भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला हकनाक जीव गमवावा लागला. शहरातील मोरगे वस्ती भागात हा प्रकार घडला. गेल्या दोन महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून शहरात सशस्त्र हाणामा-या होत आहेत.
१३ एप्रिल रोजी अनिल वसंत वाघमारे या तरुणाला मारहाण सुरू होती. मारामारी सोडविण्यासाठी मोरगे वस्ती येथील दिनेश दत्तात्रय लोंढे (वय ३४) हा तरुण गेला असता त्याला आमच्या भांडणात का पडला अशी विचारणा करून संगमनेर रस्त्यावर राहणारे मनोज कृष्णा काळे, मीरा कृष्णा काळे व अन्य दोघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दिनेश हा गंभीर जखमी झाला होता. बेशुद्धावस्थेत असलेल्या दिनेशला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असताना  त्याचे निधन झाले होते.
शहर पोलीस ठाण्यात मृत दिनेशचा भाऊ संतोष लोंढे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोज काळे, मीरा काळे व अन्य दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
शहरात दोन महिन्यांपासून सशस्त्र हाणामा-या सुरू आहेत. तलवारीने मारामारीचे तीन प्रकार घडले असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिसांची निष्क्रियता वाढली आहे.