महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना उद्यापासून प्रारंभ होणार आहे. नागपूर विभागीय मंडळातून ४११ परीक्षा केंद्रावर १ लाख ५७ हजार १३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यामध्ये ७९ हजार ६७३ विद्यार्थी व ७७ हजार ४५९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १ लाख ४१ हजार ४५० विद्यार्थी नियमित असून १५ हजार ६८२ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी आहेत. विज्ञान शाखेत ६० हजार ३९७, वाणिज्य शाखेत २१ हजार ६९५ कला शाखेत ६६ हजार ६९८ व द्विलक्षी अभ्यासक्रमात ८ हजार ३४२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसंदर्भात माहिती देताना नागपूर विभागीय मंडळाचे सहसचिव राम चव्हाण यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षांत कॉपीचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले असले तरी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे  प्रत्येक जिल्ह्य़ात सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय मंडळाच्या १५ विशेष भरारी पथकासह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रौढ शिक्षण संस्था आदी संस्थाची एकंदर ४६ भरारी पथके राहणार असून मंडळाचे विशेष पथक अकस्मिक पथक म्हणून परीक्षेच्या दिवसात काम पहाणार आहेत. परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांंच्या प्रश्नपत्रिका विविध तालुक्यामध्ये पाठविल्या असून त्या कस्टोडियनच्या ताब्यात देण्यात आल्या आहे. नागपूर विभागात ७२ कस्टोडियन राहणार आहेत. केंद्र संचालकाच्या बैठकी घेण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी काही विशेष भरारी पथके तयार करण्यात आली असून ती पथके कुठलही सूचना न देता केंद्रावर पोहचतील. परीक्षा केंद्रावर आळा घालण्यासाठी मंडळाने काही उपाययोजना केल्या आहेत. एका वर्गात ५ पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर विद्याथ्यार्ंसोबत संबंधित केंद्रातील पर्यवेक्षक व शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. बाहेरगावातील सर्व परीक्षा केंद्रावर प्रश्न आणि उत्तर पत्रिका पाठवण्यात आल्या असून शहरात मात्र असून उद्या सकाळपर्यंत कस्टोडियनच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण भागात शाळांमध्ये प्रश्न पत्रिका व उत्तरपत्रिका ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या त्या गावातील पोलीस ठाण्यात कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. इंग्रजी विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका असून पाठय़पुस्तकावर आधारित प्रश्नामध्ये ३० टक्केपर्यंत फरक असू शकेल.

न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम ( डिस्लेक्सिया, डिसकॅलक्युलिया , डिसग्राफीया ) विद्याथ्यार्ंना गणित विषयांसाठी आणि वाणिज्य शाखेतील पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयासाठी कॅलक्युलेटर वापरता येतील. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रावर व्हीडियो चित्रण करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे क्रमांक पुढीलप्रमाणे-  नागपूर- ०७१२ – २५५३५०३ .
अमरावती विभागात बारावीचे १.२७ लाख विद्यार्थी
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्या, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून अमरावती विभागीय मंडळाअंतर्गत पाच जिल्ह्यांमधील ४३१ परीक्षा केंद्रांवरून सुमारे १ लाख २७ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षेसाठी शिक्षण मंडळासह महसूल आणि शिक्षण विभागाची मदत घेतली गेली आहे.
कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सात स्वतंत्र भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आणि २ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील दक्षता समितीचे पथकही परीक्षा पद्धतीवर देखरेख ठेवणार आहे.
सर्वाधिक १२२ परीक्षा केंद्र अमरावती जिल्ह्यात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ९९, बुलढाणा जिल्ह्यातील ८७, अकोला जिल्ह्यातील ७० आणि वाशीम जिल्ह्यातील ५३ केंद्रांवरून ही परीक्षा घेतली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातून ३२ हजार ८४४ नियमित आणि २ हजार ९१६ पुनर्परीक्षार्थी, असे ३५ हजार ७०७, अकोला जिल्ह्यातील २० हजार ९०१ नियमित आणि १८९० पुन्हा परीक्षा देणारे असे एकूण २२ हजार ७९१, यवतमाळ जिल्ह्यातील २४ हजार २७३ नियमित, २५५७ पुनर्परीक्षार्थी असे २६ हजार ८३०, बुलढाणा जिल्ह्यातील २५ हजार ७३८ नियमित, १८२६ पुनर्परीक्षार्थी असे २७ हजार ५६४ आणि वाशीम जिल्ह्यातील १३ हजार ३१३ नियमित, १०७३ पुनर्परीक्षार्थी असे १४ हजार ३८६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

फक्त अर्धा तास आधी प्रवेश
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. मात्र, या वेळात विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिता येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात नियोजित वेळेपेक्षा ३० मिनिटे अगोदर प्रवेश देण्यात यावा, २० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, बारकोड, होलोक्फॉट स्टिकर उपलब्ध करून द्यावे, त्यानंतर पुढील १० मिनिटांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून आवश्यक ती माहिती योग्य त्या ठिकाणी भरण्याविषयी सूचना द्याव्यात, परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात यावे, मात्र उत्तरपत्रिकेवर लिहू दिले जाणार नाही. प्रश्नपत्रिका काही गैरमार्ग अवलंब करण्याच्या दृष्टीने परीक्षा दालनाच्या बाहेर गेल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची राहील, अशी सूचना मंडळाने केली आहे.