स्नेह एरंडे

आज सध्या ट्रेंडिंग असलेल्या शब्दांचा कॉम्बो आपण विचारात घेणार आहोत. हे शब्द आहेत, मॉगिंग (Mogging) आणि लूकमॅक्सिंग (lookmaxxing). पहिल्यांदा ऐकल्यावर हे दोन्ही शब्द थोडे इंटरनेट – ब्रेनरॉट टाइप वाटतात, पण खरं म्हणजे आजच्या ऑनलाइन कल्चरमध्ये ते एका विशिष्ट अर्थाने वापरले जातात.

मॉगिंग म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर, एखादी व्यक्ती बाकीच्यांपेक्षा इतकी व्हिजिबली बेटर वाटते, त्या व्यक्तीला पाहिल्या पाहिल्या ते जाणवतं. हे थोडं फ्लेक्सिंगसारखं वाटू शकतं, पण दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. फ्लेक्सिंग म्हणजे एखादा माणूस स्वतःच तो किती भारी आहे याचं प्रदर्शन करत असतो, पण मॉगिंगमध्ये तसं होत नाही. तर समोरच्याला किंवा पाहणाऱ्याला जाणवतं की ही व्यक्ती बाकीच्यांवर भारी पडते आहे. मॉगर स्वत:हून काही बोलला नाही तरी चालतं, पण बाकीच्यांना ते फील होतं आणि तेवढंच पुरेसं असतं.

मॉगिंग हा शब्द मुख्यतः लूक्सच्या संदर्भात वापरला जातो. उदाहरणार्थ, एखादा सेलिब्रिटी रेड कार्पेटवर आला की बाकी सगळे अचानक बॅकग्राऊंडमध्ये जातात, तेव्हा आपण म्हणू शकतो की सेलिब्रिटी सगळ्यांना मॉग करत होते. अर्थात, मॉगिंग हा शब्द फक्त लूक्सपुरता मर्यादित नाही. अगदी स्पोर्ट्समध्येही एखादा प्लेअर इतक्या डॉमिनंटली खेळतो की बाकीचे अगदीच फिके वाटतात, त्या परिस्थितीलाही मॉगिंग म्हणता येतं. जिममध्ये ट्रान्सफॉर्मेशन, डिसिप्लिन किंवा फिजिकमुळे कोणी उठून दिसत असेल, तर तेही एक प्रकारचं मॉगिंग आहे. अगदी वेल्थ, सक्सेस किंवा अचिव्हमेंट्सच्या बाबतीतही ही व्हाइब लागू होते.

मग लूकमॅक्सिंग म्हणजे नेमकं काय?

हा शब्द पूर्णपणे दुसऱ्या अर्थाने वापरला जातो. मॉगिंग हा परिणाम दाखवणारा शब्द आहे, तर लूकमॅक्सिंग हा प्रक्रिया दर्शवणारा शब्द आहे. म्हणजे, ‘मला अजून बेटर दिसायचं आहे’ या विचारातून सुरू होणारे सगळे प्रयत्न हे लूकमॅक्सिंगमध्ये गणले जातात. स्किन केअर, बेटर हेअरकट, ग्रुमिंग, पोश्चर सुधारणं, म्युइंग, फॅशन, फिटनेस, स्लीप स्केड्युल… हे सगळे प्रकार लूकमॅक्सिंगमध्ये समाविष्ट होऊ शकतात. थोडक्यात, स्वतःचा अपीअरन्स ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न म्हणजे लूकमॅक्सिंग असं म्हणता येईल.

याच कारणाने अनेकांसाठी लूकमॅक्सिंग हा मॉगर स्टेटसपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. आधी त्यासाठी एफर्ट घ्यायचे, नंतर त्यात इम्प्रुव्हमेंट आणि मग कदाचित एक दिवस तो एफर्टलेस दिसणारा प्रेझेन्स या स्टेजपर्यंत आपण पोहोचतो. पण, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मॅक्सिंग हासुद्धा फक्त लूक्ससाठी वापरला जाणारा शब्द नाही. जेन झीमध्ये हा शब्द सफिक्ससारखा खूप ठिकाणी वापरला जातो. गेमिंगमध्ये आपण टुल्स किंवा स्टॅट्स मॅक्स आऊट करतो, तिथूनच हा फील इतरही अनेक गोष्टींमध्ये गेला.

म्हणूनच आता स्लीप मॅक्सिंग, स्टाइल मॅक्सिंग, फुड मॅक्सिंग, स्टडी मॅक्सिंग असे अनेक नवनवीन शब्द ऐकायला मिळतात. याचा अर्थ नुसतीच एखादी गोष्ट करणं नव्हे, तर ती ऑलमोस्ट ऑप्टिमाईज होईपर्यंत करणं. एखाद्या गोष्टीची कमाल मर्यादा गाठणं या अर्थाने हा मॅक्सिंग शब्द सध्या सर्रास वापरला जातो आहे.

तरीही, या सगळ्याची एक दुसरी बाजूही आहे. लूकमॅक्सिंग हे एका अर्थाने हेल्दी सेल्फ इम्प्रुव्हमेंट म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे त्याचं प्रेशरसुद्धा येऊ शकतं. हल्ली सोशल मीडियावर सगळेच एकदम पॉलिश्ड, फिल्टर्ड आणि क्युरेटेड दिसतात. त्यांना पाहिल्यावर मग आपल्याला स्वतःकडे बघून मनात असं वाटायला लागतं की अजून काहीतरी फिक्स करावं लागणार आहे.

इथे नेमका गोंधळ उडतो. सेल्फ केअर आणि इन्सेक्युरिटी यांच्यातली लाइन थोडी धूसर होत जाते. म्हणून मला वाटतं, मॉगिंग आणि लूकमॅक्सिंग हे फक्त लूक्स संदर्भात बोलले जाणारे शब्द नाहीत. एक हा बाहेरून जाणवणाऱ्या इम्पॅक्टचा शब्द आहे. तर दुसरा आतून सुरू होणाऱ्या एफर्ट्सचा. एक स्टेटस आहे आणि दुसरी प्रोसेस आहे. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही सध्या लूकमॅक्सिंग करत आहात, कुणाला तरी क्वाएटली मॉग करत आहात, की आयुष्यात काही वेगळंच मॅक्सिंग सुरू आहे?