वैष्णवी वैद्य
करोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात अवघे जीवनमान काही काळ थिजले होते. त्याचा थेट परिणाम नाटय़-चित्रपट संस्कृतीवरही झाला. चैतन्याने सळसळणारी प्रयोगशील रंगभूमी आणि तिच्याशी जोडले गेलेले तरुण रंगकर्मी हे रसरशीत, जिवंत नातंही नाटय़गृहांच्या बंद दाराआड झाकोळलं गेलं होतं. गेल्या वर्षी दिवाळीपासून हळूहळू का होईना नाटय़गृहांची दारं किलकिली झाली आणि रंगभूमीवरचा नाटय़ाविष्कार अनुभवण्यासाठी आसुसलेल्या नाटय़वेडय़ांची एकच गर्दी उसळली. नुकत्याच झालेल्या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने प्रायोगिक नाटकांच्या माध्यमातून सतत कार्यशील असलेल्या तरुण रंगकर्मीशी संवाद साधत दोन वर्षांनंतर सुरू झालेला प्रायोगिक नाटक चळवळीचा नवा अध्याय कसा आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
महाराष्ट्रातली नाटय़संपदा हळूहळू समृद्ध होत गेली ती महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, प्रा. वसंत कानिटकर, राम गणेश गडकरी, डॉ. श्रीराम लागू यांसारख्या लेखक, अभिनेते व नाटककारांमुळे. नाटक ही दोन/तीन अंकी कला विचारांची, समाजातल्या परिस्थितीची सुबक मांडणी असते हे लोकांना समजू लागले. आताच्या काळात तरुणाईचा ‘एकांकिका’ हा नाटकाचा प्रायोगिक पैलू म्हणता येईल. मराठी रंगभूमीवर प्रायोगिकत्वाची सुरुवात या दिग्गज नाटककारांनीच केली, परंतु ते प्रयोग परिवर्तनाचे होते.
मराठी रंगभूमीवर पूर्वापार आशय-विषयाच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत आले आहेत. प्रयोग जसा वैज्ञानिकांचा असतो तसाच नाटय़कर्मीचासुद्धा असतो. प्रायोगिक तत्त्वावर नाटक करत असताना त्या नाटककाराला याची जाणीव आणि समज असायला हवी, की आतापर्यंत कोणत्या नाटकाच्या भाषांना किंवा मांडणी प्रकारांना, शैलींना, विषयांना प्रेक्षकांनी अनुभवलंय. मग त्यापेक्षा वेगळा, नावीन्यपूर्ण अनुभव आपण सर्वासमोर ठेवू शकलो पाहिजे, अर्थातच पूर्ण धोका पत्करूनच हे प्रयोग केले जातात. उदाहरणार्थ संगीत नाटकांनंतर तयार करण्यात आलेलं पहिलं वास्तववादी नाटक हा तेव्हाचा एक प्रयोगच होता. या सगळय़ानंतरही व्यक्तिपरत्वे प्रायोगिक नाटकांच्या व्याख्या बदलतात. हीच प्रायोगिक नाटकाची खासियत आहे. ते प्रयोगाचे चक्र सतत फिरते राहते. पिढय़ा, दशकं बदलत राहतात, परंतु ते फिरतच राहते.
मुंबईत प्रायोगिक हिंदी-इंग्रजी कला सादरीकरणासाठी पृथ्वी थिएटर तर मराठीसाठी छबिलदास नाटय़गृह प्रचलित आहे. ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ने ‘सुदर्शन रंगमंच’ हे व्यासपीठ निर्माण केले. आता त्याच्या जोडीला ‘ज्योत्स्ना भोळे नाटय़गृह’ हा नवा रंगमंच पुण्यात कार्यरत आहे. नेपथ्य, प्रकाश योजना, मेकअप, कपडे या सगळय़ा व्यावसायिक प्रयोगांच्या छटा, प्रायोगिक मंचावर दुर्मीळ असतात. आजच्या काळातला एकांकिका हा नाटक प्रकार बघायचा झाला तर ते नवनवीन प्रयोगच असतात. या प्रयोगांना कित्येकदा तंत्रज्ञानाची जोड असते. भोवतालचे समजून तेच आपल्या लेखणीतून उतरवावे हे आजच्या तरुण लेखकांना समजते आहे, त्याचेच प्रयोग आपल्याला पाहायला मिळतायेत.
