शिवडी परिसरातील एका कंपनीत सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी सहाजणांना जलदगती न्यायालयाने दहा वर्षांची तर एकाला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात पुरावा नसल्याने एकाला निर्दोष सोडण्यात आले आहे.
शिवडी येथील एक्सर प्लास्टिक कंपनीच्या गोदामावर १० सप्टेंबर २०११ मध्ये मध्यरात्री काही जणांनी दरोडा टाकला होता. यावेळी पहारेकरी तसेच क्लिनरलाही मारहाण करण्यात आली होती. गोदामातील एलसीडी टीव्ही तसेच काही रोकड लुटण्यात आली होती. या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल सार्दळ यांनी तपास करून या प्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक केली होती. या सर्वाविरुद्ध शिवडीच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या खटल्याचा निकाल गेल्या आठवडय़ात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी दिला. या प्रकरणात असगर अली शेख (२३), जब्बार शेख (२३), अक्रम खान (२२), राहुल नंदू वाघमारे (२४), मंगेश विष्णू सकट ऊर्फ मंग्या (२४) आणि मनोद अनू नायर ऊर्फ मन्नू (२६) या सहाजणांना दहा वर्षे तर रमेश श्रीरंग आखाडे (२६) याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील राजीव विजय बहादूर सिंग याच्याविरुद्ध पुरावा न आढळल्याने त्याला निर्दोष सोडण्यात आले. या खटल्यात सरकारच्या वतीने एस. के. मोरे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:14 pm