कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना काठावरील पावसाचा जोर आज दिवसभरात चांगलाच ओसरला असलातरी पावसाचा रात्रीचा जोर, तर दिवसाची ओढ ही तऱ्हा कायम आहे. कोयना धरणाचे दरवाजे ४ फुटांवरच ‘जैसे थे’ आहेत. दरम्यान, काल रात्रीच्या धुवाधार पावसामुळे धरणाचे दरवाजे ४ फुटांवरून साडेबारा फुटांपर्यंत उचलण्याचे धरणव्यवस्थापनाने नियोजन केले होते, मात्र सकाळपासून पावसाचा जोर पुरता निवळल्याने दरवाजे ४ फुटांवरच कायम करण्यात आले. कोयना धरणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत. या पाण्याचा विसर्ग १ लाख १९ हजार ९१२ क्युसेक असताना, २५६.७० टीएमसी क्षमतेच्या या १२ प्रकल्पांत सध्या २३२.५४ टीएमसी म्हणजेच ९०.५१ टक्के पाणीसाठा आहे.
कोयना जलसागरात सध्या ६५,५६९ क्युसेक पाण्याची भरघोस आवक असताना, धरणातून तुलनेत केवळ ४० टक्केच म्हणजेच २५,७३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. परिणामी, धरणाची पाणीपातळी प्रत्येक तासाला काही इंचांनी वाढत आहे. दिवसभरात धरणाची पाणीपातळी १ फुटाने वाढून २,१५२ फूट २ इंच असून, पाणीसाठा ९०.५७ टीएमसी म्हणजेच ८६.०५ टक्के आहे. दरम्यान, कोयना धरणामध्ये गेल्या ५६ दिवसांत धरणाच्या १०५.२५ टीएमसी क्षमतेपेक्षा जादा अशा १०७ टीएमसी म्हणजेच १०१.६६ टक्के पाण्याची आवक झाली आहे. पैकी धरणाच्या ६ वक्र दरवाजातून ४०.३९ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तर, पायथा वीजगृहासाठी २.८५ तसेच पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी ३.७४ टीएमसी पाणीसाठा वापरात येताना सुमारे ४७ टीएमसीचा धरणातून विसर्ग झाला आहे. उर्वरित ९०.५७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील विक्रमी पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट कायम असून, परंतु सततच्या पावसाचा खरिपाच्या पिकांना फटका बसणार असल्याचा कृषी अधिका-यांचा दावा आहे. यंदा आजअखेर दुष्काळी पट्टय़ातही तेथील सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे, मात्र हा पाऊस दुष्काळाची दाहकता पूर्णत: नाहीशी करणारा असल्याचे म्हणता येणार नाही.  
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव २३४.६, फलटण १६४.३, खंडाळा ३१६.५ तर, माण तालुक्यात अत्यल्प असा १२१.४ मि.मी. एकंदर सरासरी २०९.२ मि.मी पाऊस झाल्याची आकडेवारी आहे. तर गतवर्षी अवघ्या पावसाळी हंगामातील १२५ दिवसांत खटाव १७१, फलटण २०२, खंडाळा ३२३ तर, माण तालुक्यात १९१.२ मि.मी. सरासरी २२१.८ मि.मी. पावसाची नोंद आहे.
गतवर्षी परतीच्या पावसाने हंगामाच्या सांगतेला म्हणजेच तब्बल सव्वाशे दिवसांनी कोयना धरण कसेबसे क्षमतेने भरले होते. यंदा मात्र पहिल्या सत्रातील ४० दिवसांतच धरणातून पाणी सोडणे अपरिहार्य बनले. कराड तालुक्यात ३७७.८, तर पाटण तालुक्यात १३५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत गेल्या ३४ तासांत कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात १७५, एकूण ४,०७५, नवजा विभागात २०८ एकूण ४,७६४, तर महाबळेश्वर विभागात २४६ एकूण ४,५३१ मि.मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ४,४५६.६६ मि.मी. असून, तो आजवरच्या सरासरीत सुमारे ४० टक्क्याने जादा आहे. गतवर्षी एकूणच संपूर्ण हंगामात परतीच्या पावसासह ४७७६.३३ मि.मी. पावसाची नोंद आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ९०.५७ (८६.०५), वारणा ३०.२९ (८८.०७), दूधगंगा २१.८४ (८६), राधानगरी ८.२८ (१००), धोम ११.५४ (८५.५४), कण्हेर ८.८६ (८७.७५), उरमोडी ८.७१ (८६.९६), तारळी ५.११ (८७.४६), धोम बलकवडी ३.५५ (८६.६०) तर, सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पुणे जिल्ह्यातील वीर ९.४१ (१००), नीरा देवघर १०.८८ (९२.७८), भाटघर २३.५० (१००) या सर्व मोठय़ा प्रकल्पातून सध्या पाणी सोडण्यात येत असून, त्यातील वीर धरणातून सर्वाधिक ३३,३०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.