नगर अर्बन बँकेस दिलेला धनादेश न वटता परत आल्याने फर्मच्या जामीनदारास १ कोटी रुपयांचा दंड व दीड वर्षे कैद तसेच दंड न भरल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. पी. दिवाण यांनी सुनावली.
खटल्याची माहिती अशी, येथील नहार हाऊस ऑफ व्हिडिओकॉन या फर्मने नगर अर्बन बँकेकडून सन १९९९ मध्ये ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीपोटी जामीनदार या नात्याने प्रदीप भगवानदास नहार यांनी बँकेस ८६ लाख ९३ हजार १०५ रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश न वटता परत आल्याने सन २००५ मध्ये बँकेने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला.
त्याची सुनावणी होऊन नहार यांना १ कोटी रुपयांचा दंड व शिक्षा देण्यात आली. बँकेच्या वतीने वकील प्रदीप भंडारी यांनी काम पाहिले. त्यांना वकील स्वप्ना मुळे, स्वाती शिंदे-पाटील यांनी साहाय्य केले.