महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या, मंगळवारपासून सुरुवात होत असून मंडळातर्फे यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यावर मंडळाने विशेष भर दिला आहे. यावेळी एकूण परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी ५९ भरारी पथके राहणार आहेत. नागपूर विभागीय मंडळात ६६१ परीक्षा केंद्रांवर २ लाख ३६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात पुनर्परीक्षार्थी १६ हजार १०५ तर १ हजार ९२३ विद्यार्थी खासगी परीक्षार्थी आहेत. गेल्या काही वर्षांत दहावी आणि परीक्षेच्या संवेदनशील केंद्राची संख्या ४० ते ५० असताना यावेळी मात्र दहावीच्या परीक्षेत केवळ दोनच संवेदनशील केंद्र असल्याची नोंद असून ते दोन्ही वर्धा जिल्ह्य़ातील असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. २६ मार्चपर्यत दहावीचा परीक्षा आहे.
२ लाख ३६८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ०२ हजार ५९१ विद्यार्थी व ९७,७७७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. भंडाऱ्यातून २३ हजार ७७०, चंद्रपूरमधून ३५ हजार ७७०, नागपूरमधून ७५ हजार ८०३, वध्र्यामधून २२ हजार ३४८, गडचिरोलीमधून १७ हजार ६२३ तर गोंदियामधून २५ हजार ०५४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने काही योजना आखल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीसाठी अर्ज देणे आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर ५९ भरारी पथके राहणार असून त्या मंडळाची चार पथक ही आकस्मिक पथक म्हणून परीक्षेच्या दिवसात काम पाहणार आहेत. आतापर्यत दहावीच्या परीक्षेत ११ वाजता विद्यार्थ्यांंना प्रश्न आणि उत्तरपत्रिका दिली जात होती. मात्र, यावेळी परीक्षा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी दिली जाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम (डिस्लेक्सिया, डिसकॅलक्युलिया, डिसग्राफिया ) विद्यार्थ्यांना गणित विषयांसाठी कॅलक्युलेटर वापरता येतील. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. जे विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांनी सांगितले. परीक्षेच्या काळात होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रांवर व्हीडिओ चित्रण करण्यात येणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. प्रवेशपत्र, वेळापत्रक, बैठक व्यवस्था आदींबाबतच्या शंकांचे निवारण करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘हेल्पलाईन’ कार्यान्वित केली आहे. नागपूर आणि अमरावती मंडळाचे ‘हेल्पलाईन’चे क्रमांक पुढीलप्रमाणे – नागपूर ०७१२- २५५३५०३, अमरावती- ०७२१- २६६२६०८.
कामे टाळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या दिवसात तपासणीचे किंवा पर्यवेक्षक म्हणून काम न करण्यासाठी अनेक शिक्षक आजारपणाचे किंवा कौटुंबिक कारणे समोर करीत काम टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. उद्या, मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. केंद्र प्रमुखाचे काम करण्यास काही शिक्षक अनुत्सुक असल्याचे सांगण्यात आले. अनेक शिक्षक आजारी असल्याचे कारण पुढे करून परीक्षेची, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक किंवा पेपर तपासणीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी शिक्षण विभागाने चालविली आहे. विशिष्ट केंद्रावर नियुक्ती झाल्यानंतर ती रद्द करण्यासाठी आग्रह धरणारे काही शिक्षक ‘साहेब मला यंदा परीक्षेचे काम नको’ अशी विनवणी करीत असल्याचे अर्ज शिक्षण मंडळाकडे येत आहे. मात्र, मंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेले काम करावेच लागेल, असा इशारा शिक्षकांना दिला आहे.