प्रवेशासाठी पालकांकडून देणगी घेण्याच्या प्रकरणात चाळीसगाव येथील गुरूकुल ट्रस्ट संचलित तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयास नोटीस बजाविण्यात आली असून विद्यालयास ४० लाख रूपयांचा दंड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांकडे दहा हजार रूपये देणगीच्या स्वरूपात मागण्यात येत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने शाळेतील कर्मचाऱ्यांना रक्कम घेताना रंगेहात पकडून चार लाख रूपये ताब्यात घेतले होते. शाळेत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही या पथकास निदर्शनास आले.
पथकाने आपल्या कारवाईत शाळेने ४० विद्यार्थ्यांकडून घेतलेले प्रत्येकी १० हजार रूपये याप्रमाणे चार लाख रूपये, देणगीचे पावती पुस्तक, प्रवेश अर्ज व प्रवेशासाठी वापरलेल्या चिट्टय़ा जप्त केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
देणगी घेऊन प्रवेश देणे हा कायद्याने गुन्हा असल्याने या विद्यालयाविरूध्द कारवाई होऊ शकते. या विद्यालयात चार लाख रूपये जप्त करण्यात आल्याने या कायद्यानुसार ४० लाख रूपयांचा दंड होऊ शकतो.
एका विद्यालयावर कारवाई झाली असली तरी शहरातील अनेक विद्यालय व शाळांमध्ये पैसे घेऊनच प्रवेश देण्यात येत असल्याची
चर्चा आहे.