विनय नारकर

पीतांबर हे एक असे वस्त्र आहे जे एक आख्यायिका बनून राहिले आहे. एक प्रकारे दिव्यत्वाचा स्पर्श झालेले हे वस्त्र आहे. स्वर्गीय देवतांना, त्यांच्या रूपाला, लौकिकाला साजेसे असे वस्त्र कोणते असेल, तर ते म्हणजे ‘पीतांबर’. मोठमोठय़ा कवींनाही भुरळ पाडणारे वस्त्र म्हणजे ‘पीतांबर’. संस्कृत वाङ्मय असो की मराठी साहित्य, या वस्त्राचा जेवढा बोलबाला होता, तेवढा क्वचितच अन्य वस्त्राचा झाला असेल. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही असलेले हे वस्त्र. स्वर्गीय देवता असोत, राजेराण्या असोत किंवा सधन सामान्य जन असोत, या सगळ्यांचे लाडके वस्त्र म्हणजे ‘पीतांबर’.

feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
issues of society
शब्द शिमगोत्सव

पीतांबर हे वस्त्र अतिशय पवित्र मानले गेले आहे. असे मानले जाण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक तर हे एक रेशमी वस्त्र आहे. रेशीम हे वेदकाळापासून शुद्ध मानले गेले आहे. रेशमी वस्त्राचा पुनर्वापर करताना ते धुतले जाण्याची गरज नसते, फक्त पाणी शिंपडल्याने ते पुन्हा वापर करण्यासाठी योग्य होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे याचा पीत वर्ण. पिवळा रंग हा अग्नीचा रंग आहे. अग्नी हा परमपवित्र मानला गेला आहे. तसेच अग्नी हे यज्ञाचे प्रतीक आहे, आणि यज्ञ हे त्यागाचे प्रतीक होय. या कारणांमुळे पीतांबर हे पवित्रतेचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे साहजिकपणे यज्ञपुरुषाचे वस्त्र हे पीतांबर मानले गेले. यज्ञ करणाऱ्या यजमानानेही पीतांबर नेसावे अशी प्रथा रूढ झाली.

याच संबंधाने राजारामशास्त्री भागवत यांनी नोंदवले आहे की याज्ञिकांसाठी विष्णू हा यज्ञपुरुष असतो. याज्ञिकांसाठी विष्णू हे  आकाश आणि समुद्राचे स्वरूप असते. आकाशातील विजेचे प्रतीक म्हणून विष्णू हा ‘पीतांबर’ झाला. पीतांबर जसे पवित्र तसेच ते दिव्य वस्त्रही मानले गेले. जगत्पालक असलेल्या विष्णूस कोणते वस्त्र शोभेल? विष्णूसारखे परिपूर्ण वस्त्र कोणते असेल.. तर ते पीतांबरच. विष्णूच्या शंख, चक्र, गदा, कौस्तुभ आदी चिन्हांसोबत पीतांबरही एक महत्त्वाचे चिन्ह आहे. ‘श्रीमद् भागवतम्’मध्ये विष्णूची बावीस चिन्हे सांगितली आहेत, त्यापैकी पीतांबर हे एक आहे. वस्त्रांसंबंधी पीतांबर हे एकच चिन्ह आहे. श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी ‘पीतांबर’ हे एक नाव आहे.

किं वाससा इत्यत्र विचारणीयं

वास: प्रधानम् खलु योग्यतायै ।

पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां

दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्र: ॥

या संस्कृत सुभाषितामध्ये एकप्रकारे पीतांबराची महती सांगितली गेली आहे. यात म्हटले आहे की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून लक्ष्मी प्रगट झाली, तेव्हा समुद्राने त्याची कन्या असलेल्या लक्ष्मीचा हात विष्णूच्या हाती दिला, कारण विष्णूने पीतांबर परिधान केले होते. इतकेच नाही तर दिगंबर असलेल्या शंकराच्या हाती विष दिले..! या मनोरंजक सुभाषिताने पीतांबराचे महत्त्व व एक प्रकारे उत्तम वस्त्रांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विविध पुराणांमधूनही विष्णू आणि पीतांबर हे समीकरण अधोरेखित होत गेले आहे. रामायणातील बालकाण्डात ‘शंखचक्रगदापाणि: पीतवासा जगत्पती ।’ असा श्लोक आहे. याचा अर्थ ‘शंख, चक्र, गदा असलेले हस्त, पीतवस्त्र धारण केलेला जगाचा पालनकर्ता विष्णू’ असा होतो. स्कंदपुराणात, ‘ॐ नमो वासुदेवाय पीतवाससे’, म्हणजे ‘पीतवस्त्र धारण केलेल्या वासुदेवाला नमस्कार’, अशी प्रार्थना आहे.

