गावात दररोज चालणारी पिण्याच्या पाण्याची वणवण थांबवण्यास ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत जवळपास १० कोटी खर्चाच्या ग्रामीण पेयजल योजनेला गावकऱ्यांनी एकमुखाने मंजुरी दिली. त्यामुळे औसा तालुक्यातील उजनीच्या १० हजारांहून अधिक लोकवस्तीसह पुढील ३ पिढय़ांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
औसा बाजार समिती सभापती व गावचे उपसरपंच योगिराज पाटील यांनी पुढाकार घेऊन ही ग्रामसभा आयोजित केली. गावकरी मोठय़ा संख्येने सभेस उपस्थित होते. जीवन प्राधिकरणचे उपअभियंता के. के. खरोसेकर, भूजल वैज्ञानिक गायकवाड, कार्यकारी अभियंता घोडमारे, वरिष्ठ वैज्ञानिक शेख, भूजल विकास यंत्रणेचे गायकवाड, शाखा अभियंता देशमाने आदींच्या पथकाने गावाची व निम्नतेरणा धरणाची पाहणी करून गावकऱ्यांना योजनेची माहिती दिली. ग्रामीण पेयजल योजना निम्न तेरणा योजनेतून राबविण्यात येणार असून, आगामी ३५ वर्षांतील लोकसंख्येचा विचार यात करण्यात येत आहे. योजनेसाठी ८० टक्के निधी केंद्राचा, १० टक्के राज्य सरकारचा व १० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने असणार आहे. ग्रामसभेत एकमुखाने योजनेस मंजुरी देण्यात आली. जवळपास १० कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला जिल्हय़ात प्रथमच ग्रामसभेतून मंजुरी मिळाली.
ग्रामसभेत मंजूर होणारी जिल्हय़ात मोठय़ा गावातील ही पहिलीच योजना आहे. तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. अंदाजित रकमेसाठी सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता के. के. खरोसेकर यांनी दिली. नारायण लोखंडे, अरुण मुकडे, विष्णुदास ओझा, बंडाप्पा ढासले, गोिवद वळके, जगन्नाथराव आलमले, सरवरखान पठाण, कुर्बान शेरेकर आदींसह गावकरी उपस्थित होते.