पूर्वी प्रायोगिक रंगभूमीवर कमीत कमी रंगमंच नेपथ्य वापरून नाटके व्हायची. आजच्या तरुणाईची प्रयोगाची व्याख्या वेगळी आहे. हे प्रयोग अगदी कथानकापासून सुरू होतात. पूर्वीचे प्रयोग समाजातल्या परिस्थितींवर असायचे. आताची तरुणाई सर्जनशील प्रयोगाला जास्त महत्त्व देताना दिसते. आजकाल सगळय़ाच नाटकांचा प्रेक्षक विचारी असतो, परंतु प्रायोगिक रंगभूमी बघायला येणारा प्रेक्षक त्यातल्या त्यात जास्त निवडक असतो. शुद्ध इंग्रजीत ह्याला ‘टार्गेट ऑडियन्स’ असं म्हणत असल्याचं पुण्याची शर्वरी लहाडे सांगते. सद्य:स्थिती अशी आहे की, प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळय़ा नवीन आशयांचे खूप प्रयोग होत आहेत. अर्थात गेली दोन र्वष साचलेलं सगळं एकदम बाहेर पडतंय, त्यामुळे प्रेक्षक काहीसे विभागले गेलेत; पण एकंदर चित्र अतिशय आशादायक आहे. विशेषत: तरुण प्रेक्षकांची मानसिकता आता बदलत चालली आहे, त्यांना नुसते मनोरंजन नको आहे. आता ते काही तरी आजूबाजूला खरंखुरं घडणारं बघू इच्छित आहेत, असं म्हणणारी शर्वरी आपल्याकडची तरुणाई मनापासून प्रायोगिक नाटकांमध्ये रमत असल्याचं सांगते. प्रत्येक देशात ही प्रायोगिकत्वाची लाट येऊन गेली आहे आणि ती प्रेक्षकांनी अगदी सकारात्मकतेने स्वीकारली आहे, असं ती म्हणते. पनवेलच्या ‘रिफ्लेक्शन थिएटर ग्रुप’ची वैष्णवी साखरे सांगते, प्रायोगिक नाटकांचे नेपथ्य जर असलेच तर ते जास्तीत जास्त हाताने बनविण्याचा प्रयत्न आम्ही करतो, कारण पैसे वाचतात. त्याचा गाभा इतर नाटकांपेक्षा वेगळा असल्याने तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा अट्टहास असतो.
काही तरुणांचे असेही म्हणणे आहे की, प्रायोगिक रंगभूमीला व्यावसायिक नाटकांसारखे स्टेज उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे जेवढं उरलंय तेवढंही आता मावळतीला आलंय. काही वर्षांपूर्वी पुणे शहर प्रायोगिक रंगभूमीचे हक्काचे स्थान बनले होते. ‘आसक्त’, ‘नाटक कंपनी’, ‘रंगदृष्टी’, ‘रंगभाषा’ या नाटक संस्था प्रायोगिकसाठी धडपडत असतात. परदेश दौरेही मोठय़ा प्रमाणात होत असत, पण कोविड परिस्थिती व लोकांची पसंती या कारणांमुळे प्रेक्षकांनी प्रायोगिककडे पाठ फिरवली आहे की काय अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे. एखादी नाटक संस्था प्रायोगिक नाटकांच्या भरवशावर आर्थिक गणिते बांधू शकत नाही. ते नाटक बसण्यासाठी काही वेळसुद्धा जावा लागतो. अशा अनेकविध तांत्रिक अडचणींमुळे नाटकांची प्रायोगिक लाट जराशी मंदावली आहे.
थोडक्यात काय, तर तरुणाई आजही प्रायोगिक नाटकाला आपलीशी करू पाहातेय. योग्य रंगमंच, नवीन तंत्रज्ञान व प्रौढ प्रेक्षकांची फौज मिळायला हवी. ती बाजू फारशी बरी नसतानाही तरुणाईचा ध्यास मात्र कायम आहे . प्रायोगिक रंगभूमी आवडणं हे खरं तर व्यक्तिसापेक्ष आहे, पण नवीन काही तरी म्हणून बघण्यास हरकत नाही. मराठी सृष्टीतले अनेक तरुण अभिनेते आजही फक्त प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहेत. डिजिटल काळातही हे तरुण रंगकर्मी प्रायोगिकतेची कास धरून आहेत हे चित्रही सुखावणारे आहे.
viva@expressindia.com