दरवर्षी ‘वर्ल्ड हेरिटेज डे’च्या निमित्ताने आपल्या सभोवतालच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता दिलेल्या सह्याद्री पर्वतरांगांकडे पाहण्याची गरज तरुणाईला वाटते आहे. सह्याद्री पर्वताच्या उंचच उंच रांगा, हिरवाईने नटलेल्या दर्‍या-खोर्‍या आणि जैवविविधतेने समृद्ध असा हा प्रदेश निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणून ओळखला जातो. याच सह्याद्री पर्वतरांगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट. जगातील सर्वात समृद्ध जैवविविधतेच्या पट्ट्यांपैकी एक. सह्याद्री हा केवळ निसर्गसौंदर्याचा ठेवा नसून, भविष्यातील पिढ्यांसाठी जपून ठेवण्यासारखी अमूल्य संपत्ती आहे. ‘वर्ल्ड हेरिटेज डे’च्या निमित्ताने सह्याद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात काम करणार्‍या तज्ज्ञ तरुणांशी संवाद साधला असता, त्यांच्या विचारांतून सह्याद्रीविषयीची जाणीव आणि जबाबदारी स्पष्टपणे जाणवते.

सर्वात समृद्ध जैवविविधतेच्या पट्ट्यांपैकी एक म्हणजेच ‘सह्याद्री’, जिथे असंख्य दुर्मीळ वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे अधिवास आहेत. अनेक प्रजाती या फक्त याच भागात आढळतात, ज्यामुळे या प्रदेशाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते. वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ तसेच सहाय्यक प्राध्यापक  डॉ. अक्षय प्रकाश जंगम सांगतो की, ‘जगातील जैवविविधतेच्या बाबतीत ‘हॉटेस्ट हॉटस्पॉट’ असलेला सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक अद्भूत लेणे आहे. युनेस्कोने २०१२ मध्ये सह्याद्रीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला. सह्याद्री ही केवळ दगड-मातीची रांग नसून, अत्यंत संवेदनशील आणि जिवंत परिसंस्था आहे. सह्याद्री तापी नदीपासून सुरू होऊन कन्याकुमारीपर्यंत जवळपास १६०० किमी लांब आहे आणि एकूण १,४०,०० चौरस किमीची जागा व्यापतो. भारतातील एकूण जमिनीच्या फक्त ६ टक्के जमीन सह्याद्री पर्वतरांगांनी व्यापलेली असली तरी भारतातील ३० टक्क्यांपेक्षा अधिक वनस्पती, मासे, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी यांचे ते घर आहे’. सह्याद्रीबाबतची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात असणार्‍या प्रदेशनिष्ठ प्रजाती, असं तो म्हणतो.

