परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाऱ्याच्या दरवाजाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, एका विहिरीतील गाळ काढण्याचे काम पाणबुडीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. परभणी शहरासाठी सिद्धेश्वर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी गुरुवापर्यंत बंधाऱ्यात पोहोचेल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.
राहटी येथील बंधाऱ्याच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम तसेच तीनपैकी एका विहिरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोमवारी सकाळी महापौर प्रताप देशमुख, आयुक्त सुधीर शंभरकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, नगरसेवक अ‍ॅड. जावेद कादर, प्रमोद वाकोडकर, हासीब उर रहेमान, रामा कानडे यांनी कामाची पाहणी केली. औरंगाबाद येथील चेतन एजन्सीचे पाच कामगार विहिरीतील गाळ काढण्याचे काम पाणबुडीच्या माध्यमातून करीत आहेत. सध्या दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ावर काहीसा परिणाम होणार आहे. भविष्यात पाणीटंचाईची झळ शहरवासीयांना बसू नये, यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पूर्णा पाटबंधारे खात्याचे परभणी महापालिकेकडे पाण्याचे ५४ लाख रुपये थकीत देणे आहे. यापैकी ५ लाखांचा धनादेश महापालिकेच्या वतीने देण्यात आला.