आज युथ फेस्टिवल असो वा आय. एन. टी., मल्हार असो वा उमंग, नॅरिटस् असो वा एनिग्मा.. हे सर्वच फेस्टिवल्स कॉलेजच्या तरुणाईमध्ये लपलेल्या कलावंताला ओळख मिळवून देतात. कॉलेजचे फेस्टिवल्स म्हटलं की, मज्जा, धम्माल आणि स्पर्धा आलीच.  पण या पलीकडेही या फेस्टिवल्सची काहीतरी ओळख असते. कॉलेजच्या या फेस्टिल्समुळेच तरुणाईला त्यांची कला सादर करण्याची संधी मिळत असते. अशाच या फेस्टिवल्समुळे हळूहळू घडत जातो एक दर्जेदार कलावंत. 
कॉलेजच्या या फेस्टिवल्समुळे मिळालेली संधी बनते. कॉलेजमधील तरुण कलावंतांची एक वेगळी ओळख आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेला वाव मिळतो व त्याच्या करिअरला सुरुवात होते. आज प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थी अनेक फेस्टिवल्समध्ये भाग घेत बक्षिसे मिळवत उंचावले आहेत. असाच हा फेस्टिवल्स आता कलावंतांचा आधारस्तंभ म्हणजेच जीव बनला आहे. कलावंत छोटय़ा कॉलेजचा असो वा मोठय़ा पण त्या सर्वानाच या फेस्टिवलमध्ये समान संधी मिळते आणि त्यातूनच घडत असतो एक उच्च व उत्तम दर्जाचा कलावंत.

खरंच फेस्टिवल्समुळे आमच्यासारख्या तरुणाईला त्यांची कला दाखवण्याची संधी मिळत असते. मी स्वत: युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. आमच्या कॉलेजच्या नाटक विभागातून मी माझी कला युथ फेस्टिवलमध्ये दाखवली होती.  खरंच खूप वेगळा अनुभव होता तो फेस्टिवल्समधील परीक्षकांनी दिलेले सल्ले हे खूपच चांगले आणि आमचे करिअर उंचावणारे असतात.
स्नेहल भुजबळ

मी एका मध्यमवर्गीय मराठी घरात जन्माला आलो. परेलच्या खोजा कासम चाळीत आपले बापण घालवले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.  चाळीतील एकांकिका स्पर्धेतून माझ्या अभिनयाला सुरुवात झाली, पण मला खरी संधी मिळाली ती विविध कॉलेजमधील फेस्टिवल्स तसेच युथ फेस्टिवल व आय. एन. टी. या स्पर्धामुळेच. एकांकिका स्पर्धा असो वा गाणे, डान्स असो वा स्टील मोनो अ‍ॅक्टिंग असो वा मिमिक्री सर्व गोष्टींमध्ये मी भाग घेत राहिलो. मी सध्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकांसाठी काम करीत असून मी ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या सीरियल व ‘दुभंग’ या चित्रपटासाठीदेखील काम केले आहे आणि अगदी खरंच सांगायचं झालं तर या यशाची सुरुवात खऱ्या अर्थाने झाली ती युथ फेस्टिवलमध्ये सलग तीन वेळा मिळालेल्या सुवर्णपदकामुळे व आयएनटीमध्ये मिळालेल्या सवरेत्कृष्ट अभिनेता या पदवीमुळे, पण खरंच माझ्या या यशस्वी करिअरचे मूळ हे कॉलेज फेस्टिवल्स आहे त्यामुळेच मला माझी कला दाखविण्याची संधी मिळाली.
सनीभूषण मुणगेकर 

खरंच फेस्टिवल्समुळे खूप काही शिकायला मिळत असतं. मी स्वत: आमच्या कॉलेजमध्ये झालेल्या युथ फेस्टिवल्सच्या आयोजन टीममध्ये सहभागी होते. यामुळे आपण शिस्तीत कसे राहायचे व एखादा कार्यक्रम कसा आयोजित करायचा याबद्दल खूप काही माहितीही मिळाली व हे सर्व आयोजन जवळून पाहण्याची संधीदेखील मिळाली.
सुप्रिया परब

कविता मना-मनांतील…
फेस्टिवल्समुळे कलावंताला त्याची कला दाखविण्याची संधी मिळते. याच फेस्टिवल्समध्ये वेगवेगळे विद्यार्थी एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून उभे असतात, त्यांचे अनुभव व त्यामुळे मिळालेली समज यामुळे त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण येतं, असंच काहीसं घडलं ते कवी पंकज दळवी, कवी मनीष तपासे व कवी गीतेश िशदे यांच्याबरोबर. काव्यवाचन, काव्यलेखन अशा स्पर्धा त्यांनी अनेक फेस्टिवल्समध्ये गाजवल्या व त्यासाठी त्यांना पन्नासहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. तिघेही विभिन्न विचारांचे व विभिन्न क्षेत्रातले एका फेस्टिवलच्या माध्यमातून एकमेकांसमोर कट्टर स्पर्धक म्हणून आले. त्यांच्यासाठी तो फेस्टिवल तेव्हा भलेही स्पर्धा होती पण नंतर शब्दांनी किंबहुना कवितांनी त्यांना एकत्र आणलं.  मराठी कवितेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांना वाटत होतं आणि मग हे तिन्ही कवी एकत्र आले आणि अशाच ध्यासातून ‘प्रीझम आर्ट्स’ या संस्थेची स्थापना करून ‘कविता मना-मनांतली’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम रसिकांच्या चरणी अर्पण केला. आई-बाबा, निसर्ग, बापू, नथूराम अशा आगळ्यावेगळ्या कविता सादर करत बघता बघता या कार्यक्रमाचे पन्नासहून अधिक प्रयोगही सादर झाले. वयाने लहान पण एक यशस्वी वाट मिळाली, ती त्या फेस्टिवल्समुळेच असेही तिघे आवर्जून सांगतात.