लहानपणी आजी-आजोबांसोबत नागपूरला राहताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकायचे. त्यांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटायचं आणि मलाही काही बोलायचं असायचं. केवळ मलाच नाही तर आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याकडे आणि माझ्या आईकडे आपलं मन मोकळं करावंसं वाटायचं. या सुसंवादाकडे बारकाईने पाहिल्यावर दिसलं की, आई-आजी सगळय़ांचं म्हणणं ऐकून घेतात, तेही कुणाबाबत डावं-उजवं न करता. हेही लक्षात आलं की, जगात ‘ऐकून घेणाऱ्यांची’ संख्या खूप कमी आहे. पुढे मी लोकांशी बोलू लागले. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली. त्यांना कदाचित जराशी विचारपूस केल्यामुळे बरं वाटलं असावंङ्घ मला वाटलं, आपण लोकांना मदत करायला हवी. मग आपोआप लोकांचं ऐकता येऊ शकेल, अशा विषयांच्या अभ्यासाकडे वळले. या निर्णयात आई-बाबांचा भक्कम पाठिंबा मिळाला आणि मिळतो आहे. तो नसता तर माझ्या करिअरचा प्रवास सुरूच झाला नसता. मानसशास्त्राविषयी एकेक पैलू उलगडायला लागल्यावर वाटलं की, हेच तर सगळं माझ्या डोक्यात होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानसशास्त्राचा अभ्यास करताना सगळय़ा पर्यायांचा विचार करायचा ठरवलं होतं. दिवसाअखेरीस विचार करताना कुणाला मदत करता आली तर आपल्याला बरं वाटतं, हेही मला जाणवलं होतं. काऊन्सेिलग सायकॉलॉजीविषयी ‘एम्पॉविरग पीपल टू लिव्ह देम लाइफ इन अ बेटर वे’ असं वाचलं होतं. समुपदेशन क्षेत्रात बरंच काही करण्याजोगं आहे हे कळलं. महाविद्यालयीन जीवनात मी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी केल्या, शिकले. त्यामुळे जीवनातलं वास्तव समजून घेता आलं. शिवाय प्राध्यापक, सहाध्यायांशी होणाऱ्या संवादांतून करिअरची दिशा ठरायला सुरुवात होऊन हळूहळू व्यक्तिमत्त्व विकास होत गेला. मार्च २०२० मध्ये मी दिल्लीतील ‘लेडी श्री राम कॉलेज’मधून बी.ए. (सायकॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स) झाले.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील बहुतांशी पुस्तकांचे लेखक अमेरिकेतले होते. अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्राइतकंच समुपदेशन क्षेत्राला महत्त्व दिलं जातं. मग तिथे जाऊन शिकावं असं वाटलं. माहिती शोधताना कळलं की, पेनसेलव्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापकांनी या क्षेत्रात बहुमोल योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्याची आस वाढली. त्यांना माझी कळकळ आणि मला काय म्हणायचं आहे, ते नेमकं कळेल असं वाटलं. हे विचार सुरू असताना करोनाचं संकट उद्भवलं. त्या काळात भारतातल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा; पण त्या अभ्यासक्रमात फारसा रस वाटला नाही. तेच ते पुन्हा अभ्यासते आहे असं वाटल्यानं तो सोडला. तेव्हाही आई-बाबांनी माझ्या मनानुसार अभ्यासक्रम निवडायला आणि त्यासाठीचं ठिकाण ठरवायला परवानगी दिली. मी परदेशातील अभ्यासक्रमांची माहिती काढली. सीनिअर्सशी बोलले. दरम्यान, फक्त अभ्यास एके अभ्यास न करता इंटर्नशिपसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. त्यापैकी ‘टाटा स्ट्राइव्ह’कडून बोलावणं आलं. त्यांच्या प्रकल्पातील इंटर्नशिप करताना राजस्थानमधल्या १६,००० गरीब विद्यार्थ्यांसाठी करिअर काऊन्सिलिंगचं मॉडय़ुल तयार करायचं होतं. नंतर शॉर्टलिस्ट प्रोफेशनल्समध्ये मी एचआर ॲण्ड रिक्रुटमेंटचा अनुभव मिळवत ह्युमन रिसोर्सेस असोसिएट म्हणून आधी इंटर्नशिप आणि नंतर नोकरीही केली. ही सगळी कामं वर्क फ्रॉम होम स्वरूपाची असल्याने सोयीचं ठरलं.

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World records c career on to the study career psychology amy
First published on: 05-08-2022 at 00:01 IST