मुंबई शहरातील कोणत्याही रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर प्रवाशांना नेहमीच टॅक्सीसाठी थांबावे लागते. अनेकदा शहरातील मोक्याच्या ठिकाणी टॅक्सी न मिळण्याचे प्रकारही घडतात. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असलेल्या टॅक्सींचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि रस्त्यांवरील टॅक्सींचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता मुंबईकरांच्या सेवेत नव्या टॅक्सी दाखल होणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत शहरातील रस्त्यांवर हजारांहून अधिक टॅक्सी दाखल होतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी सोडत पद्धतीत प्रतीक्षा यादीवर असलेल्या साडेसात हजार टॅक्सींपकी या काही टॅक्सी रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांची टॅक्सीसाठीची प्रतीक्षा कमी होणार असली, तरी रस्त्यांवरील वाहनांत भर पडणार आहे.
आजमितीला मुंबईच्या शहर आणि उपनगरांत मिळून ४२ हजार टॅक्सी रस्त्यांवर धावतात. मात्र शहराच्या दीड कोटींहून अधिक लोकसंख्येपुढे या टॅक्सींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर दर दिवशी ७५ ते ८० लाख प्रवासी करतात.
त्या तुलनेत हे प्रमाण अधिकच कमी वाटते. तसेच शहरातील वाहतूक कोंडीमुळे बेस्टची सेवाही परिणामकारक नसल्याचे मत प्रवासी व्यक्त करतात. त्यामुळे अनेकदा टॅक्सीचा पर्याय प्रवाशांकडून चाचपडला जातो. मात्र प्रमाण कमी असल्याने हव्या त्या वेळी टॅक्सी न मिळणे, टॅक्सीचालकाने भाडे नाकारणे आदी प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे प्रवाशांकडून सातत्याने तक्रार केली जाते.
याबाबत टॅक्सी संघटनाही वारंवार शहरात टॅक्सींचे प्रमाण कमी असल्याचे कारण पुढे करत असतात. मात्र आता हे कारण ऑगस्ट अखेरीपासून काही प्रमाणात का होईना हद्दपार होणार आहे. गेल्या वर्षी सोडत प्रक्रियेत तब्बल ७८४३ अर्ज प्रतीक्षा यादीत होते.
या अर्जदारांनी आपली कागदपत्रे सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने टॅक्सीचालकांना कळवले होते. त्यानुसार जुल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ताडदेव व वडाळा या प्रादेशिक परिवहन कार्यालयांत कागदपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
या एका आठवडय़ात २००हून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले असून, ऑगस्ट महिन्यापर्यंत १००० अर्ज स्वीकारणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले.
याचा फायदा मुंबईकरांनाच!
‘या ७८४३ अर्जापकी एक हजार अर्जदारांना परवाना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील टॅक्सींच्या संख्येत भर पडेल आणि पर्यायाने मुंबईकरांचा फायदा होईल,’ असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. रस्त्यांवरील खासगी वाहनांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी टॅक्सीसारख्या सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहनांची संख्या वाढणे नेहमीच चांगले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.