नीलेश अडसूळ

यशाचा एक विशिष्ट टप्पा गाठला की भारतीयांना परदेशाची ओढ लागते. मग कामानिमित्त परदेशात गेलेल्या भारतीयांना कालांतराने भारताचा विसर पडतो आणि ते तिथलेच रहिवासी होतात. पण काही भारतीय असेही आहेत जे परदेशात उच्च पदावर असूनही आजदेखील त्यांची नाळ इथल्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. इथली संस्कृती, संस्कार याविषयी त्यांना जिव्हाळा आहे. असाच एक तरुण शास्त्रज्ञ म्हणजे प्रणित पाटील.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
study of psychology, digital campaigning in elections
निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

अमेरिकेत ‘नासा’सारख्या विज्ञान संस्थेत कार्यरत असूनही आपल्या मातीविषयी वाटणारी ओढ आणि समाजाच्या प्रगतीचा विचार यामुळेच आज प्रणितने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. टाळेबंदीच्या काळात भारतात अडकल्यानंतर केवळ स्वत:च्या कामात तो मग्न झाला नाही तर घराबाहेर पडून आपल्या समाजाच्या व्यथा, अडचणी, उपजीविकेचे प्रश्न त्याने समजून घेतले. हे समजून घेताना त्यांना आगरी कोळ्यांच्या परंपरेने चालणाऱ्या मासेमारी आणि मासेविक्रीच्या व्यवसायात काही त्रुटी जाणवल्या. त्यात टाळेबंदीमुळे मासेमारीचे प्रमाण घटल्याने मत्स्य व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाचे प्रश्न अधिकच गंभीर होत चालल्याचे त्याच्या लक्षात आले.  यावर तोडगा म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्याने आगरी कोळ्यांचा पारंपरिक व्यवसाय ऑनलाइन माध्यमातून राज्यभरात पोहोचवण्याची मोट बांधली आणि त्यातूनच ‘बोंबील’ अ‍ॅपची निर्मिती झाली.

‘बोंबील अ‍ॅप’च्या निर्मितीविषयी प्रणित सांगतो,  माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पनवेलमध्ये झाले. अलिबाग माझे मूळ गाव असल्याने गावाविषयी, समाजाविषयी कायमच आत्मीयता होती. मी परदेशी काम करत असलो तरी ज्या आगरी कोळी समाज्याचे प्रतिनिधित्व मी करतो त्या समाज्याचा विकास कसा करता येईल, पारंपरिक व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन काय नवा प्रयोग करता येईल याबाबत बरेच दिवस विचार सुरू होता. कारण आमच्या पारंपरिक व्यवसायात कालांतराने परप्रांतीयांनी हस्तक्षेप केला. व्यवसायाचे स्वरूप बदलून गेले. हळूहळू त्यात दलाल आले, मग साठेबाजी आली आणि शेतकऱ्याप्रमाणेच आगरी कोळ्यांचे मासे कवडीमोलात घेऊन चढय़ा भावाने ते बाजारपेठेत विकू लागले. यामध्ये दलाल श्रीमंत झाले, पण मासे पकडणारा आणि बाजारात विकणारा आमचा समाज मात्र कर्जबाजारी झाला. आज कोळीवाडे नामशेष होत चालले आहेत. आमच्याकडून ७० रुपयांना घेतलेले बोंबील दलालांकडून २०० रुपयांनी बाजारात दिले जातात हे चित्र काहीसे खटकत होते. माशांचा लिलाव करण्याची पद्धत यातून रूढ झाली. मग दलालांनी कर्जबाजारी लोकांना अर्थसाहाय्य करत त्यांच्या होडय़ाही ताब्यात घेतल्या आणि एक एक करून संपूर्ण व्यवसायावर आज त्यांचा अंमल आहे. मग यातून वाट काढायची असेल तर आपल्याला आपली बाजारपेठ वसवली पाहिजे. पण टाळेबंदीमुळे ते शक्य नसल्याने त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन अ‍ॅपच्या साहाय्याने ऑनलाइन बाजारपेठ उभी करण्यात आली आणि त्याला ‘बोंबील— स्मार्ट कोळीवाडा’ असे नाव देण्यात आल्याचे तो सांगतो.

टाळेबंदीत हजारो टन माल पाण्यात फेकून दिल्याची वार्ता गणेश नाखवा या माझ्या मित्राने मला सांगितली. मग त्याच्याच मदतीने मी मच्छीमार समितीशी संपर्क साधला. सप्लाय चेनसाठी योगेश पाटील, मीडियासाठी सर्वेश तरे, स्टोरेजसाठी राजन भोकरे, ुमन रिसोर्ससाठी सुशांत पाटील, डेटासाठी विनोद खारीक अशा आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या मित्रांना एकत्र केले. या अ‍ॅपचे दोन प्रकार आहेत. पहिला मासे विक्रेत्यांसाठी आणि दुसरा ग्राहकांसाठी. बोटीतून उतरलेले ताजे मासे थेट अधिकृत नोंदणी असलेल्या आगरी कोळी बांधवाकडे जाणार. त्यात कोणत्या बोटीत कोणता मासा आहे त्याचा दर काय हे सर्व अ‍ॅपच्या माध्यमातून त्या विक्रेत्याला समजणार. विशेष म्हणजे हा व्यवहार ऑनलाइन होत असल्याने त्यात कुठेही कर्जाचा संबंध नाही. यासाठी मच्छीमारांना आणि विक्रेत्यांना बँकेचे व्यवहार शिकवण्यात आले आहेत. अनेकांचे बँकेत खातेही नव्हते. अशा सर्वाना राष्ट्रीयीकृत बँकेत खाती दिली आहेत. शिवाय अ‍ॅप कसे वापरावे, त्यात अडचणी आल्या तर काय करावे याचेही प्रशिक्षण त्यांना बोलीभाषेतून देण्यात आले आहे. अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे रात्री पडकलेले मासे सकाळी ग्राहकांच्या घरी असतील. ग्राहकांकडे असलेल्या अ‍ॅपमध्ये आपल्या घरानजीक असलेला विक्रेता, माशांचे प्रकार आणि माशांचे दर दिसतील शिवाय हे मासे आपल्या घरपोच किंवा नजीकच्या ठिकाणी आणून दिले जातील, अशी माहिती त्याने दिली.

आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून हे क्रमांक १ चे ट्रेंडिंग अ‍ॅप ठरले आहे. समाजातल्या ७०० विक्रेत्यांनी यावर नोंद केली असून १५० विक्रेते सक्रिय झाले आहेत. आनंदाची बाब म्हणजे या अ‍ॅपची दखल घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग भागांतील लोकांनीही या सेवेबाबत आमच्याशी संपर्क साधला आहे. आता या व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी पुढील उपाययोजना सुरू आहेत. टाळेबंदीनंतर प्रत्येक विभागात एक केंद्र उभारण्याचाही आमचा विचार आहे, असे प्रणितने सांगितले.

viva@expressindia.com