वाढलेल्या उन्हाची तीव्रता जाणवणारी पाण्याची मोठी टंचाई यामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत आहे त्या फळबागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. याकरिता या विभागात एक हजार एकशे त्रेपन्न सामुदायिक शेततळय़ाचे प्रस्ताव दाखल झालेले आहेत, असे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
सामुदायिक शेततळय़ामुळे पाणी मोठय़ा प्रमाणात साठवणूक होते. या सामुदायिक शेततळय़ासाठी सांगोला ५४८, माळशिरस २१२, पंढरपूर २९६, तर मंगळवेढय़ातील ९७ अशा शेतकऱ्याचा शेततळय़ासाठी प्रस्ताव आहे.
या १ हजार १५३ पैकी ६३७ प्रस्ताव हे मंजूर करण्यात आलेले आहेत. तर १५० तळी पूर्ण आहेत. ही शेततळी भरून घेतल्यास १७ हजार एकर क्षेत्राला लाभ होणार आहे. या उपविभागातील फळबागा ओलिताखाली येणार आहेत.
याबाबत रवींद्र पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळय़ाची योजना आहे. यात पाच प्रकारच्या शेततळय़ाचा समावेश असून, याचा लाभ घेण्यासाठी ०५ हेक्टर ते १० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्याकडे असावे याकरिता अनुदानही आहे. ५ लाख लीटर क्षमतेच्या तळय़ासाठी ६५ हजार रुपये अनुदान आहे. या शासनाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.