‘क्राफ्ट कॅफे’ किंवा ‘क्रिएटिव्ह इव्हिनिंग्स’ या गोष्टीचा ट्रेण्ड सध्याच्या यूथमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. एखाद्या कॅफेमध्ये एखादी संध्याकाळ केवळ क्राफ्टच्या वस्तू बनवत घालवणं, सोबत एखादा कॉफीचा मग आणि सूदिंग गाणी किंवा म्युझिक अशा वातावरणात आपला वेळ घालवायला तरुणाईला आवडतं. अशा प्रकारचे कॅफे सुद्धा आसपास वाढत्या संख्येने दिसून येतात. असे कॅफे जिथून तुम्हाला कोणी उठवत नाही, तुम्ही कितीही वेळ स्वत:च्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष देऊ शकता आणि त्यात रंगून जाऊन, वेळेचं भान विसरून तुमच्या क्राफ्टला आकार देऊ शकता.
सध्या अनेक कॅफे असे इव्हेंट्स होस्ट करतात ज्यात एखाद्या सोशल कारणासाठी क्राफ्टचा सहभाग असतो. एखाद्या एनजीओसाठी बॅग्स पेंट करणं, बुकमार्क्स बनवणं, पॉट पेंटिंग करणं, ग्लास पेंटिंग करून फ्रेम्स बनवणं, अशा इव्हेंट्ससाठी एनजीओ एखादा व्हेन्यू निवडतात, सोशल मीडियावर पब्लिसिटी करतात आणि वेगवेगळ्या वयाची अनेक मंडळी तिथे जमा होतात. त्यातली आताची तरुणाई खासकरून या सगळ्या इव्हेंटकडे मेंटल रीलॅक्सेशन म्हणून पाहते. त्यांना सोशल होण्याचंही समाधान मिळतं आणि क्राफ्ट करताना खरोखरची मानसिक शांतताही मिळते.
केवळ इव्हेंटच नाही तर आपल्या प्रचंड पॅक्ड दिवसातून थोडासा वेळ जाणूनबुजून बाजूला काढून आर्ट किंवा क्राफ्ट स्किलसाठी देणं याकडेही आताची तरुण पिढी विशेष लक्ष देते. ‘कुठे वेळ मिळतो आहे अशा गोष्टी करायला’ किंवा ‘ऑफिसचं काम घरी आल्यावर तरी संपतं का’ अशा कारणांना तरुण पिढी स्वत:पासून कौशल्याने दूर ठेवते आहे. आताची तरुण पिढी स्वत:च्या आवडीसाठी आणि स्वत:मधल्या आर्टिस्टसाठी आवर्जून वेळ काढते.
यूट्यूबवर पॉप्युलर होत असलेले अनेक आर्ट आणि क्राफ्टचे व्हिडिओज हल्ली याच कारणांमुळे ट्रेण्डमध्ये असतात. वेगवेगळ्या पद्धतीने क्राफ्ट करण्याचे नवनवीन मार्ग तरुणाई शोधून काढत असते. मग ते अगदी लोकरीच्या विणकामापासून ते क्विलिंगपर्यंत आणि पॉटरीपासून ते पेंटिंगपर्यंत अशा अनेकविध कलांमध्ये स्वत:ची शांतता शोधण्याचा प्रयत्न तरुणाईकडून केला जातो.
स्वत:च्या हाताने काहीतरी बनवल्यावर वाटणारा आनंद आणि समाधान यामुळे माणसाला अगदी साध्या आणि नैसर्गिक पद्धतीने आनंद मिळतो. क्राफ्टमध्ये केवळ हात नाही तर मेंदूही कामाला लागतो. म्हणजे खरं तर मेंदूला वेगळ्या प्रकारचं कामच दिलं जातं, पण त्यात मेंदू इतका गुंतून जातो की त्याला दुसरा विचार करायला अवसरच मिळत नाही. बाकीच्या गोष्टींकडे तेवढ्या वेळेपुरतं का होईना, पण दुर्लक्ष होतं. आणि त्या वेळेत पूर्ण नवीन विचारांनी, कुतुहलाने आणि काहीतरी ‘क्रिएटिव’ करण्याच्या सर्जनशील विचारांनी मेंदू भरून जातो. त्या त्या क्षणात जगल्याने आणि त्या क्षणावर लक्ष दिल्याने मेंदू दुसर्या विचारांमध्ये भरकटत नाही.
आपण करत असलेलं क्राफ्ट पूर्ण झालं की आपल्याही नकळत मेंदूला आत्मविश्वास मिळतो. काहीतरी पूर्ण केल्याचं समाधान मेंदूला मिळतं आणि त्याने ‘हॅपी हॉर्मोन्स’ वाढतात. या सगळ्यामध्ये आपोआपच डिजिटल डिटॉक्स सुद्धा होऊन जातो. स्क्रीनपासून लांब राहणं शक्य झाल्याने आणि मेंदूला चालना देत असल्याने मन ताजंतवानं व्हायला मदत होते.
लहानपणी कार्यानुभवाच्या तासाला मजामस्ती करणारी हीच तरुणाई आता कुठे त्या कार्यानुभवाच्या तासाची खरी मजा घेते आहे. त्यात नेमका काय आनंद होता हे सतत चोवीस तास काम केल्यामुळे शीणलेल्या मेंदूला आता समजायला लागलं आहे. केवळ चिकटवह्या बनवून घेऊन शाळेची रद्दी वाढवणं हा त्यामागचा उद्देश नव्हता, तर एका जागी शांतपणे बसून, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, नाजूकपणे आणि बारकाईने लक्ष देऊन एखादी गोष्ट करण्याची मेंदूला आणि शरीराला सवय लागावी, हा त्यामागचा उद्देश आता अनेकांना जाणवतो आहे. सतत भरकटलेल्या आणि चंचल मनाला एका जागेवर स्थिर करण्यासाठी हे आर्ट अँड क्राफ्ट थेरपीसारखं काम करतं आहे.
viva@expressindia.com
