सुरक्षिततेच्या कारणावरून खुद्द व्यापाऱ्यांनीच पंढरपूरचा त्याग करून अकलूजला सुरू केलेल्या यावर्षीच्या घोडेबाजारात तब्बल साडेबारा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवाळी पाडव्यापासून हा घोडेबाजार भरला होता. या बाजारासाठी राज्याबरोबरच केरळ, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशातूनही घोडय़ांच्या खरेदी-विक्रीसाठी हौशी व्यापाऱ्यांनी हजेरी लावली होती. या बाजारात पंजाबी, सिंधी, काटियावाडी, मारवाडी आदी जातीच्या एकूण २ हजार १३६ घोडय़ांची आवक झाली होती. यापैकी १ हजार ४१५ घोडय़ांची विक्री होऊन एकूण उलाढाल १२.६० कोटींची झाली.
सुरक्षिततेच्या कारणावरून घोडे व्यापाऱ्यांनी ४ वर्षांपूर्वी पंढरपूरला रामराम ठोकून अकलूजला बाजार सुरू केल्यानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने या व्यापाऱ्यांना आश्रय दिला. हजारो झाडांच्या सावलीची १० एकराची जागा या बाजारासाठी देऊन त्यांना २४ तास वीज व पाण्याची सोय करून दिली. घोडय़ांच्या चढउतारणीसाठी धक्के बांधून, घोडय़ांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पशुचिकित्सालयाची सोय करून दिली. शिवाय व्यवहारात सुरक्षितता आणण्याच्या दृष्टीने घोडा व खरेदी देणार-घेणार यांचे छायाचित्र असणाऱ्या संगणकीय पावत्यांची सोय करून दिली.