साखळी पद्घतीच्या सिमेंट बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाकडे आणखी दहा कोटी रूपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी दिली. पुणेवाडी येथील शेतकऱ्यांना झावरे यांच्या हस्ते पिक विम्याच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
दुष्काळामुळे वाया गेलेल्या रब्बी पिकांचा १६ लाख ६१ हजार रूपयांचा विमा पुणेवाडी येथील शेतक-यांना मिळाला आहे. त्याचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. बाजार समितीचे संचालक मारूती रेपाळे, सरपंच दिपाली रेपाळे, आत्मा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र औटी, नामदेव ठाणगे, जिल्हा बँकेचे रमेश पुजारी व संभाजी औटी, उपसरपंच प्रकाश पुजारी, भाऊसाहेब डमरे, श्रीनाथ युवा संघटनेचे राहुल चेडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव चेडे, एकता संघटनेचे मोहन बोरूडे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. झावरे पुढे म्हणाले, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खंबीर भूमिका घेतल्याने तालुक्याला तब्बल साडेसोळा कोटी रूपयांचा पिकविमा मंजूर झाला. या विम्यासाठी कृषी खात्याचा अहवाल महत्वाचा असल्याने विखे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य व वेळेत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रात्रंदिवस मेहनत केल्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर विमा मिळाला. जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही या कामी मोलाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. दत्ता बोरूडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर बाबा रेपाळे यांनी अभार मानल़े