शहराच्या मंगळवारा बाजार परिसरात सुमारे १०० वर्षे जुने बालाजी मंदिर कोसळून त्याखाली दबले गेल्याने पाचजण जखमी झाले. जखमींपैकी विजयालक्ष्मी रमेश उपाध्याय (वय ६५) यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. शहर व जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भिंत व नंतर खांबासह संपूर्ण मंदिर कोसळले. मंदिराचे पुजारी रमेश शंकरलाल उपाध्याय, त्यांची पत्नी विजयालक्ष्मी, दिग्वेश जोशी (वय १४), मंजू जोशी व माधव उपाध्याय (वय ५) हे पाचजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले व नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर काही तासांतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार आमदार भाऊपाटील गोरेगावकर यांच्या हस्ते चौघा जखमींना उपचारासाठी तातडीची प्रत्येकी ५० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी घटनास्थळी भेट दिली.