डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची वर्गणी गोळा करण्यावरून दोन गटांत जोरदार मारहाण होऊन एकजण ठार झाला, तर दोघेजण जखमी झाले. स्वप्नील ऊर्फ शंकर विश्वास कांबळे (वय २५)असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा प्रकार शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर शाहूनगर येथे घडला. या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली. कुमार बाबासाहेब कांबळे (वय २५) व राहुल नामदेव कुरणे (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.    
शाहूनगर येथे दलितांच्या दोन गटांमध्ये वाद आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची वर्गणी गोळा करण्यावरून वादात भर पडली होती. तेथे असलेल्या समाजमंदिराचे कुलूप काढण्यावरून मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाद झाला. स्वप्नील कांबळे याने कुमार कांबळे याच्या डोक्यात वीट फेकून मारली. त्याच्या डोक्याला जबर मार बसला.     
संतापलेल्या कुमार कांबळे याने आपल्यावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याचे ठरविले. त्याने काही मित्रांना गोळा केले. स्वप्नील कांबळे याला गाठून कुमार कांबळे याने जांबियाने जोरदार वार केले. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या औदुंबर गोविंद कांबळे (वय ३६) याच्या डोक्यावर तसेच रविराज नितीन कांबळे (वय १८) याच्या हातावरही वार करण्यात आले. या हल्ल्यात स्वप्नील कांबळे याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले.    
या प्रकारामुळे शाहूनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र पोवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. काही वेळातच त्यांनी हल्लेखोर कुमार कांबळे याला अटक केली. तर बुधवारी राहुल कुरणे याला अटक केली.