पंढरपूर-पुणे मार्गावरील सह्य़ाद्रीनगर (इसबावी) येथील तुलसी बंगल्यावर अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून चाकूचा धाक दाखवून रिव्हाल्व्हरने जिवे मारण्याची धमकी देऊन रोख १ लाख रुपये व २० तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा ७ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी नेला. हा प्रकार रात्री १ ते १.३० च्या सुमारास घडला. सह्य़ाद्रीनगर येथे जिल्हाधिकारी नितीन शिवराम खाडे (सध्या आसाम येथे गृह सचिव म्हणून कार्यरत) यांचा बंगला असून घरातील अनिल खाडे व त्यांचे कुटुंबीय रात्री झोपले असताना बंगल्याच्या मागील बाजूने अज्ञात २० ते ३० वयोगटाच्या तीन ते चारजणांनी आत प्रवेश केला.
चोरटय़ांनी प्रवेश करताच हातातील चाकू, रिव्हाल्व्हरने धाक दाखवून आवाज केला तर जिवे मारू अशी धमकी दिल्याने सर्वजण घाबरून गेले. चोरटय़ांनी कपाटातील रोख रक्कम १ लाख रुपये व सोन्याचे गंठण, पाटल्या, बांगडय़ा व चांदीचे असे २० तोळे घेऊन पोबारा केला.
चोरटय़ांनी लूट करण्यापूर्वी सर्वाचे मोबाईल काढून घेऊन त्यातील बॅटरी, सीम कार्ड काढून फेकून दिले. चोरी करताना कोणी इतरांना सावध करू नये चोरटय़ांनी ऐवज घेऊन जाताना बंगल्याच्या बाहेरून कडी लावून पसार झाले. पसार होताच खाडे यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला परंतु कडी बाहेरून लावली असल्याने त्यांनी ओरड करून झालेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. ही घटना घडण्यापूर्वी रात्रीच्या गस्तीच्या पोलिसांनी या भागातून पुढे जाताच हा प्रकार घडला. या घटनेसंदर्भात पोलिस उपअधिक्षक प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधताच शहर निरीक्षक प्रकाश सातपुते व पोलीस सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचून पाहणी करून त्वरित नाकाबंदी केली.
सोलापूर येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले. श्वान घरापासून निघून कर्मवीर पोलीस चौकी (बंद असलेली) येथपर्यंत येऊन चौकातच घुटमळत होते. चोरटे चोरी करून पायी चौकापर्यंत आले. चोरटय़ांचा सर्वत्र शोध चालू आहे. इतत्र पोलीस पथके पाठवली आहेत, असे कदम यांनी सांगितले. या घटने संदर्भात अनिल शिवराम खाडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तपास प्रकाश सातपुते करत आहेत.