– स्नेह एरंडे

आपण रोजच्या बोलण्यात किती सहज काही शब्दांना नवे अर्थ देत असतो, याचं एक भारी उदाहरण म्हणजे Cooked (कुक्ड). जेवणाच्या संदर्भात Cooked म्हणजे अन्नपदार्थ शिजवून खाण्यायोग्य बनवणं, पण आमच्या पिढीच्या भाषेत याचा काही भलताच अर्थ घेतला जातो. आमच्या दृष्टीने Cooked या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आपण अडचणीत आहोत, असा आहे. आणि ती अडचण साधी सोपी नाही; कधी कधी ती इतकी गंभीर, आश्चर्यकारक आणि जवळजवळ न सुटणारी वाटते की आपण हसत म्हणतो, “अरे बापरे, आपण Cooked आहोत!”

‘कुक्ड आहोत’ हे म्हणताना चेहऱ्यावर येणारी ती हलकीशी स्मर्क हीच या शब्दाची खरी मजा आहे. कारण Cooked हा शब्द अडचणींशी अजिबात जुळत नाही. तो इतका अनरिलेटेड आहे की, मेंदूला एकदम कर्व्हबॉल बसतो. थोडक्यात, एकदम अनपेक्षित धक्का बसतो आणि त्या क्षणी भीती कमी होते. म्हणजे परिस्थिती तणावाचीच असते, पण आपण तो ताण थोडा हलका करण्याच्या प्रयत्नात असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या मोठ्या कामाची, प्रकल्पाची डेडलाइन जवळ आली आहे, प्रेझेंटेशनला दोनच मिनिटं आहेत आणि अचानक कळतं की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मोठा बग सापडला आहे. आता जे घडलं आहे ‘ते दोन मिनिटांत ठीक होईल’ अशी आशाच नाही. मग कुणी तरी एकदम म्हणतं, “ओह माय गॉड, आपण Cooked आहोत.” आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणवते एक छोटीशी स्मर्क. जणू आपण स्वीकारलं आहे की, ‘हो, आम्ही अडकलो आहोत, पण ठीक आहे, बघू काय होतं!’

आता याच शब्दाचा एक वेगळा आणि अगदी उलटा अर्थसुद्धा आहे, तो म्हणजे लेट हिम/ हर कुक. हा शब्दप्रयोग आपण तेव्हा करतो, जेव्हा एखादी व्यक्ती काही तरी करत असते आणि आपल्याला वाटतं की हे जे काही करताहेत त्याचा शेवट भारी होणार आहे. त्याची पद्धत सुरुवातीला आपल्याला अजब वाटू शकते, थोडी रिस्कीही वाटू शकते, पण आपण म्हणतो, ‘थांबा, लेट हिम ऑर हर कुक.’ याचाच अर्थ ‘ट्रस्ट द प्रोसेस’. कधी कधी स्पोर्ट्समध्ये एखादा खेळाडू काही वेगळीच चाल खेळतो, बाकी टीमला ते लगेच कळत नाही, पण त्याचा परिणाम खूप जबरदस्त होतो. अशा परिस्थितीत हा वाक्प्रचार एकदम फिट बसतो.

आता यात अजून एक मजेशीर ट्विस्ट येतो. तो म्हणजे, ‘आर यू कुकिंग ऑर आर यू कुक्ड’. इथे कुकिंग म्हणजे गोष्ट आपल्या बाजूने चालली आहे, आपण जिंकतो आहोत आणि आपण पुढे जातोय. आणि कुक्ड म्हणजे आपण अडकलो आहोत, हरतो आहोत, काही तरी गडबड झाली आहे. अगदी आपल्या ‘ऑरा’सारखंच, कधी W (विन ऑरो) तर कधी L (लूजर ऑरा). मग तुमचं काय? आत्ता या क्षणी तुमच्या आयुष्यात तुम्ही Cooking आहात की Cooked?