अशा तऱ्हेचे बरेच उल्लेख पुराणांमधून सापडतात. विष्णूशिवायही पीतांबराचे काही उल्लेख पुराणांमध्ये व इतरत्र आढळतात.

सम्मुखे ललितादेवी

श्यामला पीतवाससा ।

‘बृहदब्रम्हसंहिता’ या ग्रंथात हा श्लोक आहे. याचा साधारण अर्थ ‘श्यामल अशा पीतवस्त्र धारण केलेल्या ललितादेवीच्या समोर’, असा होतो. ललितादेवी ही विष्णू परिवारातील एक देवता आहे. विश्वरचनेत ‘गो लोक’ हा सर्वात वरचा लोक समजला जातो. इथे श्रीकृष्णासोबत राधा सोडून आठ शक्ती विराजमान असतात. त्यापैकी ‘ललिता’ ही आद्यशक्ती होय. अशा महत्त्वाच्या देवतेचे वस्त्रही पीतांबर हेच सांगितले आहे.

कलायश्यामलां ध्यायदे

वैष्णवी पीतवाससम् ।

‘सिल्परत्न’ या सोळाव्या शतकातील शिल्पकला व मूर्तीशास्त्र या विषयावरच्या ग्रंथात, ‘श्यामल अशा पीतवस्त्र धारण केलेल्या वैष्णवीचे ध्यान करावे’, असा उल्लेख आहे. वैष्णवी ही विष्णूची शक्ती देवता आहे. ही सप्त मातृकांपैकी एक आहे. ‘दुकलांबरधरं वापि पीताम्बरमयपि वा।’, ‘मानसार’ या ग्रंथात सूर्यदेवतेने पीतांबर वस्त्र धारण केले आहे, असे वर्णन आले आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये पीतांबरासंबंधी काही प्रथांचे उल्लेखही आले आहेत.

पुंस: पीताम्बरे दद्यात

स्त्रियै कौसुम्भवाससी ।

‘मत्स्यपुराणा’मध्ये श्रावणात करण्यात येणाऱ्या अनंत तृतीया या व्रताचे वर्णन आहे. या व्रतामध्ये पुरुषांनी पीतांबराचे दान करावे, असे सािंगतलेले आहे. आतापर्यंत आपण हिंदू धर्मातील विविध पुराणे व संस्कृत धार्मिक ग्रंथांमध्ये पीतांबराबद्दल आलेले उल्लेख पाहिले. ज्या देवता पीतांबर धारण करतात त्यांचे उल्लेख पाहिले. पीतांबर आणि विष्णू यांचे एकत्व पाहिले. एक प्रकारे पीतांबर ही विष्णूची ओळख. पीतांबर नेसल्याने विष्णूला कशी लक्ष्मींची प्राप्ती झाली आणि शंकराला दिगंबर असल्याने विष प्राशन करावे लागले हे पाहिले. पण या मान्यतेच्या अगदी विपरीत वर्णनही माझ्या पाहण्यात आले. शेकडो वर्षांपासून वैदिक परंपरा पाळणारा बाली हा देश शिवपूजक आहे. बाली या बेटावर प्राचीन ताडपत्री सापडल्या आहेत. या ताडपत्रीवर एक शिवस्तवन सापडले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे..

ॐ नमोस्तु ते महादेवं पीतवर्ण पीतांबरम् ।

पद्मासनं महादेवं शची देवां नमोस्तु ते ॥

अशा प्रकारे वल्कलधारी शिवशंभोससुद्धा पीतांबर नेसावयास मिळाले तर.. याशिवाय,  ‘सर्वे ते पीतवासस:’ ब्रह्मांडपुराणामध्ये शिवपुराचे वर्णन करताना तिथल्या अकरा रुद्रांनी पीतांबर (पीतवस्त्र) धारण केले आहे, असे सांगितले आहे. म्हणजे आदी शंकराचार्यानी सांगितलेल्या पंचायतन देवतांपैकी गणपती सोडून विष्णू, शंकर, देवी, सूर्य या चारही देवता पीतांबरधारी आहेत. संस्कृत धार्मिक साहित्य व पुराणांनुसार गणपती मात्र श्वेत किंवा लाल वस्त्र परिधान करणारा आहे. गणपतीचा उल्लेख श्वेतांबरधारी, शुक्लांबरधारी, रक्तांबरधारी किंवा लोहितांबरधारी असा होत आला आहे. या लेखासाठी पुण्यातील डेक्कन कॅालेज व तेथील प्रा. माधवी गोडबोले यांची बहुमोल मदत झाली. मराठी साहित्य पीतांबराकडे कसे पहाते ते पुढच्या भागात पाहू.

क्रमश:  viva@expressindia.com