स किंवा प्रिंटेड बंदगळा अशा पर्यायांचा निवड करताना दिसतात. शालूचा ट्रेंडही परत आला आहे आणि त्याचे कॉम्बिनेशन बऱ्याच वेळा लग्नांमध्ये पाहायला मिळते. हल्लीचे लग्नसोहळे बंदिस्त हॉलमध्ये न करता, खुल्या वातावरणात असतात. त्यामुळे दिवसा आणि रात्री कपडे कसे दिसतील यानुसार स्टायलिंग केलं जातं. लग्नातील प्रत्येक लुक हा नव्या पिढीसाठी आत्मविश्वास, अभिरुची आणि व्यक्तिमत्त्व व्यक्त करणाऱ्या स्टाइल स्टेटमेंटचं माध्यम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या फॅशनपासून सजावटीपर्यंत, संगीतापासून रिसेप्शनपर्यंत प्रत्येक घटकात स्टाइल, सौंदर्य आणि आत्मविश्वासाचा ठसा दिसतो. जुन्या परंपरेत नवे प्रयोग मिसळत त्यांनी भारतीय लग्नसंस्कृतीला एक आधुनिक, आकर्षक आणि व्यक्तिमत्त्वपूर्ण वळण दिलं आहे. त्यामुळे त्यांची लग्नातली फॅशन इन्स्टा-वर्थी असली तरी सगळ्यांना मनापासून आवडते.