येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात शनिवारी (दि. २१) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वाईकडून बोपर्डीकडे जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांना पुण्याकडे भरधाव जाणारा ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातात पसरणी, ता. वाई येथील सुशांत सुभाष महांगडे (वय १९) हा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेल्या विजय दत्तात्रय घाटे (वय २४) हा गंभीररीत्या जखमी झाला. अपघात पाहणाऱ्या श्याम कोठी व त्यांच्या मित्राने ट्रकचा गंधर्व हॉटेलपर्यंत पाठलाग केला, परंतु तो पसार झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की पसरणी, ता. वाई येथील सुशांत व विजय हे दोघे बोपर्डी येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मोटारसायकल (एम एच ११ बी. जे. ७८२०)ने जात असताना चांदणी चौकात औद्योगिक वसाहतीकडून पुण्याकडे भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने (एम. एच. ११ ए एल २१४५) या दोघांना धडक दिली. सुशांत महांगडे हा युवक डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला. तर सोबत असलेल्या विजय घाटे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती पसरणी गावात व परिसरात समजताच अबालवृद्ध तरुणांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. तेथे गटागटाने पळून जाणाऱ्या ट्रकबाबत चर्चा सुरू होती. वाईच्या औद्योगिक वसाहतीत गेली अनेक वष्रे मागणी असलेली पोलीस चौकी अद्याप न झाल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
चांदणी चौकात प्रत्यक्ष अपघात पाहणारे श्याम कोठी (वय २८) व त्याच्या मित्राने दुचाकीवरून गंधर्व हॉटेलपर्यंत ट्रकचा पाठलाग केला, परंतु तो पसार झाला.
सुशांत दहावी पास झाल्यापासून पडेल ते काम करून आईला आíथक हातभार देत होता. नुकताच त्याने मुक्त विद्यापीठाचा बारावीचाही फॉर्म भरला होता. काही महिन्यांपासून तो गरवारे इलेस्टो मेरिक्स (जेल) कामावर जात होता. नुकताच तो फर्स्ट शिप करून घरी आला होता. सायंकाळी मोठय़ा भावाचा वाढदिवस साजरा करून मावस बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बोपर्डी येथे निघाला असताना त्याचा अपघात झाला. त्याच्या पश्चात आई-वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. अपघाताचा तपास हवालदार केशव कुंभार करीत आहेत.