पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले, तरीही विभागातील ३ जिल्ह्य़ांत ११८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद ५३, बीड ४५ व उस्मानाबाद जिल्ह्य़ात २० टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. प्रमुख धरणांच्या पाणीसाठय़ांत अजूनही म्हणावी तशी वाढ नाही. जायकवाडीत २३.२१ टक्के, तर माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा व सिनाकोळेगाव धरणांत शून्य टक्के साठा आहे. परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्य़ांत चांगला पाऊस झाला. िहगोलीत अतिवृष्टीचे लक्षण आहे. चार जिल्ह्य़ांत प्रतीक्षा, तर ३ जिल्ह्य़ांत पाऊस नकोसा, असे चित्र आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जायकवाडीत अधिक पाणीसाठा आहे. मात्र, सिंचनास उपयोगात आणता येईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे मोठय़ा पावसाची अजूनही गरज आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील १६ मध्यम प्रकल्पांत ८ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ातील १७ मध्यम प्रकल्पांत ७ टक्के साठा आहे. लातूरची स्थितीही फार चांगली नाही. मध्यम प्रकल्पांत ४५ टक्के साठा असला, तरी मोठा पाऊस नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक ५३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाही. नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांत पुरेसा साठा झाला असला, तरी कालव्यांद्वारे पाणी वळविले जात आहे. गेल्या ३ दिवसांपासून जायकवाडी जलाशयात नवीन पाण्याचा ओघ मंदावला असून धरणातील उपयुक्त साठा ५०४.०१ दलघमी आहे. धरणे भरली असतानाही नगर जिल्ह्य़ात मात्र आंदोलने सुरू आहेत.