नांदेडहून काकिनाडाकडे जाणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नांदेड शहरातील चैतन्यनगर परिसरात राहणाऱ्या वाय. लक्ष्मी सरोजा (वय २९) आपल्या आईसमवेत काकिनाडाला निघाल्या होत्या. देवगिरी एक्स्प्रेसने या माय-लेकी जात असताना चोरटय़ांनी वाय. अन्नपूर्णा दुर्गाप्रसाद यांच्या पर्समध्ये असलेली सोन्याची छोटी पिशवी पळवली. त्यात ३० तोळे सोन्याचे दागिने होते. माय-लेकींना हा प्रकार मुदखेडमध्ये लक्षात आला. सुमारे १० लाखांचे दागिने लंपास झाल्याचे येताच या माय-लेकी नांदेडला परतल्या व त्यांनी रेल्वे पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असला, तरी चोरटय़ांचे धागेदोरे हाती लागले नाहीत. नांदेडच्या रेल्वेस्थानकावर असलेले सहा सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. शिवाय प्रवेश करताना असलेले मेटल डिटेक्टरही सध्या बंदच आहेत.