महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत विभागीय स्तरावर दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा १० लाख रुपयाचा पुरस्कार पंचायत समितीला देण्यात आला असून नुकतेच राज्यपाल शंकरनारायणन यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, आर्णीचे सभापती राजू विरखडे व विकास अधिकारी चंद्रकांत बंड, उपसभापती सारनाथ खडसे, कक्ष अधिकारी रामटेके व रोहिदास राठोड यांना मुंबई येथील रवींद्र नाटय़गृहात प्रदान करण्यात आला.
पंचायत राज संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेऊन राज्यपातळीवर व विभागीय स्तरावर हा पुरस्कार देण्यात येतो. त्यात विभागीय स्तरासाठी आर्णी पंचायत समितीची निवड झाली
आहे. अमरावती महसूल विभागातील पाच जिल्ह्य़ातील समितीकडून अव्वल कामगिरीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे भारावून गेले. त्यांनी आर्णी पंचायत समितीच्या पदाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्य स्तरावरील पुरस्कार मिळावा, त्यासाठी आपण प्रयत्नशील असून तशा स्वरूपाचे कार्य करण्यात जिद्द मनाशी बाळगल्याचे मत सभापती विरखडे व गटविकास अधिकारी बंड यांनी ‘लोकसत्ता’ जवळ बोलताना व्यक्त केले.