अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्ज आणि फ्लेक्समुळे शहरामध्ये विद्रूपीकरण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या २४ तास टोल फ्री क्रमांकांवर तीन महिन्यांत ११५ तक्रारी दाखल करण्यात झाल्या आहेत. मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागाची अनधिकृत पोस्टर्सविरोधातील कारवाई होत नसल्याने तक्रारदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्ज आणि फ्लेक्सची माहिती देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १८००२२२३०९ व १८००२२२३१० या क्रमांकांची टोल फ्री सेवा आणि नागरिकांचा सहभाग असलेली विभागनिहाय समित्यांची स्थापना २४ डिसेंबर २०१४ रोजी केली आहे. मात्र टोल फ्री क्रमांकांच्या माध्यमातून तीन महिन्यांत ११५ तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या आहेत. अतिक्रमण विभागाने अनधिकृत पोस्टर्सविरोधातील तक्रारींना केराची टोपली दाखविली असल्याने अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्ज आणि फ्लेक्स शहरात मोठय़ा प्रमाणावर झळकताना दिसून येत असून शहराला विद्रूप स्वरूप प्राप्त होत आहे. या संदर्भात पालिकेचे अतिक्रमण अधिकारी सुभाष गायकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.