– स्नेह एरंडे
आजचा शब्द आहे परफॉर्मेटिव्ह (Performative). सामान्य अर्थाने परफॉर्मेटिव्ह म्हणजे सादरीकरणाशी जोडलेली गोष्ट. एखादी गोष्ट फक्त केली जात नाही, तर लोकांसमोर ती कशी दिसेल हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. पण, जेन झीच्या भाषेत परफॉर्मेटिव्हचा अर्थ थोडा वेगळा आहे. इथे हा शब्द मनापासून वागण्यापेक्षा दाखवण्यासाठी म्हणून जे वर्तन केलं जातं त्यासाठी वापरला जातो.
सोप्या भाषेत सांगायचं तर, परफॉर्मेटिव्ह म्हणजे ‘मी खरंच असा आहे’ यापेक्षा ‘लोकांनी मला असं समजावं’ म्हणून केलेली कृती. म्हणजे कृती चांगली असू शकते, शब्दही छान असू शकतात, पण त्यामागचा हेतू हा थोडा कॅमेर्याकडे लक्ष ठेवून कृती करण्याकडे असतो. उदाहरणार्थ, कुणी सोशल मीडियावर सतत पर्यावरणाबद्दल पोस्ट टाकतो, पण स्वत:च्या छोट्या छोट्या सवयीही बदलायला तयार नसतो. किंवा कुणी म्हणतो, ‘मी खूप शांत, समजूतदार आणि प्रगत विचारांचा आहे.’ पण, प्रत्यक्षात तो दुसर्याचं मतही ऐकायला तयार नसतो. तेव्हा लोक म्हणतात, ‘हे थोडं परफॉर्मेटिव्ह वाटतं आहे.’
याचा अर्थ परफॉर्मेटिव्ह वागताना प्रत्येक चांगली गोष्ट खोटी असते असं नाही, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कुणाला खरंच कविता आवडू शकते. कुणाला खरंच वेगळं संगीत ऐकायची आवड असू शकते. कुणाला मॅच्छा आवडू शकतं. कुणी फेमिनिस्ट पुस्तकं वाचत असेल, एखाद्याला टोट बॅगच वापरायची असेल किंवा शांत ॲस्थेटिक्स ठेवत असेल, तर तो किंवा ती लगेच परफॉर्मेटिव्ह होत नाही. आजकाल ट्रेन्डी गोष्टी आवडल्या की लोक लगेच म्हणतात, ‘अरे, तू फक्त दाखवतोयस किंवा दाखवतेयस.’ पण, कधी कधी माणसांची ती आवड खरी असू शकते. प्रत्येक पर्सनल इंटरेस्टवर शंका घेणं हीसुद्धा थोडी हार्श गोष्ट आहे. मुळात, हा शब्द थोडा ट्रिकी आहे. कारण तो फक्त बाहेरचं वागणं नाही, तर आतला हेतूही विचारतो. आणि माणसाचा हेतू बाहेरून लगेच दिसत नाही. म्हणूनच एखाद्याला परफॉर्मेटिव्ह म्हणताना थोडी सावधगिरी बाळगायला हवी. नाहीतर आपण कोणाच्या तरी खर्या आवडीलाही उगाच अभिनय समजायला लागतो. जरा थांबून बघितलं, तर चित्र वेगळं असू शकतं.
आता इथूनच येतो परफॉर्मेटिव्ह मेल (performative male). हा इंटरनेटवरचा एक मजेशीर, पण थोडा टोचणारा शब्द आहे. परफॉर्मेटिव्ह मेल म्हणजे असा मुलगा, जो स्वत:ला संवेदनशील, कलात्मक, फेमिनिस्ट, सेफ आणि डीप दाखवण्यासाठी काही काही गोष्टी करतो. जसं सतत विशिष्ट पुस्तकं हातात ठेवणं, फार निश गाणी ऐकतोय असं दाखवणं, किंवा ‘मी बाकी मुलांसारखा नाही’ अशी व्हाइब तयार करणं. मुद्दा पुस्तक, गाणी किंवा मॅच्छा हा नाही. तर मुद्दा आहे त्यामागचा हेतू. तो खरोखरच आतून तसा आहे का? की फक्त समोरच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी तो हे करतो? हा खरा प्रश्न आहे. मला परफॉर्मेटिव्ह हा शब्द उपयोगी वाटतो, कारण तो आपल्याला सिन्सिॲरीटीबद्दल विचार करायला लावतो. आपण जे बोलतो, ते खरंच जगतो का? आपण जे दाखवतो, ते आपण आहोत का? पण हा शब्द काळजीपूर्वक वापरायला हवा. कारण, कधी कधी आपण दुसर्याला समजून घेण्याआधीच जज करायला लागतो. म्हणून माझ्यासाठी परफॉर्मेटिव्ह म्हणजे फक्त फेक असणं नाही. तो शब्द आपल्याला एक प्रश्न विचारतो, ‘ही कृती मनापासून आहे, की फक्त प्रेक्षकांसाठी?’
मग तुमचं काय?
तुम्ही कधी कुणाला परफॉर्मेटिव्ह वागताना पाहिलं आहे का?
viva@expressindia.com