‘वनस्पतींचा विचार करता, सह्याद्री पर्वतरांगेत आठ हजारपेक्षा जास्त वनस्पती प्रजाती पाहायला मिळतात, त्यापैकी ५ हजार ५०० पेक्षा जास्त स्थानिक प्रजाती असून, दोन हजार प्रजाती भारतासाठी प्रदेशनिष्ठ तर जवळपास १ हजार ३०० प्रजाती जगाच्या पाठीवर या फक्त आणि फक्त सह्याद्रीमधेच पाहायला मिळतात आणि या प्रजाती संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र, मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि अनियंत्रित विकासामुळे या परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे’ असे अक्षय सांगतो. याचबरोबर तापमानवाढ, अनियमित पाऊस आणि माणूस – वन्यजीव संघर्ष ही त्याचीच परिणती असल्याचे ठाम मत त्याने मांडले. हा अनमोल ठेवा वाचवण्याचे उत्तरदायित्व आपल्या सर्वांवर आहे विशेषत: तरुण वर्गावर. आपल्या आजूबाजूच्या जैवपरिसंस्था, त्यांचं रक्षण आणि त्यांची भविष्यासाठी जपणूक हे आपल्या हातातच असल्याचे अक्षयने सांगितले. झूओलॉजिस्ट डॉ. स्नेहल लोंढे हिच्या मते, सह्याद्रीतील विस्तीर्ण अरण्ये कार्बन शोषण (कार्बन सिंक) करून स्थानिक तसेच जागतिक हवामान संतुलित ठेवण्यात मदत करतात. तसेच, ही पर्वतरांग भारतीय द्वीपकल्पासाठी महत्त्वाची जलसंधारण व्यवस्था (वॉटरशेड) असून, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि कोयना यांसारख्या प्रमुख नद्यांचा उगम येथेच होतो. या नद्यांमुळे भारतातील सुमारे ४० टक्के भूभागाला पाणीपुरवठा होतो. हा प्रदेश विविध पिके, धान्ये आणि औषधी वनस्पतींसाठी एक महत्त्वाची ‘जीन बँक’ आहे. मात्र, बेफाम पर्यटन हे या भागासमोरील एक मोठे आव्हान बनले आहे. पर्यटकांनी भेट देताना विशेषत: प्लास्टिकसह सर्व कचरा परत नेणे, मोठ्या आवाजात संगीत टाळणे यांसारख्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे, कारण त्याचा वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासावर परिणाम होत चालला आहे, असे ती सांगते. ‘सह्याद्रीचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत जीवनशैली, समुदाय-आधारित संवर्धन आणि स्थानिक संस्थांना सक्रिय पाठबळ आवश्यक आहे. तसेच, वन्यजीव मार्गिका (जसे की तिलारी) संरक्षित ठेवणे, स्थानिक व आदिवासी-केंद्रित उपक्रमांना मदत करणे आणि पर्यावरणपूरक प्रवास करणे याद्वारे प्रत्येकजण सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेच्या जतनात योगदान देऊ शकतो’, असेही तिने सांगितले. 

पश्चिम घाट अर्थात सह्याद्री हा जागतिक वारसा केवळ भौगोलिक रचना किंवा नैसर्गिक सौंदर्यापुरता मर्यादित नाही, तर तो एक अत्यंत गुंतागुंतीचा व समृद्ध परिसंस्थात्मक घटक असल्याचे वन्यजीव अभ्यासक सतीश दिवेकर याने सांगितले. ‘सह्याद्रीत आढळणार्‍या वनस्पती व प्राणी प्रजाती केवळ संख्या म्हणून नव्हे, तर परिसंस्थेतील परस्परावलंबित्व दर्शवतात, जे कोणत्याही हॉटस्पॉटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आजच्या घडीला या परिसंस्थेवर वाढता मानवी ताण, अधिवासाचा र्‍हास आणि हवामान बदल यामुळे गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सह्याद्रीचे संवर्धन हे केवळ निसर्गरक्षण नसून, एक शास्त्रीय आणि दीर्घकालीन पर्यावरणीय जबाबदारी आहे’ असे तो सांगतो. या प्रक्रियेत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून, जैवविविधतेचे दस्तावेजीकरण, स्थानिक पातळीवर संवर्धन उपक्रमात सहभाग आणि शाश्वत विकासाची अंमलबजावणी यामध्ये तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जागतिक वारसा म्हणजे केवळ दगड मातीच्या वास्तू नव्हेत, तर सजीव आणि गतिमान परिसंस्था देखील आहेत आणि सह्याद्री हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे तो सांगतो.

सध्या सह्याद्रीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. जंगलतोड, विकासकामे, अनियंत्रित पर्यटन आणि वणवे यामुळे परिसंस्थेचा समतोल ढासळतो आहे. याचे परिणाम म्हणून हवामानातील बदल, पावसाचे अनियमित स्वरूप आणि वन्यजीव-मानव संघर्ष वाढताना दिसतो. ‘वर्ल्ड हेरिटेज डे’च्या निमित्ताने सह्याद्रीसारख्या नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्याची गरज अधिक अधोरेखित होते. विकास आणि संवर्धन यामध्ये समतोल साधत शाश्वत मार्ग स्वीकारणे हीच काळाची गरज आहे, असे तरुण संशोधक आवर्जून सांगतात.

viva@expressindia.com