मायानगरी मुंबईत परप्रांतांतून येणारे लोंढे वाढत असले तरी मुंबईतून गायब होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दहा वर्षांत मुंबईतून १ लाखहून अधिक लोक बेपत्ता झाले होते. त्यातील बरेचसे घरी परतले, अनेकांना पोलिसांनी शोधून काढले. परंतु अद्यापही त्यातील दहा हजार जणांचा शोध लागलेला नाही. त्यात दीड हजार अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २००५ ते मे २०१५ या दहा वर्षांत मुंबईतून तब्बल एक लाखहून अधिक लोक बेपत्ता झाले होते. त्यात ३४ हजार २१३ अल्पवयीन मुलांचा आणि ६६ हजार २२६ प्रौढ स्त्री-पुरुषांचा समावेश होता. या बेपत्ता असलेल्यांपैकी अनेक जण नंतर स्वत:हून घरी परतले, तर अनेक जणांना पोलिसांनी तपास करून शोधून काढले. बेपत्ता एक लाख जणांपैकी ३४ हजार अल्पवयीन मुलांचा आणि ६६ हजार प्रौढ लोकांचा शोध लागला. परंतु अद्यापही १० हजार १०८ जणांचा शोध लागलेला नाही. त्यात १ हजार ५२९ अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. या अल्पवयीन मुला-मुलींमध्ये पळवून नेलेल्या तान्ह्य़ा बाळांसह अपहरण करण्यात आलेल्या मुला-मुलींचा समावेश आहे.
विशेष मोहीम
अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता असल्यास हरविल्याची तक्रार नोंद न करता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी अल्पवयीन मुला-मुलींच्या शोधासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष उभारला होता, तसेच गुन्हे शाखेलाही आदेश दिले होते. त्यामुळेच गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांनी १ हजारांहून अधिक मुला-मुलींना शोधण्यात यश आले अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली.