सीझनप्रमाणे आपला वॉर्डरोब बदलणं हे आता सगळेचजण करतात. पूर्वी फक्त सेलेब्रिटींचे वेगवेगळ्या सीझनचे लुक्स पाहायला मिळायचे, मात्र आता जवळपास सर्वांनीच वॉर्डरोब चेंजकडे मनापासून लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच सर्वांसाठी सीझननुसार येणारी कलेक्शन्स वाढली आहेत. वेअरेबल असलेले कपडे आता प्रत्येक सीझनच्या वॉर्डरोबमध्ये दिसतात. मॉल्समधल्या आऊटलेट्सपासून ते स्ट्रीट शॉपिंगच्या दुकानांपर्यंत सगळीकडे सीझननुसार वेगवेगळे कपडे पाहायला मिळतात. या सगळ्याचाच परिणाम म्हणून या वेळी विंटर फॅशनने चांगलाच जोर धरला आहे.

यंदा थंडी गुलाबी न पडता थेट गारठवणाऱ्या झोनकडे गेली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बदलत जाणारी फॅशन न दिसता थेट थंडीचेच कपडे दिसायला लागले आहेत. सगळीकडेच मनसोक्त थंडी असल्याने ते कपडे केवळ डिस्प्लेला नाही तर येताजाता लोकांच्या अंगावर दिसायला लागले आहेत. नुकतेच गेले काही महिने ट्रेण्डमध्ये असलेले को-ऑर्ड सेट्स अजूनही आपली जागा सोडत नाही आहेत. हिवाळा आला तशी को-ऑर्ड सेट्सनी मटेरियल बदललं. संपूर्ण वूलचे अर्थात लोकरीचे किंवा फरचा लेयर असलेले को-ऑर्ड सेट्स आता बाजारात दिसायला लागले आहेत. मात्र, हे को-ऑर्ड सेट्स मुख्यतः प्लेन आहेत आणि तरीही ते ट्रॅक सूटसारखे वाटत नाहीत. तसंच, थंडीमध्ये लेयरिंगचं महत्त्व आपोआपच वाढत जातं. त्यामुळे थ्री पीस को-ऑर्ड सेट हा नवीन आलेला ट्रेण्डही रुळला आहे. यामध्ये मुख्यतः जॅकेट आणि बॉटम को-ऑर्डिनेटेड असते. यातला टॉप विशेषतः प्लेन आणि फिक्या रंगाचा असतो. मात्र यात अनेक वेगवेगळी पेअरिंग करता येऊ शकतात.

लाइट कलरच्या थ्री पीस को-ऑर्ड सेटमध्ये काँट्रास्ट रंगाचा टॉप वापरता येऊ शकतो. यामुळे तो को-ऑर्डिनेटेडसुद्धा दिसतो, पण त्याच वेळी इतरांपेक्षा हटके लुकही मिळवून देतो. काँट्रास्ट प्लेन टॉपच नव्हे तर बोल्ड प्रिंट्स असलेला टॉपसुद्धा को-ऑर्ड सेटमधील जॅकेटच्या आत उठून दिसू शकतो. को-ऑर्ड सेट प्रिंटेड असेल तर मात्र जॅकेटच्या आतला टॉप शक्यतो प्लेनच असलेला अधिक चांगला. ऑफिस वेअरसाठी प्लेन थ्री पीस को-ऑर्ड सेट अधिक योग्य ठरतील, तर कॅज्युअल वेअरसाठी प्रिंटेड थ्री पीस को-ऑर्ड सेट उठून दिसतील. ऑफिस वेअर असोत वा कॅज्युअल वेअर असोत, दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर प्लॅटफॉर्म शूज, स्टीलेटोज, फॉर्मल शूज, बूट्स सहज पेअर करता येतील. कॅज्युअल वेअरसाठी स्नीकर्सचाही पर्याय चांगला ठरू शकतो. थंडीच्या सीझनमुळे क्लोज्ड टोज असलेले कोणतेही फूटवेअरचे प्रकार उपयुक्तही ठरतात आणि उठूनही दिसतात.हिवाळ्यामुळे पश्मिना फॅब्रिकसुद्धा सध्या चांगलंच ट्रेण्डमध्ये आलं आहे. पश्मिनाचे मटेरियल्स, रनिंग फॅब्रिक्स, तसंच अनेक प्रकारचे कपडे विंटर फॅशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

पश्मिनाचे काफ्तान पॉप्युलर आहेतच, पण हल्लीच्या ट्रेंडनुसार काफ्तान सेट्सही फॅशनप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय, पश्मिनाचे कुर्ता, शॉर्ट आणि लॉन्ग टॉप्स असे प्रकारसुद्धा सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. पश्मिनाचे को-ऑर्ड सेटसुद्धा काही प्रमाणात पॉप्युलर आहेत. पश्मिना कुर्ता किंवा टॉपसोबत स्टोनची किंवा ट्रायबल लुकची ज्वेलरी अधिक उठून दिसते. थ्री-फोर्थ स्लीव्ह्ज किंवा त्यापेक्षा कमी स्लीव्ह्जसाठी हातात जाड बांगडी किंवा कडा चांगला दिसतो. पश्मिना ड्रेस सामान्यतः लूज फिट असल्याने त्यावर खूप बारीक, छोटी आणि नाजूक ज्वेलरी तितकीशी सूट करत नाही. त्यापेक्षा ठसठशीत दिसणारा एखादाच स्टेटमेंट ज्वेलरी पीस अधिक उठून दिसतो. थंडीतल्या या ट्रेंडी प्रकारांबरोबरच शाल, श्रग, जॅकेट या गोष्टीही अजून वापरात आहेत, मात्र शाल म्हटलं की साधारणतः डोळ्यासमोर जुनाट प्लेन साधी शाल दिसते. फार पूर्वीपासून प्रचलित असलेल्या बारीक डिझाइनच्या, हँड पेंट केलेल्या, ब्लॉक प्रिंट केलेल्या, प्रत्यक्ष लोकरीपासून बनवलेल्या शाली आपल्याला माहितीच नाहीत. सध्या जुने ते सोने म्हणत त्याच पद्धतीच्या शाली आता पुन्हा ट्रेण्डमध्ये आल्या आहेत. सगळ्या कपड्यांवर एकच कॉमन शाल घेण्यापेक्षा शालींचे दोन – तीन पर्याय जवळ ठेवायला हरकत नाही. कपड्यांच्या रंगाप्रमाणे काँट्रास्ट शाल घेता येऊ शकते. याचसोबत लेयरिंगसाठी मुख्यतः वापरले जाणारे प्रकार म्हणजे श्रग किंवा जॅकेट. फॅशन स्टेटमेंट म्हणून त्यांची क्रेझ कमी झाली असली, तरी क्रोशाचे श्रग आणि वूलन जॅकेट्स आजही तितक्याच प्रमाणात वापरले जातात.

साधारणतः आपण फॅशन म्हटलं की केवळ वेस्टर्न कपडे किंवा आऊटफिट्सच्या फॅशनबद्दल बोलतो. मात्र आजकाल कॅज्युअल वेअरमध्येसुद्धा साडी वापरण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. त्यामुळे साड्यांमध्येसुद्धा विंटर फॅशनचे ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. हिवाळ्यासाठी पश्मिना, काश्मिरी आणि मल कॉटन या फॅब्रिकच्या साड्या जास्त करून पॉप्युलर आहेत. पश्मिना किंवा काश्मिरी या साधारणतः नाजूक वेलबुट्टीच्या डिझाइनने भरलेल्या साड्या असतात, तर मल कॉटन त्याच्या अगदी उलट मिनीमलिस्ट वर्क असलेल्या साड्या असतात. साडीचा बहुतांश भाग प्लेन सोडणाऱ्या मल कॉटनच्या साड्या अत्यंत मऊ आणि उबदार असतात. त्यांच्यासोबत कोणताही मिक्स अँड मॅच केलेला ब्लाऊज पेअर करता येतो. डेली वेअर किंवा कॅज्युअल वेअर दोन्हीसाठी अत्यंत सोप्या आणि हिवाळ्याच्या सीझनला सूट होतील अशा या मल कॉटनच्या साड्या असतात. याच्या अगदी उलट म्हणजे पश्मिना साड्या आहेत. त्यांना एक प्रकारचा क्लासी लुक आहे. फॉर्मल, सेमी-फॉर्मल अशा इव्हेंट्ससाठी या साड्या अधिक उत्तम ठरतात. त्यांच्यासोबत रॉ सिल्कचे फुल किंवा थ्री- फोर्थ स्लीव्ह्जचे ब्लाऊज अत्यंत उठून दिसतात.विंटर फॅशनमध्ये केवळ वेस्टर्न जॅकेट्स आणि त्यांच्या हवामानाला सूट होतील असे पेअरिंग, लेयरिंग, आणि डिझाइन्स असायची. मात्र इंडियन मार्केटचा विस्तार पाहता, इंडियन विंटर कलेक्शन हे वेगळं असायला हळूहळू सुरुवात झाली आहे.