तब्बल पावणेदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने आलेल्या सिन्नर तालुक्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिर्डीजवळील किनारा हॉटेलसमोर सापळा लावून काल (सोमवारी) ताब्यात घेतले. या आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या दोघांना अटक करुन आज येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अरुण देवराम पवार (वय ३०, रा. देवपूर) व रामेश्वर किसन साळुंके (वय ३०, रा. पांगरी खुर्द, दोघेही ता. सिन्नर) अशी अटक केलेल्या दोन आरोपींचे नावे आहेत. शिर्डी येथे बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने हे दोघे शिर्डीजवळील निघोज निमगाव शिवारातील हॉटेल किनाराजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या ठिकाणी पथकाने सापळा रचला होता. या सापळयात दोघे अलगद सापडले. १ हजार व ५०० रूपयांच्या या नोटा आहेत.
या आरोपींनी बनावट नोटा कोणाकडून आणल्या, शिर्डीत त्या कोणाला द्यायच्या होत्या, आत्तापर्यंत त्यांनी किती बनावट नोटा चलनात आणल्या, त्या कोठे तयार होतात याचा शोध पोलिस घेत आहेत. यात शिर्डीतील कोणाचा सहभाग आहे काय, याचाही तपास पोलिस करीत आहेत. बनावट नोटा चलनात आणण्याचे मोठे रॅकेट या निमित्ताने उघड होण्यास मदत होणार आहे.