एकाचवेळी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ आणि ‘ओल्ड इज गोल्ड’ हे दोन्ही परपस्परविरोधी विचार परिस्थितीनुरूप आचरणे जसे योग्य तसेच अध्यात्माचेही आहे. अध्यात्म हा आत्मोन्नतीचा मार्ग आहे. मात्र आकाशातील स्वर्गात बसलेला परमेश्वर प्रार्थनेने अथवा उपासनेने प्रसन्न होऊन आपल्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण करेल, असे समजून कर्मकांड करणे म्हणजे निश्चितच भक्ती नव्हे. गेल्या काही वर्षांत पंढरीच्या वारीत मोठय़ा संख्येने सहभागी होणारी तरुणाई अध्यात्माच्या या वाटेवर धावपळीच्या जीवनात दुर्मीळ असणारी मन:शांती शोधत आहे. वारीतील समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होत आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटस्वरून वारीचे फोटो मोठय़ा प्रमाणात शेअर होताना दिसू लागले आहेत. वारीतील तरुणाईचा हा वाढता संचार निश्चितच उत्साहवर्धक आहे. भक्तीच्या या मार्गावर परिस्थितीला धीराने तोंड देणारे आत्मबळ मिळत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण तोच वारीचा मुख्य उद्देश आहे. आताच्या आधुनिक भाषेत सांगायचे तर वारी हे अतिशय उत्तम स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप आहे, सांगतोय प्रशांत मोरे
बालपण खेळण्यात आणि तरुणपण बेहोशीत जगल्यानंतर म्हातारपणी पैलतीर दिसू लागले की उपरती होऊन व्यक्ती देवाच्या भजनी लागते, अशा अर्थाचे एक संतवचन जवळपास सर्वच पंथियांमध्ये प्रचलीत आहे. जगात देव आहे की नाही या विषयाची चर्चा कोणताही ठोस निष्कर्ष न निघता युगानुयुगे तशीच सुरू राहणार असली तरी ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ हे वचन कोणालाही पटणारे आहे. पैशाने भौतिक सुविधा मिळतात, मात्र सुख मिळेलच याची शाश्वती नसते. उलट जितके अधिक पैसे, तितका खर्च. पुन्हा स्पर्धेचे युग असल्याने इथे कुणीच सुरक्षित नाही. याच असुरक्षिततेच्या भावनेतूनच काही वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशातील युवा पिढी देवाच्या भजनी लागली. अर्थात हे असे देवाला शरण जाणे भयापोटी होते. अतिरेकी भौतिक सुख भोगल्यानंतरही अशांतच राहिलेल्या मनाला बरे वाटेल, असे मलम शोधण्याची ती केविलवाणी धडपड होती. ओशो आणि तत्सम अनेक आध्यात्मिक गुरूंनी त्यांच्या मनातील या अपराधी भावनेला मोठा आधार दिला. ‘संभोग से संन्यास तक..’ यात ओशोने कोणतीही नवी गोष्ट सांगितली नव्हती. ‘आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा..’ असे आपल्या संतांनी खूप आधीच म्हणून ठेवले आहेच की. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे नवनवे अर्थ काढून आपापल्या मगदुराप्रमाणे त्यावर निरूपण करणाऱ्या बाबा-बुवांच्या संप्रदायांचे सध्या भरपूर पीक आलेले आहे. त्यापैकी अनेक केंद्रांचे हजारो, लाखो अनुयायी आहेत. मात्र असे असले तरीही श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील भेद ओळखण्याची सदसद्विवेकबुद्धी बाळगून संसारात स्वार्थाबरोबरच परमार्थ साधण्याची शिकवण देणारा भागवतधर्मच महान आहे. परकीय आक्रमकांच्या छायेत असणाऱ्या महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान आणि परंपरा याच भागवतधर्माने टिकवून ठेवली. खांद्यावर भगवी पताका घेत पंढरीची वारी करण्याची परंपरा महाराष्ट्रात नेमकी कधी सुरू झाली, हे अद्याप समजू शकले नाही; पण भागवतधर्माची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्याही आधी ती सुरू होती, एवढे मात्र निश्चित. कारण ज्ञानेश्वरांच्या आजोबांनी पंढरपूरची यात्रा केल्याचा उल्लेख सापडतो.
