समता नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजीच ताळेबंद व नफा तोटा पत्रक जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवीत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षअखेर एकूण १६० कोटी रुपयांची ठेव मिळवून १२० कोटी रुपयांचे स्थावर मालमत्ता व सुरक्षित तारणावर कर्ज वाटप करून ० टक्के एन.पी.ए.ची परंपरा कायम राखल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
संस्थेच्या ठेवीमध्ये गत आर्थिक वर्षांत तब्बल ३६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गत आर्थिक वर्षांचे तुलनेशी वाढीचे हे प्रमाण २९ टक्के एवढे आहे. राज्यात दुष्काळाचे वातावरण व बाजारपेठेत मंदी असतानाही कठोर परंतु कायदेशीर वसुली करून समताने ० टक्के एन.पी.ए.ची परंपरा कायम ठेवली आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र कांतीलाल शहा यांनी सांगितले.
संस्थेला गत आर्थिक वर्षांत रु. ३ कोटी २० लाख एवढा ढोबळ नफा झालेला असून ठेवीवर जादा व्याजदर व कर्जावर कमी व्याज दर हे धोरण असूनदेखील काटकसर व व्यावसायिक धोरण यांची सांगड घालून चांगला नफा झाल्याचे मत संचालक राजुशेठ बंब यांनी व्यक्त केले.
संस्थेचे कामकाज अत्याधुनिक असून संस्थेतील ग्राहकास, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ. टी., रेल्वे तिकीट बुकिंग, विमान तिकीट बुकिंग सेवा, इन्कम टॅक्स, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल स्वीकारणे इ. सेवा ग्राहकांना पुरविण्यात येतात. ११ मे २०१३ या संस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनापासून संस्थेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग सुविधेने जोडल्या जाणार आहेत. कोअर बँकेचे माध्यमातून ग्राहकांना त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे घरबसल्या करता येतील. कोअर बँकिंगचे माध्यमातून समताच्या सर्व शाखा इंटरनेटद्वारा जोडल्या गेल्या आहेत, अशी माहिती सहव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली. संस्थेच्या प्रगतीत सर्व संचालक- अधिकारी – कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. यावर्षी ९७ व्या घटना दुरुस्तीप्रमाणे उपविधीमध्ये बदल करण्याकरिता सभासदांची रविवार दि. ७ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता विशेष सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीचे अनुषंगाने सभासदांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र तयार करुन संस्थेचे कामकाज अधिकाधिक गतिमान करणार असल्याचे, संस्थेचे संचालक गुलाबशेठ अग्रवाल तसेच चांगदेवशेठ शिरोडे यांनी सांगितले.