चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथला गेलेल्या मराठवाडय़ातील ५३३ यात्रेकरूंपैकी ४२२ यात्रेकरूंशी संपर्क झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. १११ यात्रेकरू अद्यापही संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या यात्रेकरूंपैकी १९० यात्रेकरू परतीच्या मार्गावर आहेत, तर २०३ येथून आपापल्या गावी परतले आहेत. या यात्रेकरूंना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत आणि परतीच्या प्रवासाची सोय केली जात असल्याचे डेहराडून येथे गेलेले पथकप्रमुख उपजिल्हाधिकारी महेंद्र हरपळकर यांनी सांगितले.
चारधाम यात्रा करण्यासाठी मराठवाडय़ातील हजारो भाविक दरवर्षी केदारनाथ, बद्रीनाथला जातात. या वर्षी ढगफुटी झाल्याने यात्रेकरू अडकून पडले आहेत. त्या यात्रेकरूंच्या मदतीला महाराष्ट्र सरकारतर्फे पथक पाठविण्यात आले. हे पथक डेहराडून येथे गेले असून औरंगाबाद येथील पथक महाराष्ट्रातील यात्रेकरूंचा शोध घेतात, त्यानंतर तो कोणत्या गावाचा आहे हे पाहून त्या विभागाकडे असलेल्या अधिकाऱ्याकडे पाठवून त्या यात्रेकरूला पाठविण्याची व्यवस्था करीत आहे. यात्रेकरूला आíथक मदतीची गरज असल्यास त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्र हरपळकर यांनी सांगितले.