‘एक तार तुटली आणि एक तार पुन्हा जोडली गेली’, ‘रुपयाची किंमत वाढावी यासाठीच सर्वोच्च न्यायालयाची डान्स बारला परवानगी’, ‘आर. आर. पाटील यांनी त्यांचे नाव बदलून बार.बार. पाटील करावे’, या प्रतिक्रिया आहेत सोशल नेटव़र्किंग साइटवरच्या. २००६ साली बंद झालेल्या डान्स बारची छम  छम पुन्हा एकदा सुरू होणार या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आज वेगवेगळ्या पातळीवर निषेध नोंदवण्यासोबतच स्वागतही केले गेले. कुणी निषेधाचा सूर लावला, तर कुणी पुन्हा एकदा मुंबईला गतवैभव प्राप्त होणार म्हणून कोपरखळी मारली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, विशेषत: अवघी तरूणाई सोशन नेटवर्किंग साइटवर व्यक्त होऊ लागली आहे. ‘फिर बठैंगे तीन यार’, असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. तर काहींनी भारतीय संस्कृतीचे गुणगान गात संस्कृतीवर हल्लाबोल म्हणून वैचारिक शुद्धिकरणासाठी निबंध छापायला सुरूवात केली आहे.
महाराष्ट्रातील डान्सबारवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनेतील समानतेच्या तत्वाविरोधात असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यानंतर, ’चलाओ ना ननो से बाण रे’ ऐवजी ’चलाओ ना नोटो के बाण रे’, अशी सुधारणा गाण्यामध्ये करावी लागेल, असा संदेश व्हॉट्स ऑपवर फिरत आहे.
अनेक मित्रांनी वृत्तवाहिन्यांच्या साइटवरील या बातमीच्या िलक फेसबुक, ट्विटर आणि गुगल प्लससारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करताना आपल्या मित्रांना त्यामध्ये टॅग केलं आहे. तर काहींनी, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वॉलवर मित्रांतर्फे, ‘हा निर्णय म्हणजे तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट असून आजची पार्टी डान्स बारमध्येच होऊन जाऊ दे’, असा संदेश पोस्ट केला आहे.
डान्स बार सुरू होण्याचा निर्णय जुन्या-नव्या चित्रपटांशीही जोडण्यात आला आहे. मुंबईतील डान्स बारवर आधारित चित्रपटातील प्रसिध्द ‘चांदनी बार’ चित्रपटाचा उल्लेख आघाडीवर आहे. ‘चांदनी पुन्हा एकदा डान्स बारची वाट चालणार’, असा संदेश सर्वत्र फिरत आहे. तर लवकरच प्रसिध्द होणा-या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई – दोबारा’ या चित्रपटाचं ‘वन्स अपॉन अ टाइम इन डान्स बार – दोबारा’, असं बारसं करण्यात करण्यात आलं आहे. प्रेषक आणि समीक्षक या दोघांनी सपशेल नाकारलेल्या ‘यमला पगला दिवाना’ मधील देओल बंधूंचा नाच सहन न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, असाही संदेश या निर्णयाच्या निमित्ताने कुणालातरी सुचला आहे.    
लोकांनी पट्टाया आणि दुबईमध्ये जाऊन पशाची उधळण करू नये आणि आपल्या देशातील पसा इथेच रहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, असे म्हणत काहींनी तर आजचा दिवस ‘हॅप्पी डान्स बार दिवस’, म्हणूनही घोषित करून टाकला आहे. डान्सबार संबंधीच्या यूटय़ूबवरील व्हिडिओंचे व्ह्य़ूवर्स वाढू लागले असून या निर्णयासंबंधीच्या बातम्यांच्या व्हिडिओवरचे क्लिक्सही भराभर वाढत आहेत.    
डान्स बारद्वारे रोजगार? आपल्याला असा रोजगार हवा आहे का? असा सवाल काही मंडळींनी उपस्थित केला आहे. अनेकांनी या निर्णयाचा संबंध थेट निवडणुकांशी जोडत आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काळ्या पशांची आवक लक्षात घेता राजकारणी आणि पोलिसांसाठी हा निर्णय फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.