यावर्षीचा पावसाळा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी संकट ठरला आहे. अर्धाच पावसाळा झालेला असताना तिसऱ्यांदा तडाखा बसल्याने ८ लाख हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भात ८० तालुक्यांत अतिवृष्टी असून अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्यातच जमा आहे. विदर्भातील पाऊस बळींची संख्या ११६ पर्यंत तर जखमींची संख्या ७५ पर्यंत पोहोचली आहे. पावसामुळे २५ हजारांवर घरांचे नुकसान झाले असून ६० हजार नागरिक निराधार झाले आहेत.  
प्राथमिक अंदाजानुसार, नागपूर विभागात ५ लाख, ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३ लाख, ५० हजार हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने विदर्भातील ३० हजार हेक्टर तर अमरावती विभागात अतिवृष्टीने १० हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेली. पुराच्या पाण्यासोबत शेतात पिकांना पोषक असलेली द्रव्येही वाहून गेली आहे.  शेतात पाणी साचल्याने लागवड झालेली पिके पिवळी पडली आहेत. या पिकांची वाढ खुंटल्याने काही उत्पादन मिळण्याची आशाच संपली आहे.
नागपूर विभागात ७९२ रस्ते व  ५३ तलावांचे नुकसान झाले आहे. जनावरेही मोठय़ा संख्येने मृत्युमुखी पडल्याने शेतक ऱ्यांना दुहेरी मार बसला आहे. नागपूर विभागात ६४६ तर अमरावती विभागात दीडशेवर जनावरांचा मृत्यू झाला. विदर्भात ५२ लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची यावर्षी पेरणी झाली.  नागपूर विभागात चालू खरीप हंगामात १८ लाख, ६० हजार एकूण पेरणी क्षेत्रापैकी १४ लाख, ६५ हजार क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. पेरणीनंतर अतिवृष्टीचा कहर सुरू झालेल्याने उर्वरित २० क्षेत्र अद्यापही पेरणीविना आहे.
विभागात धानाची २ लाख, ८१ हजार क्षेत्रावर रोवणी तर ७६ हजार हेक्टरमध्ये आवत्या टाकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत धानाची ५१ टक्के रोवणी झाली. अतिवृष्टीमुळे शेतक ऱ्यांची संपूर्ण कामे खोळंबली आहेत. अतिवृष्टीमुळे बहार न फुटल्यामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्य़ांत १२५ हेक्टरमधील संत्रा व मोसंबी पिकांचेही नुकसान झाले आहे.
विदर्भात अतिवृष्टीने बळी गेलेल्यांची संख्या ११६ झाली आहे. यामध्ये नागपूर विभागात ७४ तर अमरावती विभागात अतिवृष्टीने ४२ नागरिकांचा मृत्यू झाला. नागपूर विभागात सर्वाधिक फटका चंद्रपूरला तर  अमरावती विभागात वाशीम जिल्ह्य़ाला बसला.