मध्य प्रदेशातून नंदुरबारमार्गे गुजरात राज्यात तस्करी होणारा सुमारे एक कोटी ४८ लाख ९१ हजार ५३० रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी तपासणी नाक्याजवळ ताब्यात घेतला. तस्करीसठी वापरण्यात आलेले दोन ट्रकही पथकाने जप्त केले आहेत.
रविवारी रात्री नऊच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी वाहन तपासणी नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवली असता एक कंटेनर व ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासणी केली.
तपासणीत २०३५ खोक्यांमध्ये  विदेशी मद्यसाठा आढळून आला. त्याची किंमत सुमारे एक कोटी ४८ लाख ९१ हजार ५२० रुपये असल्याचे सांगितले जाते. २५ लाखाची दोन वाहनेही पथकाने ताब्यात घेतली. या वाहनांचे चालक फरार असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक सी. बी. राजपूत, भरारी पथक प्रभारी निरीक्षक एस. डी. मराठे, उपनिरीक्षक वाय. आर. सावखेडकर, आर. आर. धनवटे, अक्कलकुव्याचे निरीक्षक भागवत सोनवणे आदिंनी ही कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्य़ातील या महिन्यातील ही मद्य तस्करी विरोधातील दुसरी मोठी कारवाई आहे. पाच जून रोजी अक्कलकुवा तालुक्यातच सुमारे एक कोटी ३५ लाख रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला होता. त्यावेळीही कंटेनरचा चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले होते.
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात व गुजरातमध्ये विदेशी मद्याची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे आणि या तस्करीवर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताच वचक राहिला नसल्याचे या कारवाईने सिद्ध झाले आहे.
ही तस्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच होत असल्याचे म्हटले जाते. खूपच ओरड झाली की पोलिसांकडून कारवाई केली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक कारवाईत फक्त वाहन व मद्यसाठा ताब्यात घेतला जातो. परंतु तस्कर हाती लागत नाहीत.