राज्यातील आठ जिल्ह्य़ांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत गेल्या सव्वा वर्षांत मेडिकलमध्ये ५७० रुग्णांवर शस्त्रक्रिया व अन्य उपचार करून दारिद्रय़ रेषेखालील व गरीब रुग्णांचे अश्रू पुसण्यात आले. ही योजना यशस्वी करण्यासाठी आरोग्य मित्रांनी फार परिश्रम घेतले.
राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील आठ जिल्ह्य़ांमध्ये २५ ऑगस्ट २०१२ पासून जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. यामध्ये अमरावती आणि गडचिरोली या आदिवासीबहूल जिल्ह्य़ांचा समावेश होता. या योजनेत एकूण ९७१ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश होता. गेल्या सव्वा वर्षांत मेडिकलमध्ये जवळपास ५७० रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. यामध्ये हाडांचे विकार असलेल्या शंभर रुग्णांचा समावेश आहे. या शस्त्रक्रिया आणि उपचारांचे ६० लाख रुपये एम.डी. या विमा कंपनीकडून मेडिकलला मिळणार आहे. याशिवाय खासगी रुग्णालयातही अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले.  
ही योजना सुरू करण्यासाठी मेडिकलमधील अधीक्षक कार्यालयाजवळ एक केंद्र उघडण्यात आले होते. या केंद्रात चार आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आली होती. हे केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहात होते. येथे येणाऱ्या रुग्णांची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना सुरुवातीला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली जात असे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्या रुग्णावर शस्त्रक्रिया व अन्य उपचार केले जात होते. आता २१ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी जीवनदायी योजनेंतर्गत ज्या रुग्णांची नावे नोंदवण्यात आली होती, ती आता नव्या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
नवीन योजनेत संपूर्ण राज्याचा समावेश झाल्याने विदर्भातील बहुतांश रुग्ण नागपुरात धाव घेणार आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. ज्यांना समस्या आहेत, अशा रुग्णांना आधी डॉक्टरांकडे दाखवण्यात येईल. निदान झाल्यानंतर रुग्णाला कोणते उपचार आवश्यक आहे, रुग्ण या योजनेत येतो काय, याचा विचार करूनच या योजनेचा लाभ मिळेल. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दारिद्रय़ रेषेखालील नागरिक, अंत्योदय लाभार्थी व केसरी शिधा पत्रिका धारकांना मिळणार आहे. याशिवाय रुग्णाला संबंधित विमा कंपनीकडून येण्या-जाण्याचा प्रवास खर्च दिला जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थी लाभ घेतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.