अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कार्यशैलीवर ‘लोकसत्ता- नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी घाईघाईत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. शिक्षण उपसंचालक महोदयांची स्वाक्षरी झाली नसल्याने या कार्यालयाने दहावीच्या निकालाच्या दिवशी हे वेळापत्रक जाहीर न करणे इष्ट समजले होते. शिक्षण उपसंचालकांच्या स्वाक्षरीनंतर अखेर ते जाहीर झाले. त्यानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ जुलै रोजी सुरुवात होणार असून ती १८ जुलै रोजी संपुष्टात येईल. सर्व महाविद्यालयांमध्ये पहिली प्रवेश यादी ३ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आणि कधी संपुष्टात येणार याबद्दलची स्पष्टता शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कारभारामुळे होऊ शकली नाही. वास्तविक, दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांसमोर अकरावी प्रवेशाचा जो महत्त्वाचा प्रश्न असतो, त्याबाबत या विभागाने फारसे गांभीर्य दाखविले नाही. अंतिम क्षणी नियोजित वेळापत्रकात काही किरकोळ बदल करण्यात आले. अकरावी प्रवेशाचे हे वेळापत्रक तयार असूनही वरिष्ठांची स्वाक्षरी झाली नसल्याने ते जाहीर करण्यात आले नाही. या घडामोडींवर प्रकाश पडल्यानंतर बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अतिशय घाईघाईत सर्व सोपस्कार पार पाडून या वेळापत्रकाची माहिती उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शहर व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना ई मेलद्वारे कळविली.२६ जून रोजी दुपारी तीन वाजता मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. याच दिवसापासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. २६ ते ३० जून या कालावधीत प्रवेश अर्जाची विक्री व स्वीकृतीचे काम होईल. यानंतर प्राप्त अर्जाची छाननी व संवर्गनिहाय यादी तयार करण्याचे काम ३० जून ते ३ जुलै या कालावधीत होईल. ३ जुलै रोजी दुपारी चार वाजता सर्व महाविद्यालयांत संवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. संवर्गनिहाय जाहीर झालेल्या यादीनुसार ७ जुलैपासून प्रवेश दिले जातील. ८ जुलै रोजी प्रतीक्षा यादीवरील संवर्गनिहाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. ११ जुलै रोजी प्रतीक्षा यादीतील रिक्त जागांवर गुणानुक्रमांकानुसार प्रवेश देण्याचे काम केले जाईल. १२ जुलैपासून शिक्षण संचालक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे आलेल्या प्रवेश अर्जातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. १८ जुलै रोजी महाविद्यालयनिहाय प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘जीने लगा हूँ..’ची धून बंद
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक घाईघाईत जाहीर करणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तितकीच चपळाई आपल्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधणाऱ्यांच्या कानी पडणारी ‘जीने लगा हँू..’ची धून बंद करण्यातही दाखविली आहे. नाशिक रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधणाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून ‘जीने लगा हूँ, पहिले से जादा, पहिले से जादा मरने लगा हूँ..’ या गाण्याची धून कानावर पडत होती. यामुळे संपर्क साधणारेही बुचकळ्यात पडले होते. यावर प्रकाश टाकल्यानंतर कार्यालयाने तातडीने ही धून बंद करण्याची व्यवस्था केली. बुधवारी कार्यालयातील दूरध्वनीवर या गाण्याची धून बंद झाल्याचे लक्षात आले.