पंढरपूरची वारी वर्षांनुवर्षे टिकली ती त्या वाटेवर मनाची मशागत होते म्हणूनच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून वर्षभर प्रतिकूलतेचा सामना करणाऱ्या सश्रद्ध भाविकास हीच वारी नवे आत्मबळ देत आली आहे. वारकरी कधीही पंढरीच्या पांडुरंगाकडे कोणतीही भौतिक स्वरूपाची मागणी करीत नाहीत. ते देवाला केवळ साकडं घालतात, गाऱ्हाणं मांडतात, पण नवस बोलत नाहीत. उलट वारीतला शुद्ध सात्त्विक भाव सोबत घेऊन वर्षभर त्याआधारे आल्या प्रसंगाला ते धीराने तोंड देत असतात. ‘हे ईश्वरा, जी परिस्थिती मी बदलू शकतो, ते बदलण्याचे मला बळ दे; अन् जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती सहन करण्याची मला शक्ती दे!’ असा मनाचे सामथ्र्य वाढविणारा निर्धार यामागे असतो.   
शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या वारीत गेली काही वर्षे नजरेत भरण्याजोगी तरुणाई दिसू लागली आहे. त्यात विशेषत: आयटीवाले अधिक आहेत. वारीत जाण्याच्या प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतात. वारीत गेल्यावर बरे वाटते. मन शांत होते. टेन्शन दूर होते. समाधान मिळते. रोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये बदल झाल्याने बरे वाटते. महानगरीय जीवनशैलीत अभावानेच दिसणाऱ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य जनताजनार्दनाचे दर्शन घडते. देव भावाचा भुकेला नसून तो दीनदुबळ्यांच्या सेवेचा भुकेला असल्याची प्रचीती येते. त्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे पटते, अशी अनेक कारणे तरुण देतात. आता तरुणांच्या या वारी भक्तीला फॅशन म्हणा वा पॅशन, फॅड म्हणा वा छंद असा प्रश्न काहींना पडू लागला असून तो रास्तच आहे. अशाच कारणांसाठी पूर्वीपासून तरुणांचे समूह सह्य़ाद्रीच्या डोंगरकपाऱ्यांमध्ये ट्रेकला जात आहेत. त्यातूनच मग एखाद्या किल्ल्यावर नियमितपणे येऊन साफसफाई करणे, परिसरातील शाळांचे यथाशक्ती सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणे, वैद्यकीय शिबिरे राबवून दुर्मीळ भागात आरोग्य सुविधा देणे आदी उपक्रम तरुणांमार्फत सुरू असतात. या असल्या ‘सोशल अ‍ॅक्टिव्हिटी’मध्ये पूर्वी नियमितपणे सहभागी होणारा मात्र त्यातील फोलपणा जाणवल्यानंतर आता त्यातून बाहेर आलेल्या एका डॉक्टर मित्राचा अनुभव या बाबतीत अतिशय बोलका आहे. तो म्हणतो, होतं काय. आपण आपल्याला बरं वाटावं म्हणून हे सर्व करतो. ती निष्काम सेवा नसतेच मुळी. आता वारीच्या निमित्ताने अंगावर घेतलेली ही अध्यात्माची झूल अशाच प्रकारे केवळ पापक्षालन अथवा पुण्य कमाविण्याच्या हेतूने असेल तर त्यातून ना धड समाजाची सेवा होणार ना आत्मोन्नती. अर्थात पुन्हा मन. कारण आपण सर्व जगाला फसवू शकतो, पण स्वत:ला म्हणजेच मनाला नाही. तेव्हा वारीच्या म्हणजेच आत्मोन्नतीच्या मार्गावर आपण कुठपर्यंत पोहोचलो, याचा हिशेब ज्याचा त्यानेच करायला हवा. एक मात्र नक्की, वारीच्या मार्गावर चालायला लागल्यावर वाममार्गी लागून तारुण्य नासण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते, हेही नसे थोडके…

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला